
संवाद (Communication) ही अटळ गोष्ट आहे, पण सोप्या गोष्टी आपण अवघड करतो. जग हे आपल्या मनाप्रमाणे चालणारं नसतं. म्हणून लोकांना बदलण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी त्यांना ते जसे आहेत तसे स्वीकारून त्याअनुषंगाने स्वतः कसे जगायचे वागायचे एवढं आपल्याला ठरवता आले पाहिजे.
तंबाखू चोळत जगभरातल्या समस्यांवर चर्चा करणे हे जगातले सर्वांत सोपे काम आहे. आणि आजकाल प्रत्येक जण यात माहीर आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना आपण खूप बुद्धिवान आहोत असे वाटून जाते. विविध राजकीय सभा-सम्मेलनांतून, टीव्हीवर सुरू असलेल्या चर्चांतून हेच सर्व आपल्याला बघावयास मिळते. आपल्या समोरील समस्या आत्मचिंतनाच्या आहेत. त्या केवळ प्रश्न विचारून सुटणाऱ्या नाहीत. प्रख्यात शायर खुमार बाराबंकवी म्हणतात, की -
दुश्मनों से प्यार होता जाएगा दोस्तों को आज़माते जाइए
इतक्या विरोधाभासाचे वातावरण आपल्या भोवती आहे. अनेक प्रश्नांच्या उत्तरात शेवटी आपणच अपराध्याच्या पिंजऱ्यात असतो ही वस्तुस्थिती आहे. कोणतेही संबंध स्वार्थरहित व अपेक्षारहित ठेवल्यास आपल्यावर मनस्तापाची वेळच येणार नाही.
‘किसी से कोई भी उम्मीद रखना छोड़कर देखो
तो ये रिश्तें निभाना किस क़दर आसान हो जाये’
असे वसीम बरेलवी म्हणतात ते किती खरं आहे. शेत असो की घर आपण बघतो की आज प्रत्येक जण शेजारच्याशी असलेल्या भांडणामुळे अशांत व अस्वस्थ आहे. क्षमा करणे म्हणजे फक्त ‘जाने दो’ नव्हे, तर तुमच्या हरकत घेतल्याने समोरचा अडचणीत येऊ शकत असूनही तुम्ही त्याचे वाईट होऊ नये म्हणून त्याची चूक नजरंदाज करता. इतरांच्या छोट्या मोठ्या चुका दुर्लक्षित केल्याने आपलेही मनःस्वास्थ्य चांगले राहते. एखाद्याला चांगला वाईट ठरवणं किंवा प्रतवारी आणि तुलना करण्याची घाई करणं व्यर्थ असतं.
रामाने रावणाला मारल्यानंतरही त्याच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करवून घ्यावे म्हणून लक्ष्मणाला पाचारण केले. खरे पाहिले तर जे आत्मज्ञान रावणाकडे होते ते श्रीरामचंद्रांकडे नव्हते काय? तर हा रावणाकडील विद्येला व त्याने प्राप्त केलेल्या अर्हतेला केलेला नमस्कार होता. त्याला काही सांगावयाचे असल्यास ते कोणीतरी ऐकायला हवे हेही त्यात आलेच.
मात्र, आपण यातून हाही निष्कर्ष निघतो की आपल्याला जर एखादीवेळी आपल्या शत्रूचा सल्ला हवा असेल तरी तो त्याच्याकडून घेता यावा. नि दा फाजली यांचा एक सुंदर शेर आहे, की -
दुश्मनी लाख सही ख़त्म न कीजे रिश्ता
दिल मिले या न मिले हाथ मिलाते रहिए
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.