...स्वप्नामधील गावा!

निद्रिस्त अवस्थेत पडणाऱ्या स्वप्नांच्या पाऊलखुणा तपासत मानवी अंतरंगात उतरण्याचा प्रयत्न सिग्मंड फ्रॉइड (Sigmund Freud) नामक मानसशास्त्रज्ञानं केला आणि त्याच्या हाती जे काही लागलं त्यामुळं तो जागतिक मानसशास्त्राच्या आणि मानवतेच्या इतिहासात अजरामर झाला.
Dream Analysis
Dream AnalysisAgrowon

आदिनाथ चव्हाण

स्वतःमधील अंतर्विरोधांचा बळी होण्याचं माणसाचं भागधेय सिग्मंड फ्रॉइडनं ओळखलं. संस्कृतीच्या नावानं दडपल्या जाणाऱ्‍या कामप्रेरणेला लखलखीत उजेडात आणलं. ईडिपस गंडासारखे क्रांतिकारी सिद्धांत मांडताना मानवाच्या आदिम प्रेरणा नाकारता येणार नाहीत याकडं अंगुलिनिर्देश केला. फक्त शास्त्रीय विश्‍लेषण करून तो थांबला नाही, तर स्वप्नांची उकल करून मनोरुग्णाला बरं करण्याचं शास्त्र त्यानं तयार केलं. मानव जातीवर हा मोठाच उपकार मानायला हवा.

‘अबोध मनातील अतृप्त इच्छांची पूर्तता करण्यासाठीच स्वप्नांची निर्मिती होते. स्वप्नं भविष्याचं सूचन करतात हे मिथक आहे; खरे तर ती आपला भूतकाळ उलगडत असतात. ती अबोध मनापर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग असतात.’

- सिग्मंड फ्रॉइड, प्रख्यात मानसशास्त्रज्ञ

स्वप्नं ही कोणाची मिरासदारी नसतेच मुळी! ती कोणीही पाहू शकतं. स्वप्नं न पडलेला माणूस विरळाच. स्वप्निल दुनियेत विहरताना कोणी रंकाचा राव होऊ शकतो आणि एखादा खंक झालेला देखील फिनिक्स भरारी घेऊ शकतो. स्वतःच्या भवितव्याविषयी, इच्छा-आकांक्षांविषयी, प्रियेविषयी जागेपणी पाहिलेली स्वप्नं वेगळी आणि निद्रिस्त असताना पडलेली थोडीशी अनाकलनीय, अर्धवट आठवणारी स्वप्नं वेगळी. मानवी वर्तनाचे अर्थ शोधण्याचे अगणित मार्ग मानसशास्त्रज्ञांनी गेल्या दोनेक शतकांत शोधून काढले.

निद्रिस्त अवस्थेत पडणाऱ्या स्वप्नांच्या पाऊलखुणा तपासत मानवी अंतरंगात उतरण्याचा प्रयत्न सिग्मंड फ्रॉइड (Sigmund Freud) नामक मानसशास्त्रज्ञानं केला आणि त्याच्या हाती जे काही लागलं त्यामुळं तो जागतिक मानसशास्त्राच्या आणि मानवतेच्या इतिहासात अजरामर झाला. मानवाच्या सुसंस्कृततेचा बुरखा टराटरा फाडण्याचं काम त्यानं केलं. ईडिपस गंडासारखा (Oedipus complex) सिद्धांत मांडून संस्कृतिरक्षकांची माथी भडकवली.

टीकेचा भडिमार त्याला सोसावा लागला. पण आपल्या वैज्ञानिक सिद्धांतापासून तो तसूभरही हटला नाही. त्याआधी चार्ल्स डार्विननं सन १८५९ मध्ये मानवाची उत्पत्ती वानरापासून झाल्याचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत ‘द ओरिजिन ऑफ स्पीशीज’ या युगप्रवर्तक ग्रंथातून मांडल्यानं युरोपातील चर्चसह सारे धर्ममार्तंड खवळले होते. फ्रॉइडनं परंपरागत धर्मकल्पनांना आपल्या नव्या सिद्धांतानं आणखी हादरे दिले.

दूरदृष्टी लाभलेल्या कर्तृत्ववान माणसांना आपल्या कृतीच्या शाश्‍वत भवितव्याविषयी किती ठाम विश्‍वास वाटत असतो ना! ‘द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’चा कर्ता सिग्मंड फ्रॉइड याची आपल्या या पुस्तकाविषयी अशीच ठाम धारणा होती. सन १८९५ च्या वसंत ऋतूत फ्रॉइडला आॅस्ट्रियातील आपल्या घरात या पुस्तकाची कल्पना सुचली.

तेव्हा आपला मित्र विल्हेम फ्लीस याला लिहिलेल्या पत्रात या बहाद्दरानं लिहिलं होतं, ‘पुढे कधी तरी या घरात स्मृतिफलक उभारला जाईल. सिग्मंड फ्रॉइड (Sigmund Freud) याला स्वप्नांचं गुपित उलगडलं ते हेच घर होय, असं त्यावर कोरलं जाईल.’ आपल्याला अस्सल सोनं गवसलं आहे याची खात्री फ्रॉइडला तेव्हाच पटली होती. मात्र जगाला त्याच्या संशोधनाचं मोल समजायला अंमळ उशीरच झाला. जिथं फ्रॉइडच्या मनात या पुस्तकाचं बीज अंकुरलं ते घर यथावकाश जमीनदोस्त झालं.

पण त्याची भविष्यवाणी खरी व्हायची होती. ‘आॅस्ट्रियन सिग्मंड फ्रॉइड सोसायटी’नं खरंच फ्रॉइडच्या कर्तृत्वाला कोंदण चढवलं. त्यांनी त्याच्या योगदानाचा उल्लेख असलेला स्मृतिफलक या घराच्या ठिकाणी उभारला. त्यावर दिमाखात लिहिलं आहे, ‘Here, on July 24, 1895, the secret of dreams was revealed to Dr. Sigmund Freud.’

मानसशास्त्रात आणि एकूणच सामाजिक शास्त्रांत क्रांती घडवणाऱ्या या पुस्तकाच्या सन १८९९ मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या जर्मन आवृत्तीच्या अवघ्या सहाशे प्रति छापल्या होत्या. सहा वर्षांत केवळ तीनशे प्रति विकल्या गेल्या. अपयशाचा शिक्का बसलेलं हे पुस्तक मानसशास्त्राच्या अभ्यासकांकडून, शास्त्रज्ञांकडूनही दुर्लक्षिलं गेलं. माध्यमांनीही त्याची दखल घेतली नाही. दुसरी आवृत्ती तब्बल १० वर्षांनी प्रसिद्ध झाली. हे पुस्तक इंग्रजीत अवतरायला तर चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करावा लागला.

एव्हाना फ्रॉइडनं तब्बल आठ वेळा पुस्तकाच्या खर्ड्याचं पुनर्लेखन केलं. विषय तसा क्लिष्ट. त्यामुळं तो सर्वसामान्यांना समजावा म्हणून ‘आॅन ड्रीम्स’ नावाची जनआवृत्तीही त्यानं प्रकाशित केली. हळूहळू पुस्तकाच्या खपानं गती घेतली आणि ते सर्वकालिक उत्कृष्ट ग्रंथांच्या यादीत जाऊन बसलं. केवळ मानसशास्त्रच नव्हे, तर साहित्यासह कला विश्‍वावरही त्याचा चांगला जाड ठसा उमटला. आज अशी स्थिती आहे की फ्रॉइडला वगळून मानसशास्त्राला पुढं जाता येत नाही. किंबहुना, मनोविश्‍लेषण (Psychoanlysis) या क्रांतिकारी मानसोपचारशास्त्राचा तो जनक मानला जातो.

आपल्या स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे, ‘स्वप्नं अशी पाहा, की जी आपली झोप उडवतील.’ फ्रॉइडनं झोपेत पडणाऱ्या स्वप्नांचं संशोधन, विश्‍लेषण केलं असलं, तरी या विषयाच्या वेडानं तो झपाटला होता. स्वप्नांचं गूढ उकलण्याचं स्वप्न त्यानं पाहिलं आणि ते प्रचंड व्यासंगानिशी प्रत्यक्षातही उतरवलं.

हे पुस्तक लिहिण्यापूर्वी त्यानं स्वतःच्या आणि आपल्या रुग्णांच्या एक हजारांहून अधिक स्वप्नांचं विश्‍लेषण करून त्याची सूत्रबद्ध मांडणी केली. उद्देश हा की आपण जे मांडतो आहोत त्याचा आधार लेचापेचा असता कामा नये. त्याचा पाया पक्का वैज्ञानिक हवा. अभ्यास विषयाबाबतची एवढी निष्ठा, कष्ट करण्याची तयारी, चिकाटी तशी दुर्मीळच!

एकोणिसाव्या शतकात स्वप्नांचा आणि अंधश्रद्धांचा दाट संबंध होता. काही वेळा स्वप्नांची आध्यात्मिक किंवा दिव्य पातळीवरूनही मीमांसा केली जात असे. फ्रॉइडचं वेगळेपण म्हणजे त्यानं या दोन्ही अर्थांच्या पलीकडे जाऊन स्वप्नांचा मानवी अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. हा अर्थ काय आहे, स्वप्नप्रक्रिया कशी असते, स्वप्नांचं मानसशास्त्र काय आहे, स्वप्नांची मीमांसा कशी करावी, त्यासाठी काय पूर्वतयारी करावी याबाबत तपशीलवार माहिती या पुस्तकात मिळते.

तसंच स्वप्नमीमांसेच्या अनुषंगानं फ्रॉइडच्या व्यक्तिगत जीवनावरही प्रकाश पडतो. मानसिक आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करीत असताना फ्रॉइडला जाणवू लागलं, की दमन केलेल्या लैंगिक व आक्रमक इच्छा या मानसिक आजारांचं खरं कारण असतात.

रुग्णांच्या स्वप्नांचं विश्‍लेषण केलं तर त्यांच्या मानसिक घडामोडींबद्दल बरीच माहिती मिळू शकेल आणि दमन झालेल्या इच्छा शोधता येतील, असं त्याला वाटू लागलं. मग उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या स्वप्नांचं विश्‍लेषण करायला त्यानं सुरुवात केली. मानसोपचारांत स्वप्नमीमांसा तंत्राचा (Dream Analysis) समावेश करण्याचं श्रेय त्यालाच जातं. आपल्या या प्रयोगांचं दस्तऐवजीकरण त्यानं ‘द इंटरप्रिटेशन आॅफ ड्रीम्स’ या पुस्तकात केलं.

सर्वसाधारणपणे मनाच्या तीन अवस्था असतात. बोध (जागृत-Conscious), अर्धबोध (अर्धजागृत- Subconscious) आणि अबोध (निद्रिस्त-Unconscious). निद्रिस्त मनातील अनेक इच्छा या लैंगिकतेशी आणि आक्रमकतेशी निगडित असतात. सामाजिक संकेतांच्या विरोधात असल्याने जागृत मनात त्यांना प्रवेश मिळत नाही. जागृत मनाची चाळणी इतकी भक्कम असते, की त्या जागेपणी व जशाच्या तशा प्रगट होऊ शकत नाहीत.

झोपेत जेव्हा जागृत मनाचं नियंत्रण सैल पडतं तेव्हा त्या स्वप्नांद्वारे प्रगट होतात. त्या मूळ स्वरूपात प्रगट होणं जागृत मनाला मान्य नसतं. म्हणून त्या वेश बदलून स्वप्नांद्वारे स्वतःचं अस्तित्व दाखवून देतात. यास स्वप्नांचं विपर्यस्तीकरण (Dream Distortion) म्हटलं जातं. फ्रॉइड म्हणतो, की आपण स्वप्नांत जे पाहतो, ते खऱ्या इच्छांचं विपर्यस्त स्वरूप असतं.

त्यांचा खरा अर्थ छुपा असतो व तो शोधून काढावा लागतो. उदाहरणार्थ, स्वप्नात खोका किंवा गुहेसारखी एखादी पोकळ वस्तू दिसत असेल तर ती गर्भाशयाचं प्रतीक असते किंवा एखादी लोंबणारी वस्तू दिसत असेल तर ती पुरुष जननेंद्रियाचं प्रतीक असते. आपल्या सुप्त इच्छा, वासना स्वप्नांच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.

यातल्या काही इच्छा तत्कालीन, तर काही बालपणी अपुऱ्या राहिलेल्या, दडपलेल्या असतात. त्यांचं मिश्रण स्वप्नांत होतं आणि ते वेगळ्याच स्वरूपात बाहेर येतं. या स्वप्नांपैकी काहीच पूर्णपणे आणि संगतवार आठवतात. काही अर्धवट आठवतात. त्यातल्या प्रतिमाही सर्वसामान्यांसाठी अनाकलनीय असतात. अशा स्वप्नांचा अर्थ लावून मानसिक उपचार करण्याची पद्धती फ्रॉइडनं विकसित केली. त्याआधी त्यानं स्वतःच्या स्वप्नांचं विश्‍लेषण करून स्वतःवरही काही प्रयोग केले.

जाणिवा, अनुभव, स्मृती, संवेदना, बालपणीचे अनुभव अशी स्वप्नसामग्री कशी गोळा केली जाते; स्वप्नांच्या प्रगट व अप्रगट अर्थांचा एकमेकांशी काय संबंध असतो, स्वप्नांचा आपल्या जागेपणीच्या जीवनाशी कसा दृढ संबंध असतो, याची तपशीलवार मांडणी फ्रॉइडनं केली आहे. शिवाय शारीरिक बदल स्वप्नांना कशी सामग्री पुरवितात, हेही त्यानं उलगडून दाखवलं आहे. स्वप्नांची चर्चा करताना त्यानं मांडलेला ईडिपस गंडाचा सिद्धांत हा मनोविश्‍लेषणातील महत्त्वाचा सिद्धांत आहे. ईडिपस गंड म्हणजे लहान मुलांना विरुद्धलिंगी पालकांबद्दल वाटणारं लैंगिक आकर्षण आणि समलिंगी पालकांबद्दल वाटणारी स्पर्धात्मक भावना.

स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्याचं कुतूहल आदिम असतं. विशिष्ट स्वप्नांचे वेगवेगळे अर्थ लहानपणापासून आपल्या कानांवर पडत असतात. पूर्वापार समजुतींशिवाय किंवा निरीक्षणाशिवाय या विश्लेषणांना फारसा आधार नसतो. स्वप्नमीमांसा या महत्त्वाच्या तंत्राची ओळख करून देणारं हे पुस्तक म्हणूनच आगळंवेगळं ठरतं.

मानसशास्त्राच्या क्षेत्रात प्रचंड साधना केलेल्या, मनोविश्‍लेषणाचे पितामह म्हणून ज्यांना संबोधले जातं अशा मानसशास्त्रज्ञानं, फ्रॉइडनं ते लिहिलेलं असल्यामुळं या पुस्तकाचं महत्त्व मोठं. या माध्यमातून स्वप्नोपचारांबद्दल फ्रॉइडनं सर्वसामान्यांत केलेली जागृती हे त्याचं महत्त्वाचं कार्य मानलं जातं. म्हणून या पुस्तकास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. मानसशास्त्रातील अभिजात पुस्तक म्हणून त्याचा गौरव केला जातो.

जर्मनीत सन १९३३ मध्ये नाझींनी फ्रॉइडच्या ग्रंथांची होळी केली. दुसऱ्या महायुद्धात सन १९३८ मध्ये ऑस्ट्रिया पादाक्रांत केल्यावर जर्मन नाझींनी फ्रॉइडला व्हिएन्ना सोडून जाण्यास भाग पाडलं. तो ज्यू होता. शिवाय हुकूमशहांना विज्ञानाचं, वैज्ञानिक विचारांचं वावडं असतं. जगाचा इतिहास आणि सध्याचं वर्तमानही तेच सांगतं आहे. तेथून तो लंडनला गेला आणि तेथेच सन १९३९ मध्ये त्याचं कर्करोगानं निधन झालं.

फ्रॉइडनं मानवी मनाच्या गुंतागुंतीची स्वप्नांच्या माध्यमातून उकल करण्याचा प्रयत्न केला. स्वतःतील अंतर्विरोधांचा बळी होण्याचं माणसाचं भागधेय त्यानं ओळखलं. त्याचं शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण केलं. संस्कृतीच्या नावानं दडपल्या जाणाऱ्‍या कामप्रेरणेला लखलखीत उजेडात आणलं. ईडिपस गंडासारखे क्रांतिकारी सिद्धांत मांडताना मानवाच्या आदिम प्रेरणा नाकारता येणार नाहीत याकडं त्यानं अंगुलिनिर्देश केला.

मानसशास्त्र हा विषय मुळात क्लिष्ट. त्यात फ्रॉइडचा संशोधन विषय आणखी कठीण. तो मराठीत अस्सलतेनं उतरवणं आव्हानात्मक. गोयल प्रकाशनानं हे पुस्तक मराठीत आणलं आहे. पण हे भाषांतर तितकंस परिणामकारक नाही, शिवाय ते क्लिष्टतेकडं झुकणारं आहे. फक्त विषय समजून घ्यायचा असेल तर ते वाचायला हरकत नाही.

इंग्रजी वाचनाची आवड असणाऱ्यांनी मूळ इंग्रजी पुस्तक वाचलेलंच बरं! दुनियेतील बहुतांश लोक या ना त्या मानसिक आजाराचे बळी असतात. त्यांना त्याचं आकलन झालेलं नसतं इतकंच. ते करून घ्यायचं असेल तर मानसशास्त्राच्या अभ्यासाला पर्याय नाही. फ्रॉइड म्हणतो, ‘मानवी मन हे हिमनगासारखं असतं. त्याचा एक सप्तमांश भागच पाण्यावर दिसतो.’

माणूस रानटी अवस्थेतून बाहेर पडून सुसंस्कृत बनला. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी होती. सुसंस्कृततेची झूल पांघरणाऱ्या माणसाचं अंतरंग मात्र आदिमच असतं. बाह्यता तो सभ्य भासत असला तरी आदिम, जंगली प्रेरणा त्याच्या अर्धचेतन, निद्रिस्त मनात पिंगा घालत असतात. कृत्रिमरीत्या सुसंस्कृत बनलेलं मन या प्रेरणांना आवर घालतं, त्यांचं दमन करतं. मग मनोविकृतीच्या स्वरूपात त्यांचा आविष्कार होतो. काहींच्या बाबतीत तो तीव्र असतो, तर काहींच्या बाबतीत सौम्य. या साऱ्याचं विश्‍लेषण करून मनोविकृतीचं निवारण करण्याचं शास्त्र फ्रॉइडनं विकसित केलं. मानवजातीवर त्यानं केलेले हे उपकार आपल्याला कदापि विसरता येणार नाहीत.

रात्र भरात आलेली असताना पडणारी चित्र-विचित्र स्वप्नं बऱ्याचदा आपल्याला घाम फोडतात. ‘रुला के गया सपना मेरा...’ अशी अवस्था होते. ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है...’ अशी ती अंगावर शहारे आणणारी गुलाबी स्वप्नं नसतात. जाग आल्यावर दुःस्वप्नांचे तपशील नीट आठवत नाहीत. असं का होतं, ते फ्रॉइडनं सांगितलेलंच आहे. तेव्हा आपल्या स्वप्नांचा अर्थ लावायचा असेल, आपल्या भल्याबुऱ्या वर्तनामागची कारणमीमांसा करायची असेल, आपल्या दैनंदिन संपर्कात येणाऱ्यांच्या वर्तनामागचा कार्यकारणभाव समजून घ्यायचा असेल तर फ्रॉइडनं प्रचंड कष्ट उपसून लिहिलेलं हे पुस्तक वाचायलाच हवं. चला तर मग जाऊ या दूर जाणाऱ्या वाटेवरील ‘...स्वप्नामधील गावा!’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com