Pomegranate : डाळिंबाचे आरोग्यदायी महत्त्व

डाळिंबाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. विविध पोषक घटकांचा स्रोत म्हणून डाळिंब ओळखले जाते. डाळिंबामध्ये विविध पोषक घटक, खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
Pomegranate
PomegranateAgrowon

राहुल डमाळे, डॉ. आर. ए. मराठे, गजानन फुके

डाळिंबाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड (Pomegranate Cultivation) होते. विविध पोषक घटकांचा स्रोत म्हणून डाळिंब (Pomegranate) ओळखले जाते. डाळिंबामध्ये विविध पोषक घटक, खनिजे मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, अँथोसायनिन्स, प्युनिकिक ॲसिड, एलाजिटानिन्स, अल्कलॉइड्स, फ्रुक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज तसेच लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम ही खनिजे मुबलक प्रमाणात असतात. डाळिंबामध्ये ॲन्टिऑक्सिडंट गुणधर्म (Antioxidant Properties In Pomegranate) असतात. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. रक्तदाब नियंत्रणात राहतो. डाळिंबाच्या रसाच्या (Pomegranate Juice) सेवनामुळे हृदयाचे कार्य सुधारते. हृदयरोगापासून बचाव होतो. तसेच कर्करोग पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते.

डाळिंब झाडाच्या सर्व भाग जसे फळे, फळांची साल, पाने, फुले, मुळ्या तसेच झाडाच्या सालीचे विविध आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे डाळिंबाचे सेवन लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी करणे आवश्यक आहे.

पोषक घटकांचे प्रमाण ः

घटकद्रव्ये---प्रमाण (टक्के) किंवा प्रति १०० ग्रॅम

१.पाणी---७८%

२.प्रथिने---०.६%

३.स्निग्ध पदार्थ---०.१%

४.कर्बोदके---१४.५%

५.तंतुमय पदार्थ---५.१%

६.खनिजे---०.७%

७. कॅल्शिअम---१० मिलिग्रॅम

८.लोह---०.२ मिलिग्रॅम

९.जीवनसत्त्व क---१४ मिलिग्रॅम

आयुर्वेदामध्ये डाळिंबाला विशेष महत्त्व आहे. विविध औषधांच्या निर्मितीसाठी डाळिंबाचा वापर करण्यात येतो. डाळिंब फळ, ज्यूस, मुळे, फुले, बियांचे तेल, खोडाची साल आणि दाण्यांचा वापर वेगवेगळ्या आजारांमध्ये उपचार पद्धतीसाठी केला जात असे.

डाळिंब फळाचे महत्त्व ः

- शरीरातील वात आणि कफाचे त्रास कमी होतो.

- हातपायांची आग होणे, अंगाची आग होणे, मूत्रविसर्जनावेळी जळजळ होणे आदी विकारांसाठी गुणकारी आहे.

- हृदयाच्या विविध आजारांसाठी डाळिंब बिया गुणकारी असतात.

- लहान-मोठ्या आतड्यांच्या पेशींच्या आकुंचन-प्रसरणाचे कार्य सुरळीत ठेवण्याचे कार्य पूर्ण पिकलेले डाळिंब फळ करते.

- डाळिंबाच्या मुळ्या या जंतुनाशक आहेत.

- डाळिंबाची साल आणि बियांचे चूर्ण वाताच्या आणि कफदोषावर गुणकारी आहे.

- अपक्व डाळिंब फळांचा रस पचनास उपयुक्त मदत करतो.

- उलट्यांच्या त्रासामध्येही डाळिंब फायदेशीर ठरते.

- डाळिंबाच्या नियमित सेवनाने मेंदूचे आजार, मूत्रपिंडाचे विकार उद्‌भवत नाहीत.

- डाळिंबाच्या फळाची साल, फूल, धणे, मिरी किंवा दालचिनी यांचे मिश्रण अतिसारावर गुणकारी आहे.

- पिकलेल्या फळातील बिया आणि रस पोटातील वायुदोष कमी करण्यास मदत करतात.

Pomegranate
Pomegranate : आंबिया बहराच्या डाळिंब बागेतील व्यवस्थापन

डाळिंब रसाचे फायदे ः

- गोड डाळिंबाचा रस हे तृप्त करणारे पेय आहे. अशक्तपणामध्ये डाळिंब रसाचे सेवन करावे.

- डाळिंबाचा रस पित्तशामक, रोगप्रतिकारक आहे.

- डाळिंब रसाच्या सेवनामुळे भूक वाढते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

- खडीसाखर आणि डाळिंब रस यांचे सेवन केल्यास पोटातील जळजळ, आंबट ढेकर आणि लघवीवेळी होणारी आग कमी होते.

- ताप अधिक वाढल्यास घशातील कोरड, लघवीचा त्रास आणि जळजळ कमी करण्याकरिता डाळिंबाचा रस उपयुक्त आहे.

- डाळिंब रसाचे सेवन केल्यास त्वरित ताजेतवाने वाटते.

- यकृत, हृदय व मेंदूचे आजार कमी होतात व कार्यक्षमता वाढत.

- अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळिंब रस गुणकारी आहे.

- डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.

- शरीरातील उष्णता कमी होते.

- डोळे येणे या संसर्गजन्य आजारात जास्त प्रमाणात डोळ्यांचे जळजळ होते. अशावेळी डाळिंब रसाचे २ थेंब डोळ्यात टाकल्यास आराम मिळतो.

- उच्च रक्तदाबावर डाळिंब रस गुणकारी मानला जातो.

- डाळिंब रस कफनाशक आहे. रसातील टॅनिन व अॅक्झालिक आम्ल कफनाशक आणि अनेक व्याधींवर गुणकारी आहे.

Pomegranate
Pomegranate : नुकसानग्रस्त डाळिंब उत्पादकांना मदत द्यावी

डाळिंब झाडाच्या विविध भागांचे फायदे ः

१) सालीचा उपयोग ः

- पोटातील कृमी नष्ट करण्यासाठी उपयुक्त.

- सालीचे चूर्ण हिरड्यांमधला रक्तस्राव व हिरडेदुखी या आजारावर गुणकारी आहे.

- काही कारणाने घसा दुखत असेल तर हळदीसोबत सालीचा काढा घ्यावा. आराम मिळतो. वारंवार त्रास होत असल्यास, ताकासोबत सालीचा काढा घ्यावा.

- उन्हाळ्यात बऱ्याच लोकांच्या नाकातून रक्त येते. अशावेळी सालीचा अर्क उपयुक्त ठरतो.

- सालीपासून आयुर्वेदिक दंतमंजन तयार करता येते. या दंतमंजनाने दात घासल्यास दात पांढरेशुभ्र व बळकट होतात.

- डाळिंबाच्या सालीपासून टॅनिन हा घटक मिळतो. याचा विविध औषधांच्या निर्मितीमध्ये वापर केला जातो.

पानांचा उपयोग ः

- डोळ्यांना जळजळ होत असल्यास डाळिंबाच्या पानांचा लेप करून पापण्यांवर लावावा. जळजळ कमी होते.

- अनेकांना अतिप्रमाणात घाम येतो. घामामुळे शरीराला दुर्गंधीयुक्त वास येतो. अशावेळी पानांचा रस काढून त्याने मालिश करावी. दुर्गंधी कमी होते. त्वचा उजळते.

फुलांचा उपयोग ः

- फुलांचे चूर्ण करून त्याचे सेवन केल्यास जुलाब कमी होतात.

- फुलांचे चूर्ण क्षयरोगावर अतिशय गुणकारी असते.

- नाकातून रक्त येत असल्यास डाळिंब फुलांच्या रसाचे २ थेंब नाकात टाकावेत.

- शारीरिक जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी फुलांचे चूर्ण करून लावावे.

मुळ्यांचा उपयोग ः

- डाळिंबाच्या मुळ्यांचा काढा रिकाम्यापोटी घेतल्यास पोटदुखी थांबते.

- लहान मुलांच्या पोटात जंत होतात. जंतावर डाळिंब मुळ्यांचा काढा गुणकारी असतो.

डाळिंब झाडाच्या सालीचा उपयोग ः

- डाळिंब झाडाच्या सालीला तुरट चव असते. ही साल चघळल्यास तोंडाला सतत पाणी सुटणे, अति प्रमाणात थुंकी येणे आदी दोष कमी होतात.

- झाडाच्या सालीचे चूर्ण घेतल्यास जुलाब थांबतात.

- नाकातील रक्तस्राव थांबविण्यासाठी झाडाची साल गुणकारी आहे.

-----------------------

- राहुल डमाळे, ९०९६०७६९९५

(राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com