खाण्यायोग्यच नव्हे, तर आरोग्यवर्धक फुले!

सामान्यतः फुलांचा वापर हार, गजरे आणि सुशोभीकरणासाठी केला जातो. मात्र काही फुले ही खास खाण्यासाठीही पिकवली जाऊ शकतात. हे थोडेसे आपल्याला वेगळे वाटले तरी अगदी प्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रकारची फुले ही आहारामध्ये वापरली जातात.
Edible Flower
Edible FlowerAgrowon

किशोर चव्हाण

सध्या प्रामुख्याने वेगवेगळ्या खाद्य डिशेसमध्ये रंग, चव, स्वाद आणि आकर्षकपणा आणण्यासाठी फुलांचा (Flower) वापर केला जातो. त्यासाठी काही फुलांचे उत्पादनही (Flower Production) शेतकरी आपल्या शेतांमध्ये किंवा महिला आपल्या परसबागेमध्ये घेत असतात. प्राचीन ग्रीस, रोम, मध्ययुगीन फ्रान्स, युरोप, व्हिक्टोरियन इंग्लंड किंवा मध्य पूर्वेतील देश यापासून चीन आणि जपानसारख्या आशियायी देशांमध्ये आहारामध्ये काही फुलांचा (Flower Use In Food) वापर केला जात असल्याचे हजारो वर्षांपासूनचे दाखले आहेत. पारंपरिक घरगुती औषधांमध्ये काही रोगांवरील उपचारांमध्ये त्यांचा वापर केला जाई. आपल्या आजूबाजूला असंख्य फुले असली तरी त्यातील खाण्यायोग्य फुले (Edible Flower) नेमकी कोणती असा प्रश्‍न पडू शकतो. त्यावर शास्त्रज्ञ काम करत असून, बिनविषारी आणि पौष्टिकतेसोबत औषधी गुणधर्माबाबत अभ्यास केला जात आहे. त्यातून त्यांची अन्न घटक स्वीकाहार्यता वाढेल, संभाव्य धोके टाळता येतील. सध्या देशविदेशामधील खाण्यायोग्य फुलांची माहिती घेऊ.

गुलाब

पारंपरिक भारतीय आणि चिनी औषधांमध्ये गुलाबाला विशेष स्थान आहे. त्यातील फिनोलिक घटकांमुळे गुलाबामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. जीवनसत्त्वेही मुबलक असून, शीत प्रकृतीचे मानले जातात. हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करतात.

जास्वंद

अनेकदा सॅलडमध्ये सजावटीसाठी वापरले जाते. जास्वंदीच्या फुलांपासून चहा तयार केला जातो. त्यातील अँथोसायनिन्स आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

झेंडू

आपल्याकडे प्रामुख्याने हारासाठी वापरले जाणारे या फुलांचा चिनी लोक चहा करतात. त्याच प्रमाणे या फुलांमध्ये जखमा बऱ्या करण्याची क्षमता आहे. या फुलातील रंगद्रव्य हे ल्युटीनने भरपूर असून, डोळ्यांचे आजार दूर ठेवण्यास मदत करते.

शेवंती

चीनमध्ये अनेक वेळा शेवंतीची फुले चहामध्ये टाकून उकळली जातात. या फुलांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे जास्त असून, कर्करोगविरोधी आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात.

सूर्यफूल

या आकर्षक फुलांची चव कडवट गोड असते. त्यात जीवनसत्त्व ई मुबलक असते. काही ठिकाणी हे संपूर्ण फूल वाफवून खाल्ले जाते.

तुळस

जातीनुसार तुळशीची फुले किंवा मंजिरी पांढऱ्या आणि गुलाबी ते जांभळ्या अशा विविध रंगांची असतात. त्यांना पानांपेक्षा सौम्य चव असते. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्हॅनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात.

लव्हेंडर फुले

ही फुले सुवासिक असून, आइस्क्रीम आणि दह्याचा स्वाद वाढवण्यासाठी वापरली जातात. त्याच प्रमाणे त्यात पू विरोधी (अँटिसेप्टिक) गुणधर्म असतात. केसातील कोंड्यापासून मुक्ततेसाठी उपयोगी ठरतात.

कॅमोमाइल

कॅमोमाइल सामान्यतः हर्बल चहामध्ये वापरले जाते. त्यात दाहक-विरोधी, कर्करोग विरोधी आणि जखमा बरे करण्याचे गुणधर्म असल्याचे मानले जाते. थंड, कार्मिनिटिव्ह आणि स्पास्मोलाइटिक गुणधर्मांमुळे त्वचेवर लावण्याच्या मलमामध्ये वापर करतात. तसेच दाहकविरोधी गुणधर्मामुळे अनेक औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांमधील कॅमोमाइल हा लोकप्रिय घटक आहे.

चमेलीची फुले

हे सुवासिक फूल सुगंधासाठी हर्बल चहामध्ये, भातामध्ये आणि सॅलडमध्ये वापरले जाते. त्यात कर्करोगविरोधी व विषाणूरोधक गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. चमेलीचा चहा रक्तदाब कमी करतो. हे फूल ऊर्जावर्धक आणि जोश वाढवणारे असून, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. त्याचप्रमाणे वृद्धत्वाची प्रक्रिया नियंत्रित करत असल्याचे मानले जाते. निद्रानाश नियंत्रण, वजन कमी करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणामध्ये उपयोगी आहे.

व्हायलेट्स

या सुंदर फुलांना एक गोड चव आणि स्वर्गीय सुगंध आहे. ते सॅलड म्हणून वापरले जाते. सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे या आजारांवरील पारंपरिक औषधांमध्ये त्याचा समावेश असतो.

कार्नेशन

ही गोड व सुवासिक फुले तणाव, गॅस, जळजळ आणि मळमळ कमी करण्यासाठी उपयोगी आहेत.

पॅन्सी

ही मोठी, चमकदार रंगाची फुले पोटॅशिअम आणि अन्य खनिजांनी समृद्ध आहेत. ती हृदय, मूत्रपिंड आणि रक्तदाबाच्या विकारावर फायदेशीर आहेत. पॅन्सी फुले फ्रूट सॅलड, क्रीम चीज स्प्रेड, उन्हाळी कॉकटेल आणि पेयांमध्ये उत्तम काम करतात.

नॅस्टर्टियम

काळी मिरीसारख्या मसालेदार चवीमुळे नॅस्टर्टियम हे फूल विविध पाककृतीमध्ये वापरले जाते. याची फुले व पाने दोन्ही खाण्यायोग्य आहेत. ही केशरी, पिवळ्या रंगाची फुले केक, पेस्ट्री आणि सॅलड्स सजविण्यासाठी वापरली जातात.

कमळ

कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. या फुलामध्ये मानवी शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता आहे. चविष्ट सॅलड डिशमध्ये कमळाच्या मुळाचे तुकडे वापरले जातात. फक्त मसालेदार मुळांच्या तुकड्यांना काश्मीरमध्ये नाद्रू म्हणतात. अन्य उत्तर भारतीय प्रदेशांमध्ये ते रोगन जोश आणि याखनी सारख्या प्रसिद्ध ग्रेव्हीजमध्ये (रस्सा) वापरले जाते. कमळ फुलाच्या बियांपासून लाह्या बनवतात, त्यांना फूलपताशा किंवा मखना म्हणतात. हर्बल चहामध्ये त्याचा वापर केल्यास रक्तस्राव आणि हृदयाशी संबंधित गुंतागुंत थांबवण्यास मदत होते. बिया मूत्रपिंडविकार, रागीटपणा आणि हृदयासाठी फायदेशीर आहेत. अस्वस्थता, धडधडणे आणि निद्रानाश बरे करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, पोटॅशिअम आणि प्रथिनांचे चांगले प्रमाण असल्यामुळे ‘जिम स्नॅक’ म्हणून वापरले जाते.

कॅलेंडूला

या वनस्पतीची पाने आणि पाकळ्या खाण्यायोग्य आहेत. पाने सामान्यत: कडसर असून, ती सॅलडमध्ये वापरली जातात. ताज्या पाकळ्यांचा वापर सजावट म्हणून केला जातो. मसाला किंवा पारंपरिक पिवळ्या चीजनिर्मितीमध्ये या फुलांचा वापर करतात. कॅलेंडूला फुले औषधे, कापड, खाद्यपदार्थ आणि सौंदर्यप्रसाधनांसाठी रंग म्हणूनही पूर्वीपासून वापरली जातात.

--------------

किशोर चव्हाण, ७३५०९६०९७५

(आचार्य पदवी विद्यार्थी, फ्लोरिकल्चर ॲण्ड लँडस्केप आर्किटेक्चर विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com