
तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम येथील उदया अॅग्रो फार्म या कंपनीने आरोग्यदायी तांदळाचे वाण विकसित केले आहे. हे वाण ग्लुटेन फ्री (Gluten-Free Rice) आणि कमी ग्लाइसेमिक इंडेक्स (Glycemic Index) असलेले आहे. कंपनीने या तांदळाचे पेटंटही (Rice Patent) मिळवले आहे. व्हिलेज राईस (Village Rice) या ब्रॅडने या तांदळाची विक्री केली जाणार आहे. विशेष म्हणजे कोणतीही जनुकीय सुधारणा न करता हे वाण विकसित करण्यात आले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. परंजोती यांनी ही माहिती दिली.
गेल्या काही वर्षांमध्ये लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढली आहे. अनेक जण फिटनेसकडे लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे फिट राहण्यासाठी लोक बऱ्याचदा वेगवेगळे डाएट फॉलो करत असल्याचं दिसून येतं. यामध्येच सध्या ग्लुटेन-फ्री डाएट हा नवा ट्रेंड आला आहे. ग्लुटेन असलेल्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे पचनक्रिया काही अंशी मंदावते. परंतु, ग्लूटेन फ्री डाएट सुरु केल्यावर पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. परिणामी, अन्नपचन नीट झाल्यामुळे वजनदेखील नियंत्रणात राहतं. त्यामुळे विविध राज्यातील शासकीय संस्था, खासगी संस्था ग्लुटेन फ्री अन्नधान्य उत्पादनावर भर देत आहेत.
तामिळनाडू राज्यातील उदया अॅग्रो फार्म ही कंपनी पिकांचे पौष्टिक मूल्य वाढविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने विविध पिकांची लागवड करते. तांदळाचे हे वाण विकसित करण्यासाठी तांदळाच्या हजारो जातींची तपासणी केली गेली. त्यातून सर्वाधीक पौष्टिक घटक असलेले तांदळाचे वाण निवडले गेले. म्युटेशन प्रजनन तंत्र, संकर आणि निवड पद्धत यासारख्या शास्त्रीय पद्धतींचा वापर या वाण निर्मितीसाठी करण्यात आला.
वाणाची अनुवांशिक शुद्धता राखण्यासाठी धान्याचे उत्पादन प्रमाणित बियाण्यापासून न करता पायाभूत बियाण्यापासून केले. आहारातील फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण तपासण्यासाठी धान्याची जैवरासायनिक चाचणी केली. पौष्टिक घटकांचे प्रमाण राखण्यासाठी तांदळावर विकसित तंत्रज्ञानाने प्रक्रिया होते. साठवणुकीत किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तांदळातील ओलाव्याचे प्रमाण योग्य ठेवले जाते. तांदळाचे शेल्फ-लाइफ वाढविण्यासाठी स्वयंचलित व्हॅक्यूम पद्धतीने तांदळाचे पॅकींग केले जाते. कंपनीने २०२१ मध्ये हवाई आणि सागरी मार्गाने घाना आणि येमेन देशाला ४.५ टन तांदळाची निर्यात केली आहे. या तांदळाप्रमाणेच मका आणि ज्वारी पिकातील पौष्टिक जाती शोधण्यासाठी कंपनीद्वारे प्रयत्न केले जात आहेत.
आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर
या तांदळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे मानवी शरिरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय आतड्याचे आजार रोखणेही शक्य होते. या तांदळाचा ग्लाइसेमिक इंडेक्स ४९ टक्क्यांपेक्षा कमी आहे. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणे म्हणजे या तांदळाचे सेवन केल्यास रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. त्यामुळे रक्तातील साखरेची प्रमाणही नियंत्रित राहते. ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. मधुमेह आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा वाण उपयुक्त आहे. लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी हा तांदूळ फायदेशीर आहे. याशिवाय पॉलीश केल्यानंतरही या तांदळातील फायबरचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने या तांदळाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजीने व्हिलेज राईसची चाचणी केली असून त्यात १४.०१ टक्के प्रथिने असल्याचे आढळून आले आहे. या कंपनीला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. इतर वाणांच्या तुलनेत या तांदळातील फायबरचे प्रमाण १३.८ टक्क्यांहून अधिक आहे. अशी माहिती जी. परंजोती यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.