शहर, जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले

आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर भागांत झाडे पडल्याच्या घटना
शहर, जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले
Heavy RainAgrowon

पुणे ः मॉन्सूनपूर्व पावसाने (Pre-monsoon Rain) शुक्रवारी (ता.१०) आणि शनिवारी (ता. ११) शहर आणि जिल्ह्याला झोडपले. शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसाने आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर भागांत पावसाच्या (Rain) सरी कोसळल्या. यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. तर, अनेक ठिकाणी नागरिकांची त्रेधा उडाली.

आंबेगाव तालुक्‍यातील मंचर, अवसरी खुर्द, भोरवाडी, पिंपळगाव खडकी, शेवाळवाडी व अवसरी फाटा परिसरात शनिवारी (ता. ११) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. विजेचाही कडकडाटही सुरू होता.

या पावसामुळे मंचर शहरातील रस्त्यावरून पाणी वाहत होते. पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत असल्याने पिंपळगाव चौक, मुळेवाडी चौक व गेटवेल हॉस्पिटलजवळ बराच वेळ वाहतूक कोंडीही झाली होती. टपाल कार्यालयाजवळ भाजीपाल्याचा बाजार भरतो. तेथे पाऊस व वाहत्या पाण्यामुळे विक्रेत्यांचे हाल झाले.

अवसरी खुर्द गावात काही ठिकाणी घरात पाणी शिरले. पाणी घराबाहेर काढण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती. अवसरी खुर्द, भोरवाडी, गावडेवाडी येथे शेतात ठेवलेल्या कांदा आरणीचे संरक्षण व्हावे म्हणून ताडपत्री टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. वीटभट्ट्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस उघडल्यानंतरही बराच वेळ वीजपुरवठा बंद होता. गेले दोन-तीन दिवस पाऊस अधूनमधून पडत असून, वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे अनेक नळ पाणीपुरवठा योजनांवर मोठा परिणाम झाला.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई, कान्हूर मेसाई परिसरात शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी पाच वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावली. कवठे येमाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील वडाचे जुने झाड दोन चारचाकी वाहनांवर कोलमडून पडले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

ढाकीवस्ती परिसरातही शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने ओढ्याला पूर आला होता. वाऱ्यामुळे घरावरील पाण्याच्या टाक्या उडून जाण्याचे प्रकार घडले. कान्हूर मेसाई परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यात काही लहान-लहान तलाव पाण्याने भरले. या पावसामुळे शेतातील पिकांना चांगला दिलासा मिळाला. त्यामुळे या परिसरात शेतीच्या कामांना वेग येणार आहे. पाऊस व वाऱ्यामुळे रात्रभर वीज खंडित झाली होती. शनिवारी (ता. ११) ढगाळ वातावरण होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com