Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधारेने दाणादाण

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. जिल्ह्यातील अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळित झाली.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नागरिकांची दाणादाण उडाली. जिल्ह्यातील अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळित झाली. कुडाळ तालुक्यातील २७ आणि बांदा परिसरातील काही गावांचा शहरांशी संपर्क तुटला. समुद्राला देखील उधाण (Sea Tide) आले आहे. वाऱ्याचा वेग वाढला आहे. धरणांमध्ये देखील पाण्याची आवक (Water Inflow) मोठ्या प्रमाणात सुरू आहे. फळबागा (Orchard), भातशेतीमध्ये (Paddy Farming) पुराचे पाणी घुसले आहे.

Heavy Rain
Rain Update : राज्यात कुठे झाला धुव्वांधार पाऊस?

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी (ता.८) पहाटेपासूनच जिल्ह्यात संततधार सुरू होती. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम आहे. कुडाळ तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील आंबेरी पुलावरून दोन-तीन फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे या भागातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. बांदा परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तेरेखोल नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील आळवाडी मच्छी मार्केट ते कट्टा कॉर्नर शिवाजी चौक रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक दिवसभर बंद होती.

बांदा -सावंतवाडी मार्गांवर इन्सुली दारू कारखान्याजवळ रस्त्यावर तब्बल ३ फूट पुराचे पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. विलवडे-माणयेहोळ येथे तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पुराच्या शक्यतेने ग्रामस्थांनी सामानाची आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे. दोडामार्ग तालुक्याला देखील पावसाने झोडपून काढले.

वेंगुर्ले तालुक्याला पावसाने झोडपून काढले. या तालुक्यातील होडावडा पुलावर पुराचे पाणी चढले. सावंतवाडी तुळस मार्गे वेंगुर्ले रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. नद्यांचे पाणी शेतात घुसल्याने भातशेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे. या शिवाय फळबागांमध्ये देखील पुराचे पाणी शिरले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com