अशी जिवावरची जोखीम किती व्यवसायांत आहे?

शेतकरी शेती स्वत:साठी करीत असले, तरी ते अन्न काही केवळ आपल्यापुरतं पिकवत नाहीत. ते अन्न सगळेच खातात. शेतकरी आतबट्ट्याची शेती करून देशाच्या जीडीपीत भर घालतात. शेतीत जिवावरच्या जोखमीच्या बाबीत केवळ साप नाहीत. अतिवृष्टी आहे, वादळ आहे. आकाशातील विजेबरोबरच मानवनिर्मित विद्युतही आहे. पावसाळ्यात या दोन्ही विजेमुळं शेतकरी, त्याची गुरंढोरं मरण पावल्याच्या घटना घडतात. कमी पाऊस असो की अति पाऊस; तो पिकांचं होत्याचं नव्हतं करतो... आणि एवढ्यातून पिकवलेल्या शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी सरकारसह सगळेच टपून बसलेले असतात. एवढ्या जिवावरच्या जोखमीचे आणखी कोणते व्यवसाय आहेत? शेकडो निरर्थक बाबींचं कोडकौतुक देशभर चालू असतं. आणि जिवावरची जोखीम पत्करून अन्न पिकवणारा शेतकरी हा टिंगल टवाळीचा, द्वेषाचा, कीव करण्याचा विषय बनतो.
Agriculture
Agriculture Agrowon

मी  जेव्हा केव्हा शेतीतील शारीरिक कष्ट, जोखीम आणि त्याच्या फलिताबद्दल लिहितो, तेव्हा काही पांढरपेशे हमखास त्यांचं मत नोंदवतात- हे सगळ्याच व्यवसायात आहे...शेतीला वेगळा मापदंड कसा लावता येईल? मी त्यांना उत्तर देत नाही. कारण हे असं बोलणारे लोक अज्ञानी नाहीत. त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेली ही भूमिका आहे. त्यांचा शेती आणि शेतकऱ्यांकडं बघण्याचा दृष्टिकोन विकृत आहे. शेतकरी म्हणजे कर न देणारे, शासनाकडून फुकट अनुदान, सवलती लाटणारे, ऐश करणारे, गर्भश्रीमंत, मजूर विरोधी... वगैरे वगैरे. ही बहुतांश पांढरपेशांची शेतकऱ्यांबद्दलची मतं आहेत. बरेच पढतपंडित, नामवंत म्हणवले जाणारे संपादक, शहरी विचारवंतही शेतकऱ्यांकडे याच नजरेने बघतात. यांनी झोपेचं सोंग घेतलेलं असल्यानं त्यांना जागं करणं शक्य नाही. त्यामुळे मी त्यांच्यासाठी काही लिहीत नाही. एक कोरडवाहू शेतकरी म्हणून मला जे अनुभव येतात ते मांडत राहतो.

Agriculture
China Drought : दुष्काळामुळे चीनमध्ये धान्य उत्पादन घटणार

हा जो मी ताजा अनुभव नोंदवतोय, तो माझ्यासाठी नवा नाही. एखाद-दुसरा अपवाद वगळता गेल्या दहा वर्षांपासून मी हे काम करतोय. बारा दिवसांपूर्वी मी आमच्या शिरूर ताजबंद (जि. लातूर) येथील शेतातून बाहेर पडलो तेव्हा सोयाबीनची सर्वसाधारण परिस्थिती चांगली होती. दीड-दोन एकर रानाला पाणी लागून झालेलं नुकसान मी विसरूनही गेलो होतो. कोकणात नरवण आणि पुण्याला जाऊन मी २७ ऑगस्टला सायंकाळी शेतात परतलो. सोबत माझे लातूरचे मित्र डॉ. श्रीकांत गोरे हेही होते. आल्याबरोबर सोयाबीनमध्ये फेरफटका मारला तेव्हा भयंकर अस्वस्थ झालो. हे चित्र दिसेल अशी मी अजिबात कल्पना केली नव्हती. जवळपास आठ एकरांमधील सोयाबीनच्या रोपांनी माना टाकल्या होत्या. शेंगा भरण्याची नुकतीच सुरुवात झाली होती. पण पाणी नसल्याने, आत बी भरणं थांबलं होतं. काही शेंगा पाण्याअभावी पिवळ्या पडल्या होत्या. खालच्या बाजूने पानं पिवळी पडून गळत होती. हे चित्र बघून आतून हललो. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. विहिरीत भरपूर पाणी होतं. स्प्रिंकलर सेट होते... पण मी जागेवर नव्हतो! नेमक्या वेळी माझं नसणं किती नुकसानकारक ठरू शकतं, याचा अनुभव मी घेतला. पावसाच्या अंदाजावर विसंबून राहता येत नाही, हे लक्षात आलं नसावं.

मी येण्याआधी दोन दिवसांपासून नरेश आणि वामनने पाणी द्यायला सुरुवात केली होती. एकरभर रानाला त्यांनी पाणी दिलं होतं. पण मुळातच पाणी सुरू करण्याच्या निर्णयाला उशीर झाला होता.आता परिस्थिती गंभीर असल्याने युद्धपातळीवर पाणी देणं गरजेचं होतं. लाइटचा मोठा अडथळा होताच. मी मनोमन ठरवलं, आता फक्त हेच काम करायचं. माझी अस्वस्थता वामनच्या लक्षात आली असावी. तो म्हणाला, ‘रात्रीच आपण पाइप जोडून पाणी देऊ.’ एक तर नेमका नरेश बाहेरगावी गेला होता. शिवाय डॉ. गोरे सोबत होते. रात्री आठ वाजता गेटजवळ साप निघून एका दगडाखाली गेला. वामनने दोरीला बेडूक बांधून त्याच्यासमोर टाकला. तो पटकन बेडकाला घेऊन आत गेला. पुन्हा काही बाहेर आला नाही. हे सगळं बघून डॉ. गोरे म्हणाले, की रात्री सोयाबीनमध्ये पाणी द्यायला जाऊ नका. सकाळी काय करायचं ते करा. मी काही बोललो नाही. इच्छा असूनही ते टाळलं. मी गुगलवर बघितलं. आठवडाभर पावसाची शक्यता दिसत नव्हती. सकाळी वामनसोबत स्प्रिंकलरचे पाइप अंथरले आणि पाणी सुरू केलं. डॉक्टरांना हंडरगुळीचा बाजार दाखवून परत आलो. ते लातूरला परतले आणि मी कामाला लागलो.

Agriculture
Soybean Diseases : सोयाबीनला या रोगांचा धोका ?

लाइट जाऊन-येऊन मोटार चार तास चालली होती. दुपारी दोघांनी मिळून पाइप बदलले. परत येताना वामन म्हणाला, ‘रात्री पाणी देण्याचं नियोजन केलं तरच पाच-सहा दिवसांत पाण्याचा एक फेरा होईल. दिवसाच्या लाइटचं काही खरं नाही.’ मी नरेशला फोन केला. सायंकाळपर्यंत परत ये. रात्री पाणी द्यायचंय, असं म्हणालो. तो आला. आम्ही ठरवलं, चार तासांच्या फेऱ्याप्रमाणं रात्री दोन वेळा पाइपची जागा बदलायची. सायंकाळी सात वाजता फेरा सुरू झाला. अकरा वाजता उठायचं असल्यानं मी वाचत बसलो. वेळेवर मी दोघांनाही उठवलं. तिघेही विजेऱ्या घेऊन निघालो. माझ्याकडं हेडटॉर्च असल्याने दोन्ही हात रिकामे होते.

वावरात पाऊल टाकल्याबरोबर लक्षात आलं, की बूट-चप्पल काहीच चालणार नाही. तिघांनीही नागव्या पायाने पाइप आणि स्प्रिंकलरच्या नळ्या उचलणं सुरू केलं. त्यात दोन्ही हात गुंतलेले. सोयाबीनच्या ओळी उभ्या. आम्हाला आडवं चालणं भाग होतं. पायाखाली सोयाबीन तुडवलं जाणार नाही, याची काळजी घेत म्हणजे ढांगा टाकत आम्ही चालत होतो. त्यामुळे पायाखाली काय आहे ते बघणं आणि दिसणंही शक्य नव्हतं. मी वामनला म्हटलं, पायाखाली साप आला तर तो दिसणार कसा? तो बोलला, मालक मरण कधी चुकत नाही. साप चावून मरणार असलो तर तो चावंल...

ही सहज प्रतिक्रिया अंगावर शहारा आणणारी होती. पण वास्तव हेच होतं. सोयाबीनमध्ये रात्रीचं पाणी देणं ही जिवावरची जोखीम आहे. साप चावून शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना मी ऐकत, बघत, वाचत होतो. त्यामुळेच मी माझ्या गैरहजेरीत माझ्या सहकाऱ्यांना तुम्ही सोयाबीनला पाणी द्या, असं म्हणू शकत नव्हतो. ते माझ्या बुद्धीला पटणारं नव्हतं. मात्र मी जी जोखीम घेत होतो, त्यात त्यांना सहभागी करणं चुकीचं नव्हतं. सापाची भीती खरी आहेच... पण एक शेतकरी म्हणून पाण्याअभावी सोयाबीन वाळू देणं मी बघू शकत नव्हतो. शेवटी जे व्हायचं ते होईल... शेवटी वावरात मरण येणार असेल तर तसंच होईल... मरण तर अटळच आहे...

पाइप नेत असतानाच हे विचार मनात येऊन गेले. पाइपची जोडाजोड झाली. विहिरीवर येऊन मी मोटार चालू केली. पाच मिनिटं थांबलो. मध्येच एखादा पाइप निघतो. स्प्रिंकलरची एखादी नळी फिरत नाही. अशा वेळी मोटार बंद करून ती दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे काही वेळ थांबावं लागतं. नरेशचा फोन आला. मी गेटकडं आलो. तीन वाजता उठायचं असं ठरलं. अर्थात, दोघांनाही जागं करण्याची जबाबदारी माझी होती.

अंथरुणावर पडलो तेव्हा दोन्ही गुडघे, पिंढऱ्या, पायातून तीव्र वेदना होत होत्या. पिंढऱ्या लाकडासारख्या कडक बनल्या होत्या. हा अनुभव मला तसा नवा नव्हता. अंथरुणावर पडून बराच वेळ हाताने पिंढऱ्या दाबल्या. उजवा गुडघा जास्तच त्रास देत होता. सगळ्या वेदना वैविध्यपूर्ण होत्या. गुडघ्यातून निघणारी कळ आणि पिंढऱ्यातल्या वेदना सारख्या नव्हत्या. खांदे दुखत होते. शिवाय हातांच्या बोटांची आग होत होती. मी मनातल्या मनात म्हटलं, याची वर्णन करीत बसलो तर एखादं पुस्तकच होऊन जायचं. या कल्पनेने मस्त हसलो. नेहमीप्रमाणे एन्जॉय मूडमध्ये आलो. सगळ्या वेदनांना अदखलपात्र करून टाकलं. मोबाइलमध्ये तीनचा अलार्म लावून, पालथा पडलो. पण गुडघा टेकू देईना. पुन्हा सरळ पडलो. या कुशीवरून त्या कुशीवर. कधी गुडघे मुडपून पोटावर घ्यायचं...असं बरंच चालू होतं. यू-ट्यूबवर दर्दभरे गीत सुरू होते. प्रेम...विरह...पुन्हा हसलो. साला...सगळा वेडेपणा. वास्तवात नसलेलं... शेवटी सिनेमाच तो. तसाच पडून राहिलो. एखाद-दुसरी डुलकी लागली असावी. अलार्म वाजताच लगेच उठलो. दोघांना उठवून सोयाबीनच्या रानात गेलो.

या वेळचं काम अधिक त्रासदायक होतं. पाणदुहीमुळं पाइप ओलसर झाले होते. मातीला हात लागला, की हात चिकट व्हायचा. त्यामुळे पाइपच्या कड्या काढणं अधिक कठीण चाललं. काही कड्या पाइपमध्ये एवढ्या घट्ट रुतून बसलेल्या असतात, की त्या निघता निघेनात. ओढून ओढून हाताची बोट लाल होऊन आग व्हायची. एखाद्या वेळी नरेशला मदतीला बोलवावं लागायचं. पाणदुहीच्या पाण्यानं पार कमरेपर्यंत पँट ओली झाली. पायात चिखलाचा बूट तयार झाला. हं... झालं का? ..उचला... पाइप पुढं ढकला... मागे ओढा.. तुट्टी निघत नाही का?..कडी बसली का...एवढाच काय तो संवाद. शेवटी चारच्या सुमारास हे काम संपलं. परतताना बूट हातात घेऊन आलो. सगळे कपडे, अंग चिखलानं माखलं होतं. अंघोळ केली तेव्हा लक्षात आलं की पोटात आग पडलीय. शेंगदाणा चटणीवर तूप टाकून अर्धी भाकरी खाल्ली. अंथरुणावर पडलो. पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. त्यातही मोरांचे आवाज पांघरुणाच्या आतून कानापर्यंत येत होते. डोळे झाकून पडून राहिलो. अर्धवट गुंगीत.

सात वाजता नरेशचा फोन आला...मामा पाइप बदलून घेऊत...आलोच म्हणत उठलो. दिवसभरातही हेच सुरू आहे. सहा दिवसांपासून हाच दिनक्रम करीत सोयाबीनला पाण्याचा पहिला फेरा पूर्ण केला. तशाच वेदना, तशाच रात्री अनुभवल्या. हे केलं नसतं तर बारा एकरात दहा-पाच पोतेही सोयाबीन झालं नसतं. वीस-पंचवीस टक्के नुकसान झालंच आहे. पण बाकीचं तरी हातात पडण्याचा विश्‍वास निर्माण झालाय. हे समाधान या सगळ्या त्रासांवर मात करण्याची शक्ती देतं.

यातील लाइट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे पाणी देण्याची कामं रात्री करावीच लागतात. आमच्या परिसरात नाग, घोणस आणि मण्यार हे जहाल विषारी म्हणून ओळखले जाणारे साप आढळतात. धामण, मांजऱ्या असे बिनविषारी सापही आहेत. बहुतेक जण या सापांचा दंश होऊ नये म्हणून काळजी घेतोच. मात्र रात्रीच्या पाण्यामुळे साप चावण्याच्या घटना घडत आहेत. शेतकरी शेती स्वत:साठी करीत असले, तरी ते अन्न काही केवळ आपल्यापुरतं पिकवत नाहीत. ते अन्न सगळेच खातात. शेतकरी आतबट्ट्याची शेती करून देशाच्या जीडीपीत भर घालतात. शेतीत जिवावरच्या जोखमीच्या बाबीत केवळ साप नाहीत. अतिवृष्टी आहे, वादळ आहे. आकाशातील विजेबरोबरच मानवनिर्मित विद्युतही आहे. पावसाळ्यात या दोन्ही विजेमुळं शेतकरी, त्याची गुरंढोरं मरण पावल्याच्या घटना घडतात. कमी पाऊस असो की अति पाऊस; तो पिकांचं होत्याचं नव्हतं करतो... आणि एवढ्यातून पिकवलेल्या शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी सरकारसह सगळेच टपून बसलेले असतात. एवढ्या जिवावरच्या जोखमीचे आणखी कोणते व्यवसाय आहेत?

मी एका मित्रासोबत रस्त्याने दीड-दोनशे किमी चाललो याचं अनेकांनी कौतुक केलं. पण सहा दिवसांत शेतामध्ये ८६ किमी चाललो. हे चालणं रस्त्यावरच्या चालण्यापेक्षा किती तरी कठीण होतं. हातात पाइप घेऊन अंधारात, चिखलात साप, विंचू वा इतर कीटकांच्या चावण्याची भीती मनात ठेवून पायाखाली पीक तुडवलं जाणार नाही, याची काळजी घेत चालणं कितीतरी दिव्य आहे. पण याचं कोणी कौतुक करतं? एवढ्या जिवावरच्या जोखमी स्वीकारून तू धान्य पिकवलंस म्हणून कोणीतरी कृतज्ञता व्यक्त करतं? कोणाला तरी असं काम करणाऱ्यांबद्दल आदर वाटतो? याची उत्तरं ‘नाही’ अशीच आहेत.

हा अनुभव माझा एकट्याचा नाही. लाखो शेतकरी दरवर्षी या अनुभवातून जातात. त्यांच्यासाठी हे अटळ आहे. त्यांना पर्याय नाही. ते नुकसान सहन करू शकत नाहीत. काहीही करून पीक वाचवणं, हेच त्यांचं जगणं असतं. मी नुकसान पचवू शकतो. मला हा अनुभव टाळण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही, मी टाळू शकत नाही. कारण मी शेतकरी आहे. शेतीत राहतोय. दूर असतो तर कदाचित याची दाहकता जाणवली नसती.

प्रश्‍न केवळ नुकसानीचा नाही. माझ्याकडं पाणी देण्याची सुविधा असताना, पाण्याअभावी वाळणारी पिकं बघत मी शांतपणे बसू शकत नाही. कारण माझी नाळ या काळ्या मातीशी घट्ट जोडलेली आहे. मी शेतकरी आहे. माणूस म्हणून माझ्या मनातही भीती आहेच. पण या भीतीपेक्षा माझं शेतकरी असणं अधिक प्रभावी आहे. सुरुवातीला साप, विंचू वा मृत्यूचे विचार मनात येतात. पण काम सुरू झालं, की काही क्षणात ही भीती संपते. दिवसाउजेडी काम केल्यासारखं काम सुरू होतं, जे कधी संपतच नाही. येणारा प्रत्येक दिवस नवनवी कामं घेऊन येतो.

माझ्या मनात हा विचार अनेकदा येतो. दहीहंडीच्या उंच थरावर चढला म्हणून कौतुक, कोणाच्या पळण्याचं, कोणाच्या चालण्याचं, कोणाच्या पीळदार शरीराचं, कोणाच्या खाण्याचंही कौतुक! शेकडो निरर्थक बाबींचं कोडकौतुक देशभर चालू असतं. त्यासाठी बक्षिसं, पुरस्कार, भरभरून प्रसिद्धी मिळते. हे सगळे समाजाचे आयडॉल म्हणून ओळखले जातात. आणि जिवावरची जोखीम पत्करून अन्न पिकवणारा शेतकरी हा टिंगल टवाळीचा, द्वेषाचा, कीव करण्याचा विषय बनतो. हे दुर्दैव देशाचं आहे. अशा मानसिकतेचा देश महासत्ता बनणे सोडा, सुखासमाधानाने जगूही शकणार नाही.

: ९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)  

 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com