शेतीत आधुनिक तंत्रज्ञानासाठी पैशाचं सोंग कसं आणणार?

पैसा नसेल तर शेतीत आधुनिक तंत्रज्ञान कसं येईल? मनुष्यबळ कमी आहे तर, आधुनिक तंत्रज्ञान शेतीत आणा, असं एक उत्तर शेतीबाहेरचे सगळे विद्वान सतत देत असतात. मी ज्या शेतकऱ्यांबाबत लिहितोय ते बहुसंख्य अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी आहेत. भांडवल नाही, हीच तर त्यांची प्रमुख समस्या आहे.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानासाठी पैशाचं सोंग कसं आणणार?
Agriculture TechnologyAgrowon

शेतीतल्या मनुष्यबळाच्या टंचाईचा (Manpower Shortage ) मुद्दा कोणी समोर आणला, की त्याला मजूरविरोधी ठरवलं जातं. शेतकऱ्यांना फुकट मजूर हवेत इथपासून ते शेतकरी त्यांना गुलामाची वागणूक देतात, असे तथ्यहीन मुद्दे काही जण रेटून मांडतात. त्यासाठी ४०- ५० वर्षांपूर्वीचेही दाखले देतात. कारण आजचं शेतीतील वास्तव समजून घेण्याची त्यांची इच्छा नसते. शेतकरी म्हणजे मजुरांची पिळवणूक (Labor Exploitation) करणारा मनुष्य हे गृहितक मांडलं, की सोशल मीडियावर वाटेल ते लिहायला ते मोकळे असतात. त्यांच्याशी चर्चा करणं म्हणजे वेळेचा अपव्यय.

मनुष्यबळ कमी आहे तर, आधुनिक तंत्रज्ञान (Agriculture Technology) शेतीत आणा, असं एक उत्तर शेतीबाहेरचे सगळे विद्वान सतत देत असतात. मी ज्या शेतकऱ्यांबाबत लिहितोय ते बहुसंख्य अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी आहेत. भांडवल नाही, हीच तर त्यांची प्रमुख समस्या आहे.

सोसायटीकडून जे कधीकाळी कर्ज उचललं गेलंय, त्याचीच ते परतफेड करू शकत नाहीत. त्यामुळे दरवर्षी व्याजाची किरकोळ रक्कम भरून या कर्जाचं नुतनीकरण केलं जातं. ग्रामीण भागात याला ‘जुनं-नवं केलं’ असं म्हणतात. सोसायटीचे म्हणजे जिल्हा बँकांचे जवळपास सगळेच कर्जदार असे असतात. शेतकऱ्यांना दरवर्षी एक लाख, दोन लाख रुपये बिनव्याजी पीककर्ज देण्याच्या घोषणा अनेक वेळा झाल्या. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना एवढं कर्ज मिळालंय, हे एकदा तपासून बघा. म्हणजे त्यातला खोटेपणा लक्षात येईल. राष्ट्रीयीकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभं करत नाहीत. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान शेतीत आणण्यासाठी कुठून पैसा आणायचा, याचं उत्तर या सल्लागारांनी द्यायला हवं. फुकट सल्ले द्यायला पायलीला पन्नास आहेत. तो सल्ला प्रत्यक्षात कसा उतरवायचा, हे सांगणारा खरा सल्लागार कुठंच भेटत नाही.

पुरेसं भांडवल आणि हातात खर्चायला पैसे असले की सगळं तंत्रज्ञान, सुविधा आपोआप येतात. आपल्यासमोर याची शेकडो उदाहरणं आहेत. पैसेवाल्याचा टोलेजंग बंगला काही महिन्यांत तयार होतो. तिथं सगळ्या आधुनिक सुविधा येतात. नवीन मॉडेलची सगळ्यात सुरक्षित समजली जाणारी चारचाकी येते. विजेची खात्री नाही म्हणून घरावर सौरऊर्जेचा प्लान्ट बसतो. सगळं फटाफट होतं. याचा थेट बुद्धीशी संबंध येतो का? नाही. संबंध येतो पैशाशी. तुम्ही बुद्धिवंत असाल आणि तुमच्याकडे पैसे नसतील, तर बुद्धीचा वापर करून तंत्रज्ञान विकत घेता येत नाही. त्यासाठी पैसेच लागतात. प्रत्येक बुद्धिवंताकडं पैसे असतातच किंवा प्रत्येक पैसेवाला बुद्धिमान असतो, हे पूर्ण सत्य आहे का? एकूणच कुठेही आधुनिक तंत्रज्ञान आणायचं असेल तर त्यासाठी पैसे लागतात, ही वस्तुस्थिती आहे.

जे आधुनिक तंत्रज्ञान स्वस्त आहे, ते सगळे वापरतात. ते वापरावं म्हणून प्रबोधन करण्याची, सल्ला देण्याची गरज पडत नाही. साधं उदाहरण सांगतो. स्वयंपाकाचा गॅस बाजारात आला. सुरुवातीला तो मिळवणं कसोटी होती. साहजिकच मुठभर उच्चभ्रू लोकांकडंच तो होता. पुढे तो सगळ्यांना सहजपणे किफायतशीर दरात मिळू लागला. सगळ्यांनी गॅस स्वीकारला. गरिबांच्याही घरात तो आला. मला गॅसचं हे आधुनिक तंत्रज्ञान नको, मी लाकूड वापरून चुलीवरच स्वयंपाक करणार, असं कोणती बाई म्हणते का? कोणी असं म्हणणं शक्यच नाही. कारण गॅसचं तंत्रज्ञान सोपं, वेळ वाचवणारं आणि किफायतशीर होतं. या तंत्रज्ञानाने त्यांचा धुराचा त्रास संपवला. लाकडाचा धूर कुठल्याच स्त्रीला प्रिय असण्याचं कारण नव्हतं.

गंमत बघा. या तीन वर्षांत गॅसच्या किमती दुपटीवर पोहोचल्या. सर्वसामान्य लोकांना गॅसवरचा खर्च अनाठायी वाटू लागलाय. काही कुटुंबांत आता गॅससोबत नव्याने चुलीही पेटू लागल्यात. कारण जळणाचं लाकूड स्वस्त आहे. गॅसचे सगळे फायदे माहीत असतानाही, केवळ खर्च क्षमतेपेक्षा अधिक होतोय, म्हणून लोक जळणाकडे वळताहेत. याला अर्थकारण म्हणतात. स्वयंपाकघरात आधुनिक तंत्रज्ञानाने क्रांती केलीय. कुकर, मिक्सरसारख्या शेकडो वस्तु गरिबांच्या घरापर्यंत आल्यात. कारण त्या परवडणाऱ्या आहेत. या वस्तूंचा वापर करावा म्हणून गाजावाजा करावा लागला नाही.

दुसरं उदाहरण म्हणजे गाव हागणदारीमुक्त करून घरोघर शौचालय बांधण्याचं. सरकार शौचालयासाठी अनुदान देतं. जनजागृतीसाठी करोडो रुपये खर्च करतं. शौचालय हे गरजेचं आधुनिक तंत्रज्ञान आहे. त्याचा थेट संबंध आरोग्याशी, सामाजिक प्रतिष्ठेशी आहे. तरीही ही योजना यशस्वी झालेली नाही. गावोगाव हागणदाऱ्या आहेतच. जी काही मुक्ती झाली ती कागदावरच. याचं कारण म्हणजे पाण्याचा तुटवडा. गावोगाव नळ पाणीपुरवठा योजना झालेल्या असल्या, तरी एकही योजना धड चालत नाही. काही अपवादात्मक उदाहरणं सोडली, तर कुठंच नियमित पाणी येत नाही. अशा स्थितीत लोक शौचालयाचं तंत्रज्ञान आधुनिक असूनही ते वापरत नाहीत. कारण मुख्य अडचण पाण्याची आहे. पुरेसं पाणी वापरलं नाही तर, या संडासच्या घाणीचा त्रास होऊ शकतो, असं लोकांना वाटतं. एका बाटलीत काम भागतंय तिथं बकेटभर पाणी कशाला सांडायचं, असा विचार लोक करतात. परिस्थितीने त्यांना असा विचार करायला भाग पाडलंय.

मोबाईलचं उदाहरण अधिक बोलकं आहे. मोबाईल घ्या, असं कोणाला तरी सांगण्याची गरज पडली का? अगदी अशिक्षित, शहरी, ग्रामीण, अगदी वाडी-तांड्यावरील ज्येष्ठ स्त्री-पुरुषांनी आपापल्या आर्थिक कुवतीप्रमाणे मोबाईल घेतले. दारिद्र्यरेषेखालील माणसांनीसुद्धा मोबाईल घेताना कुरकुर केली नाही. कारण हे तंत्रज्ञान वापरण्याचा खर्च सामान्यांच्या आवाक्यातला आहे. त्याची उपयुक्तताही मोठी आहे. प्रत्येक व्यक्तीला मोबाईलने ओळख निर्माण करून दिलीय. प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे आहेत तसे काही तोटेही. निखळ फायद्याचं असं काहीच नसतं.

शेतकरी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत आहेतच. बैलांचं प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा खाली आलंय. बैल सांभाळणं परवडत नाही. त्यामुळे शेतीतली मशागतीची सगळी कामं आणि पेरणीही ट्रॅक्टरने सुरू आहे. याचा अर्थ असा नाही, की सगळ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतलंय. ते शक्यही नाही. भाड्याने हे तंत्रज्ञान मिळतंय. ट्रॅक्टर वापरा असं शेतकऱ्यांना कोणी सांगण्याची गरज पडली नाही. योग्य पर्याय होता, खर्च आवाक्यात होता, म्हणून त्यांनी ते स्वीकारलं. पण शेतात कामाला माणूस मिळत नाही, असं म्हटलं, की प्रत्येक शेतकऱ्याने सगळ्याच बाबतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरावं, असा सल्ला देणं चुकीचं आहे. तंत्रज्ञान वापरासाठी भांडवल लागतं. प्रत्येक वेळी खिशाचा विचार करावा लागतो.

जे कोणी शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरतात ते बुद्धिमान आणि इतर मात्र अडाणी आहेत, असा अर्थ काढणं चुकीचं आहे. शेतीत जनावराच्या गोठ्यापासून ते धान्य साठवण्याच्या सुविधेपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरणारे शेतकरी ऐपतदार आहेत, ते यावर सहजपणे पैसे खर्च करू शकतात, एवढाच त्याचा अर्थ. आधुनिक तंत्रज्ञान न वापरणारे शेतकरी अडाणी नाहीत. त्यांना माहित आहे की, पैशाचं सोंग करता येत नाही.

ज्यांचं शेतीबाह्य चांगलं उत्पन्न आहे, त्यांनी शेतीत पैसे गुंतवणं गरजेचं आहे. त्यांनी अग्रक्रमाने शेतीत नवं तंत्रज्ञान वापरायलाच हवं. नवनवे प्रयोग करून नवा मार्ग शोधायला हवा. अशा सगळ्या शेतकऱ्यांचं मी नेहमीच स्वागत करीत आलोय. शेती व्यवसायाची ती गरज आहे. भांडवलाविना आधुनिक शेती करणं अवघड आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञान वापरणारे शेतकरी शहाणे आणि शारीरिक कष्ट करून शेती करणारे अडाणी असा बुध्दिभेद कोणी करत असेल तर तो पैशाचा अहंकार समजावा. शेतकऱ्यांना पुरेसं भांडवल उपलब्ध करून दिलं गेलं तर, ते सगळं आधुनिक तंत्रज्ञान लगेच शेतीत आणतील.

शेतीबाहेरचा कोणी कितीही विद्वान, विचारवंत असो; तो बाहेरून शेती प्रश्‍नांचं नेमकं आकलन करू शकत नाही. शेतीशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या, मात्र शेतकऱ्यांना सतत सल्ले देणाऱ्या मित्रांना मी अनेकदा म्हटलंय, की तुम्ही किमान आठवडाभर एका कोरडवाहू शेतकऱ्याकडं जाऊन राहा. म्हणजे तुमच्या डोक्यात किती अज्ञान भरलंय ते लक्षात येईल. मी शेतीत प्रत्यक्ष कष्ट करतो, शेतीत राहातो म्हणून मला शेतीतलं फार कळतं, असा मी कधी अप्रत्यक्ष सुध्दा दावा करत नाही. मी कधीच कोणाला सल्ला देत नाही. याचं कारण प्रत्येक शेतकऱ्याचे काही प्रश्‍न सारखे असले तरी, अनेक प्रश्‍न वेगळे आहेत. सरसकटीकरण करून कोणालाही सल्ला देणं हा खरा अडाणीपणा आहे.

शेतकऱ्यांवर सतत टीका करायला, त्यांना सल्ले द्यायला पुढे असलेले हे माझे विद्वान शेतकरी हितचिंतक सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयांवर मात्र कधीच तोंड उघडत नाहीत. शेतकऱ्यांना सोयाबीनचे चढे दर मिळण्याची शक्यता असताना केंद्र सरकारने पाम तेलाची प्रचंड आयात केली. सोयापेंड आयात खुली केली. देशात तुरीचं चांगलं उत्पादन होत असताना परदेशातून मोठ्या प्रमाणावर तूर आयात केली. देशातील गहू उत्पादकांना चांगला भाव मिळत असताना निर्यातीवर बंदी घातली. या निर्णयांबद्दल सरकारचा निषेध करण्याची एवढीशीही जोखीम हे विद्वान घेत नाहीत.

कोणी गच्चीवरची शेती करतात, कोणी कुंडीतील, कोणी सेंद्रिय करतात, कोणी नैसर्गिक शेतीचा दावा करतात. कोणी गोमूत्र आणि शेणाचा वापर करून लाखोचं उत्पन्न काढल्याचा दावा करतो. विषमुक्त शेतीवाले सोशल मिडीयावर जागोजागी दिसतात. कोणी जपानी शास्त्रज्ञाचं नाव सांगतो तर कोणी झिरो बजेटवाल्या सुभाष पाळेकरांचं. माझा अशा कुठल्याच कथित प्रयोगांना विरोध नाही. पण शास्त्रीय कसोट्यांवर सिध्द झालेलं नसताना ते शेतकऱ्यांच्या माथी मारू नका. तुम्ही हौस म्हणून काहीही करा, काय पाठ थोपटून घ्यायची ती घ्या; पण शेतकऱ्यांना शहाणपणा शिकवण्याचा आगाऊपणा करू नका. तो शेती करतोय; तुम्ही फक्त आव आणताय, हे लक्षात असू घ्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com