
डॉ. सचिन शिंदे, प्रवीण मताई
Water Update : सध्याच्या काळात ओलित पिकांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सतत उपसा होत असताना जल पुनर्भरण मात्र फक्त थोड्याच प्रमाणात होताना दिसते. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी जिरविण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा शास्त्रीय पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. आपल्या क्षेत्रातील कृत्रिमरीत्या भूजलसाठा वाढविण्यासाठी विहीर आणि कूपनलिकेचे पुनर्भरण करणे काळाची गरज आहे.
भूजल पुनर्भरण :
१) भूजल पुनर्भरण करण्यासाठी विहीर, कूपनलिकांचा वापर करता येतो. पावसाच्या पाण्याचे विहिरीद्वारे भूजल पुनर्भरण करण्यासाठी किंवा छताच्या पाण्याचे कूपनलिकेमध्ये भूजल पुनर्भरण करण्यासाठी प्रथम शेतातील पाणी किंवा छतावरील पाणी एकत्रित करणे गरजेचे आहे.
२) ज्या पाण्याचे पुनर्भरण आपण करणार आहोत त्या पाण्याची प्रत चांगली असणे आवश्यक आहे. हे पाणी योग्य गाळण यंत्रणेच्या मार्फत पुनर्भरणाच्या ठिकाणी पोहोचले पाहिजे. यामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे याकरिता योग्य ठिकाणी गाळ स्थिरीकरण टाकीची आवश्यकता आहे.
३) विहीर, कूपनलिकांद्वारे भूजल पुनर्भरण करताना गाळण यंत्रणा कार्यक्षमपणे काम करणारी असावी. गाळण यंत्रणेतून पाण्यासोबत गाळ जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
४) शहरी तसेच ग्रामीण भागात घराच्या छतावर पडणारे पाणी पाइपचा उपयोग करून एकत्रितरीत्या जमा करून शोषखड्डा, कूपनलिकेत सोडल्यास भूजल पुनर्भरण शक्य आहे. पहिल्या एक- दोन पावसाच्या पाण्याचा उपयोग पुनर्भरणासाठी करू नये.
विहीर पुनर्भरणाची पद्धत :
१) विहीर व ओढ्याच्या अंतरामध्ये ३ मीटर व २ मीटर लांबीचे दोन स्वतंत्र खड्डे घ्यावेत.
२) पहिला खड्डा ३ मीटर लांब, ३ मीटर रुंद व १ मीटर खोल घ्यावा.
३) दुसरा खड्डा पहिल्या खड्ड्यापासून ३ मीटर अंतरावर घ्यावा.
४) दुसरा खड्डा २ मीटर लांब, १.५ मीटर रुंद व २ मीटर खोल घ्यावा.
५) पहिल्या खड्ड्याच्या मध्यभागी एक आडवे छिद्र घेऊन हा खड्डा ६ इंची पीव्हीसी पाइपद्वारे दुसऱ्या खड्ड्यास जोडावा.
६) पहिला खड्डा दगड गोट्यांनी भरावा.
७) दुसऱ्या खड्याच्या तळाशी ०.४५ मीटर जाडीचा खडीचा थर भरावा. त्या थरावर ०.४५ मीटर जाडीचा वाळूचा थर भरावा. त्यानंतर ०.४५ मीटर जाडीचा बारीक वाळूचा भरून त्यावर ०.१५ मीटर जाडीचा कोळशाचा थर भरून घ्यावा. हा खड्डा तळापासून थोडी जागा सोडून चार इंची पीव्हीसी पाइपद्वारे विहिरीशी जोडावा.
८) ओढ्यातील पाण्यामधील पालापाचोळा, कचरा इत्यादी तीन मीटर लांब, तीन मीटर रुंद व एक मीटर खोल खड्ड्यात स्थिरावतील आणि कण विरहित पाणी पाइपद्वारे दोन मीटर लांब, १.५ मीटर रुंद आणि २ मीटर खोल खड्ड्यात जाईल.
९) दुसऱ्या खड्ड्यातून गाळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाइपद्वारे जाऊन विहीर पुनर्भरण होईल.
१०) विहीर पुनर्भरण करण्यासाठी साधारणतः १५,००० ते २०,००० रुपये एवढा खर्च येतो.
विहीर पुनर्भरणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या अधिक कार्यक्षमता असलेल्या चार थरांच्या गाळण यंत्रणेचा वापर करावा. या गाळण यंत्रणेसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.
थर क्रमांक---थरांची जाडी---साहित्य व आकारमान
१---१५ सेंमी.---विटांचा चुरा (३० ते ४० मि.मी.)
२---४५ सेंमी.---बारीक वाळू (०.६ ते २.०० मि.मी.)
३---४५ सेंमी.---वाळूची चाळ (२.०० ते ६.०० मि.मी.)
४---४५ सेंमी.---खडी (९.५ ते १५.५ मि.मी.)
कूपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण
लागणारे साहित्य : लोखंडी ड्रील (चार-पाच मिमी) काथ्या, गाळणी, धुतलेली वाळू, वाळूची चाळणी, खडी आणि दगडगोटे.
१) कूपनलिकेजवळ नाला किंवा ओढ्याचे पाणी वळवावे.
२) कूपनलिकेच्या सभोवती २ मीटर लांब, २ मीटर रुंद व १.५ मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा.
३) खड्ड्यातील उंची एवढ्या केसिंग पाइपच्या भागात १ ते २ सेंमी अंतरावर सर्व बाजूंनी ४ ते ५ मि.मी. व्यासाची छिद्रे पाडावीत.
४) या छिद्रांवर लोखंडी किंवा प्लॅस्टिक जाळी किंवा काथ्या घट्ट गुंडाळावा.
५) खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या थरात दगडगोटे, त्यावरच्या थरात खडी नंतरच्या थरात बारीक वाळू आणि सर्वांत वरच्या थरात विटांचे तुकडे भरून घ्यावेत. सदर खड्ड्यामध्ये चार थर भरून झाल्यानंतर खड्डा रिकामा राहिल्यास तो पुन्हा दगड गोट्यांनी भरून घ्यावा.
६) अशाप्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल.
७) कूपनलिका पुनर्भरण करण्यासाठी साधारणतः १०,००० रुपये एवढा खर्च येतो.
चार थरांच्या सुधारित गाळण यंत्रणेसाठी लागणारे साहित्य :
थर क्रमांक---थरांची जाडी---साहित्य व आकारमान
१---५० सेंमी.---विटांचे तुकडे (२४ ते २८ मि.मी.)
२---५० सेंमी.---बारीक वाळू (०.६ ते २.०० मि.मी.)
३---५० सेंमी.---खडी (९.५ ते १५.५ मि.मी.)
४---५० सेंमी.---दगडगोटे (२० ते २४ मि.मी.)
विहीर, कूपनलिका पुनर्भरणाच्या वेळी घ्यावयाची काळजी
१) ओढ्याला येणारे पाणी हे क्षार व रसायनविरहित असावे. कारण त्यामुळे विहिरीतील पाणी दूषित होण्याचा धोका संभवतो.
२) विहिरी पाणी तळापर्यंत पाइपद्वारे पोहोचवावे. यामुळे विहिरीच्या कडा सुरक्षित राहतात आणि पाणी ढवळले जात नाही.
३) पुनर्भरणापूर्वी दोन गाळणी खड्डे असावेत.
४) पुनर्भरणापूर्वी विहिरीतील गाळ काढून टाकावा.
५) पुनर्भरण हे गाळलेल्या व स्वच्छ पाण्याने करावे.
६) ज्या क्षेत्रावर मीठ फुटले असेल म्हणजेच क्षार जमा झाले असतील, त्या क्षेत्रावरील पाणी विहीर पुनर्भरणास वापरू नये.
७) औद्योगिक क्षेत्रातील पावसाचे पाणी पुनर्भरणास वापरू नये.
८) साखर कारखाना परिसरात जेथे मळी जमिनीवर पसरली जाते, त्या भागातील पाणी वापरू नये.
९) सूक्ष्म जिवाणूजन्य तथा रोगराईस्थित क्षेत्रातील पाणी वापरू नये.
१०) वाळू, गोटे यांचा वापर करून तयार केलेली गाळणी पावसाळ्यापूर्वी एकदा स्वच्छ करावी.
संपर्क - डॉ. सचिन शिंदे, ९४२१६१८७९०, (विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) कृषी विज्ञान केंद्र, लातूर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.