कृष्णा बंधाऱ्यासाठी मानवी साखळी करणार

कृष्णा नदीवरील बंधारा काढण्याच्या विरोधात जागतिक पर्यावरण दिनी रविवारी (ता. ५) सांगलीकर मानवी साखळी करणार आहेत.
कृष्णा बंधाऱ्यासाठी मानवी साखळी करणार

सांगली ः ‘‘येथील कृष्णा नदीवरील (Krishna River) बंधारा काढण्याच्या विरोधात जागतिक पर्यावरण दिनी (World Environment Day ) रविवारी (ता. ५) सांगलीकर मानवी साखळी (Human Chain) करणार आहेत. हा बंधारा (Barrage) सांगलीचा श्‍वास आहे. महापुराचे (Flood) कारण देऊन तो काढण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. कृष्णा व वारणा नदीकाठचे लोक त्याविरोधात यल्गार पुकारतील,’’ अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव, तथा बंधारा बचाव आंदोलनाचे निमंत्रक पृथ्वीराज पवार यांनी दिली.

पवार म्हणाले, ‘‘जलसंपदा मंत्र्यांनी महापुरावर नियंत्रण आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी म्हैसाळला बॅरेजची घोषणा केली. त्याला विरोध नाही. सांगली बंधारा पाडण्यास विरोध आहे. त्याची कारणे न पटणारी आहेत. म्हैसाळ बॅरेज बांधल्यास त्याची झिरो लेव्हल कुठे येते, किती क्षेत्र पाण्याखाली कायम जाते, हे स्पष्ट नाही. पाटबंधारेचे निवृत्त उपअभियंता विजयकुमार दिवाण यांच्या अभ्यासानुसार, म्हैसाळ बॅरेजमुळे ४ हजार एकर क्षेत्र पाण्याखाली जाईल. त्याची भरपाई कोण, किती देणार? हे सगळे जनतेसमोर ठेवा. जनतेच्या हरकती मागवा. म्हैसाळ बॅरेजसाठी सांगलीचा बंधारा पाडणे गरजेचे असल्याचे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करून दाखवा. तोवर तिकडे फिरकू नका.’’

‘‘सांगली बंधारा कोल्हापुरी पद्धतीचा आहे. बरगे काढल्यानंतर पाणी वाहून जाते. बंधाऱ्यामुळे फुग येते, हा जावईशोध आहे. सांगली, कुपवाडला पिण्याचे पाणी मिळते ते फक्त या बंधाऱ्यामुळे. तोच काढला तर हाल होतील. कधी दुष्काळ पडला तर भयानक जलसंकटाला सामोरे जावे लागेल,’’ असा इशारा पवार यांनी व्यक्त केला.

पवार म्हणाले, ‘‘म्हैसाळ ते डिग्रज पाणी थांबल्यास शेरीनाल्यासह चार नाल्यांचे लाखो लिटर विषयुक्त पाणी मिसळेल. तेच सांगलीकरांनी प्यावे का? नाल्यांचे पाणी शुद्ध करायला ६० कोटी हवे आहेत. त्याचा पत्ता नाही. त्याचा एक दगड आम्ही हलवू देणार नाही. त्याविरोधात मानवी साखळीत समस्त सांगलीकरांनी सहभागी होतील. सांगलीचे आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाची ही लढाई आहे.’’

‘ही पक्षविरहित चळवळ’

पवार म्हणाले, ‘‘हा लढा सांगलीच्या हितासाठी आहे. त्यात पक्षभेद असणार नाही. शेरीनाल्याचे पाणी पक्ष पाहून नदीत मिसळत नाही. त्यामुळे हे आंदोलन व्यापक होईल. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या विषयात लक्ष घातले आहे. आम्ही लवकरच एकत्र बसून पुढील दिशा ठरवू.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com