
डॉ. हमीद दाभोलकर
आपल्या मनाच्यावर असलेला पुरुषप्रधान मानसिकतेचा प्रभाव हा इतका आहे की शेतकऱ्याचे चित्र काढा म्हटले तर आपल्यातील बहुतांश लोक हे शेतकरी असलेल्या पुरुषाचे चित्र काढतील.
शेतीत काम करणाऱ्या आणि शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या बायका या देखील शेतकरीच आहेत हे आपण जणू काही अजून नीटसे स्वीकारलेले नाही.
त्यामुळे जेव्हा शेती आणि मानसिक आरोग्य या विषयी आपण समजून घेणार आहे त्या वेळी शेतकरी महिलांचा आणि त्यांच्या मानसिक आरोग्य (Human Healtrh) या विषयाला देखील आपण महत्त्व देणार आहे.
शेतकरी महिलेला एका बाजूला शेतकरी म्हणून पुरुषाला येणारे सगळे ताण असतातच त्याचबरोबर स्त्री म्हणून कुटुंबात येणाऱ्या जबाबदाऱ्या याचे जादाचे ओझे असते.
आपल्या समाजात वर्षानुवर्षे टिकून असलेल्या पुरुषप्रधान मानसिकतेचा एक मोठा प्रभाव या स्त्रियांच्या मानसिकतेवर पडत असतो.
पुरुषप्रधान मानसिकता ही केवळ पुरुषांच्या मधेच दिसून येते असे नाही. अनेक शतकानुशतकांच्या प्रभावातून अनेक स्त्रिया देखील या मनोवृत्तीच्या बाहेर पडू शकत नाहीत.
त्या देखील आपले समाजातील स्थान दुय्यम आहे असेच मानून जगत राहतात.
स्वतःच्या हक्कांच्या विषयी जागरूक राहण्यापेक्षा शोषण सहन करत राहतात. स्वाभाविक आहे की या शोषणाचा स्त्रियांच्या मानसिकतेवर परिणाम होतो.
एक व्यक्ती म्हणून जी निकोप वाढ व्हायला पाहिजे ती होताना अडथळे तर येतातच पण त्याचबरोबर विशिष्ट स्वरूपाचे मानसिक ताणतणाव आणि मानसिक आजार देखील निर्माण होऊ शकतात.
त्या विषयी या लेखमालेत आपण पुढे सविस्तर बोलणार आहोतच पण तोपर्यंत एवढी तरी नोंद आपण आपल्याशी घेऊन ठेवूया की अंगात येणे किंवा मानसिक ताण शारीरिक लक्षणाच्या
माध्यमातून व्यक्त करण्याचा त्रास हे खास करून भारतीय उपखंडातील स्त्रियांमध्ये दिसून येणारे आजार हे निर्माण होण्यात पुरुषप्रधान संस्कृतीचा मोठा भाग आहे.
हे जरी खरे असले तरी महिलांच्या मानसिक आरोग्याचे सगळेच खापर काही पुरुषप्रधान संस्कृतीवर फोडता येत नाही.
त्या मधील एक मोठा भाग हा जैविक म्हणजे स्त्रीच्या शरीराशी देखील जोडलेला असतो.
दर महिन्याला येणारी मासिक पाळी आणि गर्भधारणा यांच्या अनुषंगाने स्त्रीच्या शरीरात होणारे जे हार्मोन बदलत असतात त्यांचा देखील स्त्रियांच्या मानसिक आरोग्य आणि आजारांशी जवळचा संबंध दिसून येतो.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मानसिक स्वास्थ्य खराब होणे, तसेच बाळंतपणाच्या नंतर येणारे डिप्रेशनसारखे मानसिक त्रास हे स्त्रियांच्या शारीरिकतेशी जोडलेले असतात.
स्त्रीच्या आणि पुरुषांच्या मेंदूच्या ठेवणीमध्ये देखील काही सूक्ष्म फरक असतात, ज्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो.
या जैविक आणि मनोसामाजिक कारणांच्या मिश्रणातून स्त्रियांमधील मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.
त्या विषयी आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मात्र आपण सुरुवातीलाच समजून घेऊया.
कारण कोणतेही असो आपल्या मानसिक आजाराला किंवा आरोग्याला दुसऱ्याला जबाबदार धरून आणि दोष-आरोप करून आपण जास्तीत जास्त एखादा वाद जिंकू शकू पण प्रत्यक्षात
आपले मानसिक आरोग्य दुरुस्त करण्यासाठी त्याचा उपयोग होईलच, असे अजिबात सांगता येत नाही.
जगाला दोष देत बसत आणि ते बदलण्याची वाट न बघत बसता स्त्री आपल्या आयुष्याची दोरी ही स्वतःच्या हातात घेते आणि पुढे चालू लागते तसे आपण देखील आपल्या मानसिक आरोग्याची दोरी आपल्या स्व:तच्या हातात घेणार का, हा प्रश्न या निमित्ताने स्वतःला विचारूया.
आपण आपल्या मानसिक आरोग्यासाठी स्वतःला जबाबदार धरून दुसऱ्याला दोष देणे थांबवले की ते आपल्या ताब्यात आणण्याचे आणि अधिक सुदृढ करण्याचे असंख्य मार्ग दिसू लागतात.
आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की कुटुंबातील पुरुषांनी जर स्त्रियांची कुचंबणा लक्षात घेऊन त्यांना आधार होईल अशी भूमिका घेतली तर त्यामधूनही अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे बदलू शकतात.
डॉ. हमीद दाभोलकर, ९८२३५५७५३१
(लेखक परिवर्तन संस्थेत मनोविकार तज्ज्ञ आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.