पंढरपूर वारीसाठी शंभर गाड्या सोडणार

गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या (Corona) संकटानंतर यंदा पहिल्यांदा पंढरपूरची (Pandharpur) पायी वारी निघत आहे.
पंढरपूर वारीसाठी शंभर गाड्या सोडणार

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या (Corona) संकटानंतर यंदा पहिल्यांदा पंढरपूरची (Pandharpur) पायी वारी निघत आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाने (Bus) या वर्षी पंढरपूरसाठी अतिरिक्त १०० बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता या अतिरिक्त बस पुणे विभागातून सोडण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे यांनी दिली.

पायी वारीत कोरोनामुळे सलग दोन वर्षे खंड पडला. एसटी शिवशाही बसने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला होता. या वर्षी शासनाकडून आषाढी वारीवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दर वर्षी आषाढी एकादशीनिमित्त ४२५ ते ४३० बस सोडण्यात येतात. या वर्षी संख्येत वाढ करण्यात येणार आहे.

पुणे विभागातून ५३० बस सोडण्याचे नियोजन आहे. या वर्षी आषाढी एकादशी १० जुलै रोजी आहे. त्यामुळे ६ जुलैपासूनच स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या स्थानकांतून बस सोडण्यात येणार आहे.

वारीसाठी ग्रुप बुकिंगची सुविधा :
दर वर्षी ग्रामीण भागातून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. बऱ्याचवेळा भाविकांना एसटी बससाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. या वर्षी भाविकांना ग्रुप बुकिंगची सुविधा असणार आहे. त्यामुळे भाविकांना त्यांच्या गावावरूनच पंढरपूरला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीचे आगाऊ बुकिंग करावे लागणार आहे.

सासवड ते पुणे मार्गावर १५० बस
पुण्यातून सासवडला २४ जून रोजी पालखी मार्गस्थ होणार आणि त्या दिवशी पालखी सासवड मुक्कामी असणार आहे. दर वर्षी पुण्यातून सासवडपर्यंत पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. त्यामुळे सासवड ते पुणे मार्गावर १५० बसचे नियोजन आहे. सासवडहून पुण्यात परतणाऱ्या नागरिकांसाठी कोणतीही अडचण येणार नाही.

चालू वर्षी श्री. क्षेत्र देहू येथून जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा २० जून रोजी आणि श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २१ जून रोजी मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे भाविकांसाठी पुणे विभागातून १७ ते २४ जूनदरम्यान आळंदी ते देहू या मार्गावर बस सोडण्यात येणार आहे.
- ज्ञानेश्वर रणवरे, वाहतूक, व्यवस्थापक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com