Vikas Godge article: मला आता कुठल्याच चहाची चव आठवत नाही...

गावात कुठंजरी बोंबलत कुत्री मारीत फिरत असलो तरी दिवस मावळायला घराकडं माझ्या दोन तीन चकरा व्हायच्याच. नाना धोतराचा सोगा खांद्यावर घेऊन कवाड उघडत असायचे, अगर चुलीच्या जरा पुढे बसून बंडीच्या खिशात हात घालत असायचे.
Rural Life
Rural LifeAgrowon

विकास गोडगे

गावात कुठंजरी बोंबलत कुत्री मारीत फिरत असलो तरी दिवस मावळायला घराकडं माझ्या दोन तीन चकरा व्हायच्याच. नाना धोतराचा सोगा खांद्यावर घेऊन कवाड उघडत असायचे, अगर चुलीच्या जरा पुढे बसून बंडीच्या खिशात हात घालत असायचे. मामी नेहमीप्रमणे डोक्यावरचं ओझं किंवा सरपण बाजूला टाकून चुलीला जाळ घालत असायची. गल्लीत त्या वक्ताला आमच्याच तेवढ्या घरातून धूर निघत असावा, म्हणजे इतक्या लवकर.

Rural Life
Rural Life : गप्पा-गोष्टींची खंडित झालेली परंपरा

नाना ज्याम तलपी होते म्हणा. मग मी जरा उगच शेजारी बसलं की, माझ्या हातात एकेक रुपयाचे दोन ठोकळे दिले जात आणि वरतून आठाणे. ते घेऊन भिर्र दुकानाला जाऊन कधी नसलेली चहापत्ती तर कधी छटाकभर साखर आणून दोन वाळलेले पाव आणणे म्हणजे माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाची आणि सुखाची परिभाषा असावी. नंतर पितळीत चहा वोतून त्यात वाळलेले पाव भिजवून खाल्ले जात.

अडकित्याने कापावे लागणारे पाव भिजण्यासाठी किती चहा लागत असेल आणि ते दोन पाव संपवण्यासाठी चहा पुरायचा हे म्हणजे थोर होते. त्यामुळे मला त्या चहाची चव कसलीच आठवत नाही. आठवतो फक्त चुलीतून निघणाऱ्या धुराचा वास आणि धुराने निघणारं डोळ्यातून पाणी. पण तोच चहा पीत पीत मोठे झालो आणि आता पावाचे दोनशेहून अधिक प्रकार बघून पण पाव म्हणलं की तो अडकित्याने फोडायचा पावच आठवतो.

Rural Life
Rural Life : पूर्वी खेडी स्वयंपूर्ण होती, हे खरे नाही...

चहा म्हणजेच जीवन ह्याची जाणीव बार्शीत शिकायला आल्यावर झाली. सकाळी गावाहून येष्टीने डबा यायला अकरा वाजायच्या. उपाशी पोटी कसलं कॉलेज आणि कसली शिकवणी. मग आम्ही पोरं बस स्टोपवर येऊन एस्टीची वाट बघत बसायचो. तिथ असलेल्या कुलकर्णी काकाच्या टपरीवर एक चहा आणि तीन खारी संपवल्यावर निवांत एसटी यायची. एस्टीतून डबा काढून घेणे खोलीवर जाणे आणि मग खाणे यातच दोन वाजायच्या. मग आमच्या विज्ञान शाखेच्या वर्गात काय चाललं आहे आणि आम्हाला पुढे जाऊन डॉक्टर किंवा कमीत कमी अभियंता तरी व्हायचेच आहे या स्वप्नांना ऑलरिडी घोडा लागलेला आहे हे फक्त मला एकट्यालाच माहित होतं.

Rural Life
Rural Life : सह्याद्रीच्या रानातील माणसं

आई वडिलांना भनक पण नव्हती कि माझ्या आयुष्यात काय चाललं आहे. बाप विचार करायच्या परिस्थितीत होता का नाही आठवत नाही पण आईला खात्री असावी माझं लेकरू आता `शिकून लय मोठं व्हणार हाय.` आता शिकून मोठं होणे म्हणजे काय तर तिला अजून माहित नसावं. तर तिथल्या कुलकर्णी काकाच्या चहाची चव पण खूप प्रयत्न केला तरी आठवत नाही. आठवतात काकांचे द्यायचे राहिलेले नव्वद रुपये. कारण काकांनी त्या काळी उधार चहा आणि खारी दिली नसती तर काय झालं असतं माहित नाही.

जरा टणक झाल्यावर म्हणजे विज्ञान सोडून कला शाखेला आल्यावर संध्याकाळी तीन गोल्डफ्ल्याक आणि तीन चहावर एक तास कॉलेजसमोरच्या हॉटेलच्या म्हागच्या बाजूला टेबलावर पाय ठेऊन बसून हाणलेलं आभाळ तेवढं आठवतंय. चीखर्ड्याचा येडा पप्या कायम चिमणीतून धूर काढल्यासारखा गोल्ड्फल्याक फुकत असायचा. त्याची आई शिक्षिका असल्याने त्याला भरपूर पैसे यायचे , तो गोल्ड्लफ्ल्याक आणि चहावर उडवायचा.

नुसता धूर काढून त्याचा आधीच असलेला काळा चेहरा कोळशासारखा काळा दिसत होता. त्यात बसलेले गाल, काळे ठीकार व्होट, डोळे कायम ढीम्म. त्याला शिकायला पुण्याला जायचं म्हणून त्याने रिकी मार्टिनचं कोणतं तरी क्यासेट आणलं होतं. मग मी म्हणालो, “क्यासेटातल्या एवढ्या दहा बारा गाण्यावर मी तर अमेरिकेला घोडा लावून येईन, तू पुण्याला लावू शकत नाही काय? ये बस, सांग तीन गोल्ड्फल्याक आणि तीन गोल्डन” यावर पप्या सगळ्यांना मग चहा आणि गोल्ड्फल्याकची पार्टी द्यायचा.

रात्री अकरा वाजेपर्यंत तिथे चारपाच गोल्ड्फल्याक आणि चार पाच चहा आभाळावर चढाई करत करत होत असे. मग रात्री नाही जेवलं तरी चालायचं. तिथल्या पण चहाची चव आठवत नाही, आठवते ती फक्त छोट्या गोल्डफ्ल्याकने बसनारी किक्क आणि मरणारी भूक. मरणारी भूक चांगली असते. आयुष्यात नंतर अनेक चहा आले. आईचा चहा पण आठवत नाही, फक्त कधी कधी वडिलांनी आईला चहा गोड झाला म्हणून दिलेल्या शिव्या आठवतात. तसं पण आईच्या चहाला प्रत्येक वेळी वेगळी चव येत असावी. आमच्या आईच्या हातचा चहा पिऊन बघ असे म्हणणाऱ्या मित्रांवर मी जाम जळायचो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com