Water Conservation : ‘तहान’ शब्द जल व्यवस्थापनाशी कसा जोडलेला आहे?

पूर्वजांच्या ठेवी आज आपण वापरत आहोत. त्या जपल्या पाहिजेत. बॅंकेमधील ठेवींवर जसे अधिक व्याज मिळते, तशीच पाण्याची साठवण भूजलाच्या स्वरूपामध्ये केल्यास त्यातून आपल्या भावी अनेक पिढ्यांपर्यंत बेगमी करणे शक्य होईल.
Water Management
Water ManagementAgrowon

डॉ. नागेश टेकाळे

Rain Water Management : पावसाळ्यात पडणाऱ्या वर्षाजलाच्या व्यवस्थापनाचा (Rain Water Management) एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पडणारा पाऊस भूगर्भात जास्तीत जास्त मुरवून वसुंधरेच्या पोटामधील जलसाठा (Water Storage) वाढवणे. सोप्या भाषेत बोलायचे तर बँकेचे उदाहरण घेता येईल. बँकेत आपले बचत खाते असते.

या नियमित बचत खात्यावर फारच अल्प व्याज मिळते. मात्र काळाचे आणि पैशाचे महत्त्व जाणणाऱ्या व्यक्ती आपले पैस काही ठरावीक काळासाठी म्हणून ठेवीच्या स्वरूपात ठेवतात. त्यावर त्यांना अधिक व्याजही मिळते. त्यातून भविष्यातील आनंदी सुखी जीवनाची बेगमी होते.

पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरविणे, ते किमान काही काळ तरी जमिनीत तसेच राहू देणे, त्याला शक्यतो हात न लावणे हे बँकेमध्ये ठेवलेल्या ठेवीसारखेच असते. ज्या जमिनीत जास्त पाणी मुरते, ती जमीन त्या शेतकऱ्यास रब्बीचे हमखास उत्पादन देत असते.

‘तहान’ हा शब्द जल व्यवस्थापनाशी जोडलेला आहे. पूर्वी उन्हाळ्यात शेताची नांगरणी होत असे. मोठमोठी ढेकळे नांगरटी बरोबर वर येत. ही ती तहानलेली शेत जमीन पहिल्या पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असते.

मृगाच्या पावसात तिची तहान भागताच उर्वरित पाऊस ती तिच्या पोटात साठवू लागते. या जमिनीवर शेतकरी खरिपाचे पीक घेतो, हेच त्याचे बचत खाते आणि पोटात साठलेले पाणी हे ठेवीसारखे असते.

आपल्या शेतीमध्ये आपण किती ठेवी जपून ठेवल्या आहेत, हे पाहायचे असेल तर तुडुंब भरलेल्या विहिरीवरून लक्षात येते.

Water Management
Water Resources : पारंपरिक जलस्रोतांचा शोध

पाणी व्यवस्थापनामध्ये शेती पद्धतीचाही मोठा वाटा आहे. जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर करणारी सेंद्रिय शेती पाणी व्यवस्थापनाला एक प्रकारे मदतच करते. केवळ रासायनिक खतांच्या किंवा शेतीच्या आहारी गेलेल्या शेतकऱ्यांचे पाणी व्यवस्थापन चुकत जाते.

या शेत जमिनीत पाणी साठा म्हणजे ‘ठेवी’चा प्रश्‍नच नसतो. उलट जी थोडीफार पारंपरिक पद्धतीने केलेली ठेव असते, तिला खोल ‘बोअरवेल’ मारून ती मोडली जाते.

ठेवच मोडली, तर त्यावर व्याज कसले मिळणार? आपल्या जमिनीमधील पाणीसाठा वाढवत नेला तरच भविष्यात येणाऱ्या हवामान बदलाच्या संकटात तो ठेवीप्रमाणे वेळेला कामी येईल. भूजल साठा नसलेल्या जमिनी कायम उष्णता निर्माण करत असतात आणि अशा उष्ण जमिनीच पावसाळ्यात ढगफुटीला आमंत्रित करतात.

ढगफुटी म्हणजे उभ्या पिकाचा आणि शेतकऱ्याचा विनाशच. ढगफुटीच्या पावसाचा एक थेंबही जमिनीत न मुरता सर्वत्र हाहाकार माजवत वरच्या वर वाहून जातो. जाताना तो शेतकऱ्यांचे किती नुकसान करतो, हे सर्वांनाच माहिती आहे.

पावसाच्या पाण्याचे संधारण म्हणजेच शाश्‍वत रेनवॉटर हार्वेस्टिंग होय. आज या संकल्पनेस खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. पावसाचे पाणी गोळा करून ते साठवणे आणि नंतर ते पिकासाठी अथवा अन्य मानवी, पाळीव प्राण्यांच्या गरजांसाठी उपयोगात आणणे ही आपणास प्रत्यक्ष दिसणारी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली आहे.

मात्र यातील दुसरी अदृश्य प्रणाली म्हणजे याच पावसाच्या पाण्यास भूगर्भात मुरवून तेथे भूजल वृद्धी किंवा समृद्धी वाढवणे. पहिला प्रयत्न म्हणजे तात्पुरते पाणी व्यवस्थापन, तर हा दुसरा भाग हे शाश्‍वत पाणी व्यवस्थापन आहे. अतिशय साध्या सोप्या भाषेत सांगावयाचे म्हणजे शेततळे.

ज्या शेत तळ्यामध्ये प्लॅस्टिकचे अस्तर टाकून पावसाचे पाणी अडवून साठवले जाते, हे झाले तात्पुरते व्यवस्थापन. या व्यवस्थापनात शेतकरी स्वतःच्या नापीक, मुरमाड अशा जमिनीमध्ये शेततळे तयार करून केवळ स्वतःची आणि शेताची सोय पाहतो.

मात्र दुसऱ्या प्रकारच्या शेतातच नापीक, मुरमाड जमिनीवर (अस्तराविना) शेततळे तयार केले जाते. त्यात पावसाचे पाणी वळवून साठवले जाते. त्यातून त्याची एका हंगामाची गरजही भागते. मात्र त्याचा प्रयत्न असतो ते भूमातेची तहान भागविणे हा. यामध्ये पाण्याच्या जमिनीमधील पाझरण्यास जास्त महत्त्व दिले जाते.

याचा फायदा मूळ शेतमालकाबरोबरच या परिसरामधील अनेक शेतकऱ्यांना होतो. अशा शाश्‍वत जलसंधारणामुळे विहिरींना पाणी वाढते. पावसाळ्यापुरतेच वाहणारे ओढे हिवाळ्यातही बऱ्यापैकी वाहते राहतात.

अशी पाझर तळी भरपूर असलेल्या परिसरामधील नदीला जिवंतपणा राहतो. अनेक वृक्ष आणि त्यास जोडलेली जैवविविधता आनंदाने फुलू लागते, तेव्हा खऱ्या अर्थाने ‘जल हेच जीवन’ हा सुविचार सार्थ होतो.

पूर्वजांनी जपलेल्या बाबी तुम्हीही जपा!

जलसंधारणाचा मुख्य उद्देश हा भूगर्भात जास्तीत जास्त पाणी जिरविणे हा असतो. शासनातर्फे केले जाणारे पाझर तलाव, लघू पाटबंधारे तलाव, कोल्हापुरी बंधारा, मालगुजारी तलाव, नाला बांध, (सिमेंट आणि माती) वळवणीचे बंधारे, लहान मोठे कालवे, डोंगर उतारावरील चर, घेतलेले खोल खड्डे, गाव साठवण तलाव, सिंचन तलाव अशी कितीतरी उदाहरणे देता येतात.

मराठवाड्यामधील माझ्या लहान गावाला लागूनच एक मोठे तळे होते. त्यात भरपूर पाणी असे. विशेष म्हणजे या एका तळ्यामुळेच माझ्या गावामधील घरोघरचे आड पाण्याने तुडुंब भरलेले असत. काळ बदलला, परिसरामधील ऊस पिकाचे आक्रमण, जमिनीची वादावादी अशा एक आणि अनेक कारणांमुळे गावाशेजारचे ते सुंदर तळे पूर्णपणे लयाला गेले.

त्या बरोबरच घरोघरचे आडसुद्धा! गावाबाहेर असलेली हजार दीड हजार झाडांची आंबराईसुद्धा फळे येत नाही म्हणून कापली गेली. आज या तळ्याच्या जागेवर सिमेंटचे बांधकाम, आंबराईमधून मोठमोठे वाहतूक रस्ते आणि घरोघरच्या आडांच्या कचराकुंड्या झाल्या आहेत.

Water Management
Tanker Water Supply : पाणी टँकरचे सव्वातीन कोटी अखेर मिळाले

आपल्या पूर्वजांनी जपत आजवर आणलेल्या एका सुंदर पाणी व्यवस्थापनाचे आपल्या पिढीने केलेले हे विद्रूप रूप पाहताना मनास खूप वेदना होतात. आपल्या राज्यामधील आजचे जलसंधारण पाहता त्याचे भविष्य अंधारमय आहे.

वाढत्या रासायनिक शेतीमुळे जमिनीचे होत चाललेले वाळवंटीकरण हेच कारणीभूत आहे. कारण पाण्यास धरून ठेवणारी सेंद्रिय कर्बयुक्त जमीन शिल्लकच राहिलेली नाही. जमिनीत पावसाचे पाणी धरून ठेवणारी जंगलेही शिल्लक राहिली नाही. कुठेही पाणथळ जागा की गायरान शिल्लक राहिले नाही.

पाणंदीची जागा सिमेंटच्या रस्त्याने घेतली आहे. आता केवळ शासनाने बांधलेल्या धरणे आणि त्याच्या कालव्यावर आशेने पाहणारी माणसे दिसत आहेत. जवळपास प्रत्येक गाव परिसरात लहान मोठ्या बंधारा, धरणामध्ये जलसंधारणातून पाणी साठविले जाते, हा शासनाचा स्तुत्य उपक्रम. पण त्याची देखभाल आपण गावानेच केली पाहिजे.

प्रत्येक गोष्टीसाठी शासनाच्या भरवशावर बसले तर कसे चालणार? ‘प्रत्येक गाव, तिथे तळे होते’ हेच ते लहान मोठे तळे आणि त्याच्यामध्ये असलेले छोटे देवदेवतेचे मंदिर संपूर्ण गावाच्या पाण्याची पूर्वी काळजी घेई. आमच्या घरातील महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी ‘नळाचे पाणी देणे’ योग्य.

पण केवळ त्यावर अवलंबून राहिलो तर कधीतरी पाण्यावाचून तडफडण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. ‘‘गावकुसात धरण पाण्याने भरलेले असूनही घरामधील नळाला आठ दहा दिवसांनी केव्हातरी अचानक पाणी येते.’’ हे जेव्हा माझा वर्ग मित्र सांगत असतो, तेव्हा तो ज्या खुर्चीवर बसलेला आहे, त्या खाली सिमेंटने झाकला गेलेला आड त्याला आज दिसत नसला तरी मला मात्र दिसत असतो.

धान्यांच्या शेतीऐवजी करेन पाण्याची शेती...

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यामध्ये एका शीख परिवाराची १५० एकर जमीन आहे. ६०-७० च्या दशकापर्यंत सोने पिकविणारी ही जमीन नंतरच्या काळात कमी उत्पादन देऊ लागली. हवामान बदल, वाढती उष्णता, रासायनिक शेतीची वाढती तहान यामुळे त्यांच्या शेतामधील ७-८ विहिरींनी तळ गाठला. घेतलेल्या विंधन विहिरी तात्पुरत्या ठरल्या.

१५० एकर पैकी जेमतेम २० एकर शेतच उत्पादन देऊ लागले. सतसंग परिवारामधील या शेतकऱ्याची परोपकारी वृत्ती जागृत झाली. त्याने नापीक जमिनीमध्ये तब्बल दहा मोठे पाझर तलाव घेतले आणि योगायोगाने त्या वर्षी पाऊसही भरपूर झाला.

तलाव खरिपात भरून गेले, विहिरींना पाणी तर आलेच, पण परिसरामधील अनेक शेतकऱ्यांच्या कोरड्या पडलेल्या विहिरींनाही पाण्याचा स्पर्श झाला. सागर शहरात स्थलांतरित झालेले शेजारचे अनेक शेतकरी पुन्हा परत आले.

त्यांनीही याच पद्धतीने शक्य तिथे जलसंधारण सुरू केले. ‘‘माझ्यामुळे परिसरामधील शेकडो शेतकऱ्यांचा फायदा होता असेल, तर मी धान्याची शेती करण्यापेक्षा यापुढे पाण्याचीच शेती करेल,’’ हे त्यांचे उद्‍गार सर्व शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्याचे संधारण करण्यासाठी एक वेगळाच सकारात्मक संदेश देतात.

ई-मेल - nstekale@gmail.com (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com