
Kolhapur News : ‘फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी मुकादमांवर तातडीने कारवाई करणार आहे, अशी ग्वाही जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिली.
जिल्ह्यातील अनेक ऊसतोडणी कामगारांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक केली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे, असेही त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवेदन दिले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांची या तोडणी कामगार व मुकादमांनी संगनमताने सुमारे ३३ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे ‘स्वाभिमानी’च्या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत सुमारे ४४६ कोटी रुपयांची फसवणूक ऊस वाहतूकदारांची झाली आहे. राज्यभरात अनेक पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल आहेत. मात्र या तक्रारींची म्हणावी तशी दखल घेतली जात नव्हती.
राज्यभरात फसवणूक करणारे १०२५८ मुकादम आहेत. संबंधित मुकादमांकडून थकीत रकमेच्या वसुलीसाठी गेले असता दमदाटी, मारहाण, शिवीगाळ करणे, सावकारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, महिलांना पुढे करून विनयभंग, अतिप्रसंग अशा केसेस करण्याच्या धमक्या देणे आदींमुळे वाहनधारक अक्षरशः हतबल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या वाहनधारकांसह स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिसप्रमुखांची भेट घेऊन १५ तक्रारी दाखल केल्या. जिल्हा पोलिस प्रमुखांनी कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित हद्दीतील वाहनमालकांच्या तक्रारी दाखल करून घेण्याचे निर्देश दिले. या वेळी संदीप राजोबा आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.