गाव चावडीचा महिमा

पूर्वीच्या काळी गावामध्ये येणारे सरकारी कारकून, अंमलदार हे चावडीवर मुक्काम करत. पोलिस पाटील, रामोशी, भटके लोक आणि एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणारे प्रवासी ऐनवेळी आलेल्या पावसामुळे किंवा प्रवासात अंधार झाल्यामुळे चावडीवर थांबत असत.
Gavchavadi
GavchavadiAgrowon

- शेखर गायकवाड

भारतीय समाजात ‘चावडी’ या संस्थेला परंपरागत आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. ‘चौहाट’ या संस्कृत शब्दावरून हा शब्द बनला असावा असे म्हणतात. गावगाड्याचे पूर्वी नियंत्रण करणारे पाटील व कोतवाल व त्यानंतर पटवारी (Patvari) तसेच गाव कामगारांचे नेहमी बसायचे ठिकाण चावडी (GavChavdi) हे होते. चावडीवर गावासंबंधी सगळे महत्त्वाचे निर्णय होत. वाड्या, वस्त्या व सर्व गावांचा महसूल शेतकरी चावडीवर आणून देत असत.

जमिनीचा कर आणि घरपट्टी काही रुपयांमध्ये असली, तरी पूर्वीच्या काळी घराची पट्टी भरण्यात सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येत असे. पूर्वीच्या काळी गावामध्ये येणारे सरकारी कारकून, अंमलदार हे चावडीवर (GavChavdi) मुक्काम करत. पोलिस पाटील, रामोशी, भटके लोक आणि एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणारे प्रवासी ऐनवेळी आलेल्या पावसामुळे किंवा प्रवासात अंधार झाल्यामुळे चावडीवर थांबत असत.

गावाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून चावडीचे महत्त्व होते. एसटी सुरू झाल्यावर गावातली सर्वांच्या सोयीची मोठी जागा म्हणून चावडीजवळ एसटी स्टॅण्ड बांधण्यात आले. हळूहळू चावडीवर बसणारी माणसे स्टॅण्डच्या समोरच्या पारावर बसू लागली. ते प्रचंड मोठ्या वडाच्या किंवा लिंबाच्या झाडाखाली सावलीत जास्तीत जास्त वेळ काढत असत. सकाळपासून अंधार पडेपर्यंत उशिरा शेतकऱ्यांच्या एकत्र कुटुंबातील पुढारी असलेल्या कारभाऱ्याचा राबता चावडीवर असे.

७०-८० च्या दशकापर्यंत गावावरचा पार हे मोठे वर्दळीचे ठिकाण होते. अनेक गावांच्या चावडीच्या समोर हमखास भेळ, कांदा भजी, चहा मिळणारे हॉटेल आणि दुसऱ्या बाजूला सायकल भाड्याने मिळणारे किंवा पंक्चर काढून मिळण्याचे दुकान असे. उन्हाळ्याची सुट्टी लागली की हमखास मुले मामाच्या गावी येत. उतरल्या वर घरातल्या मोठ्या कारभारी माणसांच्या पाया पडायचा कार्यक्रम चावडीवरच पार पडायचा.

गावात उतरले की भैरोबा मंदिरापर्यंत मुलाबाळांसोबत पायी सवारी निघायची. उतरल्या उतरल्याच हॉटेलात भजी किंवा भेळ खायला घालून मामा मुलांना खूश करत असत. सुट्टीत करायच्या मज्जेची ही जणू सुरुवात होती. एक, दोन आण्यांना मिळणारी भजी, भेळ, मावा, गुडीशेव, मिसळ, उसाचा रस यामुळे मुलांनी वर्षभर हजर राहिलेली शाळा एका मिनिटात विसरायला व्हायची. चावडीजवळच आवळा, बोर, अंजीर, पेरू, केळी विकायला असत.

ज्यांची वाडी-वस्ती लांब अंतरावर आहे तिथपर्यंत चालायचा त्रास नको म्हणून बैलगाडी जुंपून आणलेली असे. एसटी येण्याच्या अगोदर तासभर वैरणीच्या दोन पेंढ्या बरोबर आणलेली बैलगाडी बाजार तळाजवळ सोडली जायची. लहान-थोर, बैल, जनावरे, मोठी माणसे, घरातील एखादी विधवा, माहेरवाशिणीची मुले या सर्वांची काळजी घेणारी त्या वेळी व्यवस्था होती.

तालुक्याचा एखादा मोठा अंमलदार आला, तर त्याची सुनावणी चावडीवर होत असे. शेत जमिनीचा महसूल न भरणाऱ्या शेतकऱ्याला चावडीवर हजेरी लावावी लागायची. गावांत तात्पुरत्या राहणाऱ्या जमातींनी गावात किती दिवस राहणार, कुठे थांबणार, याचा हिशेब पोलिस पाटलाला (Police Patil) चावडीवर द्यावा लागायचा.

गावात किंवा शेतजमिनी मधली किरकोळ कारणांवरून झालेली भांडणे गावाच्या चावडी समोर आणली जात. तीर्थयात्रा करणारे लोक मजल दरमजल ओळखीच्या लोकांकडे किंवा कोणीच नसेल, तर चावडीवर मुक्काम करत. कोंडवाडा किंवा धर्मशाळासुद्धा बरेच वेळा चावडीजवळ असत. गावातल्या कोतवालाला प्रत्येक कुटुंबाची खबर जात असे. कोणावर जास्त कर्ज झाले आहे, कोणाचा मुलगा शिकला, कोणाचा मुलगा कारखान्यात कामाला लागला किंवा कोणाचा मुलगा सरकारी मोठ्या हुद्द्यांवर गेला याची सर्व माहिती कोतवाल किंवा पोलिस पाटलाला असे.

१९४०-५० पर्यंत अक्षर ओळख झालेली आणि अक्षरांच्या काही ओळी वाचता येणारी माणसे चावड्यांवर दिसू लागली होती. सायकल दुकानाच्या रेडिओवर लागलेल्या सातच्या बातम्या ऐकून कारभारी मंडळी आपल्या घरी परतायची. कित्येक गावांच्या चावडीवर रिकामटेकडी माणसे बसून सर्व गावातल्या कुटाळ्या करीत असे. कोणाच्या घरातली मुलगी न नांदता परत आली, कोणी सावकाराकडून जास्त कर्ज काढलं, कोणत्या जमिनीची पट्टी कोणी विकायला काढली, दिल्लीला काय चाललं आहे याविषयी चर्चा चावडीवर चालत असे.

अडचणीच्या वेळी सोनं गहाण टाकून नड भागवण्याचा प्रयत्न व्हायचा. अशावेळी गावातल्या अर्थ व्यवस्थेचे केंद्र म्हणजे चावडी व त्याच्या आजूबाजूचा परिसर होता. कोणाच्या अध्यामध्यात नसलेले अनेक शेतकरी शेतीत राबायला महत्त्व देत आणि गरजेशिवाय चावडीकडे फिरकत नसत. काही कुटुंबात दिवसभर शेतात राबायचं व फक्त गरजेपोटी ठरावीक कामासाठी गावांत जायचं अशी पद्धत होती.

तर काही एकत्र कुटुंबातील ४-५ भावांमध्ये एकच पांढरा सदरा खुंटीला टेकवलेला असायचा. जो भाऊ गावांमध्ये कामानिमित्त जाईल तो हा घालत असे. त्या उलट कसलेच काम न करणारे उचापती लोक मात्र कष्ट न करता चावडीवर मिळालेल्या माहितीचा वापर करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न हुशारीने आणि बेरकेपणाने करत. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये याच्या काही दशके अगोदर शहाण्याने चावडीची पायरी चढू नये, असे म्हटले जायचे. गाव चावडीचा हा अचाट महिमा या धावपळीच्या जीवनात हरवला आहे हे मात्र नक्की!

shekharsatbara@gmail.com

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com