Monsoon : मॉन्सून परतीच्या तयारीत...

मॉन्सून कालावधीच्या १०० ते १२० दिवसात प्रत्यक्षात पाऊस किती जोरात(तीव्रतेने) पडला यापेक्षा किती दिवस पडला म्हणजे पावसाचे दिवस किती हे सगळ्यात महत्त्वाचे असते. पाऊस कमी पडू दे पण पावसाचे दिवस वाढणे महत्त्वाचे असते. मॉन्सूनच्या कालावधीचा घेतलेला हा आढावा...
Monsoon Update
Monsoon Update Agrowon

माणिकराव खुळे

जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातून मोसमी पाऊस (Monsoon) (मॉन्सून) निसर्गाने ठरवून दिलेल्या त्याच्या सरासरी कालावधीत म्हणजे साधारण १०० ते १२० दिवसात मोसमी पावसाने हजेरी लावून निघून जाणे आवश्यक असते. असे झाले तरच मॉन्सूनचे त्या वर्षीचे त्याचे वर्तन हे नैसर्गिक समजावे. त्यामुळेच, त्याचे उर्वरित त्या वर्षभरातील म्हणजे मार्च - एप्रिल पर्यंन्तच्या वातावरणीय घटना सुयोग्य पद्धतीने घडून येतात. उदाहरणार्थ मार्चच्या मध्यापर्यंत पडणारी आवश्यक थंडी, नक्षत्रानुसार परतीचा पाऊस (Rain), नियमित निर्मित सागरी होणारे चक्रीवादळे (Cyclone), कमी गारपीट (Hailstorm), माफक पडणारे धुके, थंडीत कमी भू-दवीकरण(बादड)व भू-स्फटिकिकरण(ग्राउंड फ्रॉस्ट) इत्यादी वातावरणीय सुसंगत पीक उपयोगी असे नैसर्गिक सुयोग्य बदल शेतीसाठी घडून येतात. म्हणूनच मॉन्सून वेळेतच परतावा (Monsoon Return Journey) हेच शेतीसाठी अतियोग्य होय.

Monsoon Update
Monsoon Update : मॉन्सून निघणार परतीच्या प्रवासावर

१) अधिक पाऊस होण्यापेक्षा सरासरी इतका पाऊस होणे गरजेचे असते. मॉन्सून कालावधीच्या १०० ते १२० दिवसात प्रत्यक्षात पाऊस किती जोरात(तीव्रतेने) पडला यापेक्षा किती दिवस पडला म्हणजे पावसाचे दिवस किती हे सगळ्यात महत्त्वाचे असते. पाऊस कमी पडू दे पण पावसाचे दिवस वाढणे महत्त्वाचे असते. त्यातूनच अधिक भू-जलशोषण होऊन फुकटचे व्यय जाणारे पाण्याचे समुद्राकडे वहन कमी होते.

२) एकूणच जनतेत अशी धारणा असते की, मॉन्सून उशिरा गेला तर आपल्याला पावसाला अधिकचा कालावधी म्हणजे अधिक पाणी आणि अधिक भू- जलपातळी, अधिक भू-जलधारणक्षमता वाढ, अधिकचे जमिनीवरचे जल साठवण होईल, असे वाटते. पण ते तसे नसते. मोसमी पाऊस जर वेळेत परतला तरच त्या पुढील ईशान्य मोसमी पाऊस तमिळनाडू राज्यात येतो. त्याचा फायदा कधी-कधी वातावरणीय प्रणालीच्या व्यापक प्रसारामुळे महाराष्ट्रपर्यंतचे क्षेत्र त्या हिवाळी पावसाच्या प्रभावाखाली येऊन आपल्या रब्बी पिकांना त्याचा फायदा होतो.

Monsoon Update
Monsoon Update : मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदाही लांबणार.

३) परतीचा पाऊस, ईशान्य मोसमी पाऊस किंवा हिवाळी पाऊस, ही एकच की वेगवेगळी नावे आहेत की, पावसातही काही फरक आहे? म्हणजेच परतीचा व हिवाळी पाऊस सारखेच आहेत काय? तर उत्तर आहे, नाही!. तर (अ)परतीचा पाऊस व (ब)हिवाळी किंवा ईशान्य मोसमी पाऊस अशा दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.

४) हिवाळ्यात ईशान्य मोसमी वारे ईशान्येकडून नैऋतेकडे बंगालच्या उपसागरावरून ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात तमिळनाडू राज्याच्या किनारपट्टीवर आदळतात. तेथे त्या राज्यात जो पाऊस होतो त्यास ईशान्य किंवा हिवाळी पाऊस म्हणतात.

परतीच्या पावसाचा मार्ग ः

१) परतीचा पाऊस हा १ सप्टेंबर नंतरच सुरवात होऊन १ ऑक्टोबर नंतर देशातून निघून जाणे अपेक्षित असते परंतु तो कधी कधी वाढीव कालावधीही घेतो. परतीचा पाऊस हा जेव्हा प्रथम काहीसे स्वच्छ आकाश व अतिउष्णता अशा वातावरणातून नंतर तयार होणाऱ्या संवहनी क्रियेद्वारे शक्यतो दुपार नंतर पडणारा पाऊस असतो. ( येथे संवहनी क्रियेद्वारे म्हणजे सूर्याच्या उष्णता ऊर्जेने जमिनीचा पृष्ठभाग तापून जेव्हा जमिनीने शोषलेले पाण्याचे बाष्पीभवनातून ऊबदार अशा दमट पाण्याच्या वाफेचे अवकाशात उर्ध्वगमन होते. ठराविक उंचीवर त्याला मिळालेल्या थंडाव्यातून पडणाऱ्या पावसाला संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस म्हणतात. ) यालाच आपण परतीचा पाऊस म्हणतो.ज्या मार्गाने मोसमी(मॉन्सून) पाऊस केरळ पासून राजस्थानपर्यन्त जातो, तोच मोसमी पाऊस त्याच मार्गाने माघारी फिरतो त्याला परतीचा पाऊस म्हणतात. साधारण एक महिना कमी अधिक कालावधीत तो देशातून परततो.

२) आता परतीचा पाऊस व त्याची तारीख ही एक घटना असली तरी संदर्भानुसार त्याच्या वेगवेगळ्या तारखा मीडियाकडून वाचकांच्या, श्रोत्यांच्या कानावर कशा आदळतात आणि जनतेत त्यामुळे कसा गोंधळ उडतो, त्या तारखा व त्यांचे वर्गीकरण कसे तेही आपण बघूयात.

i)देशातून म्हणजे राजस्थानच्या अतिवायव्येकडील टोकाकडून पाऊस परत फिरण्यास सुरवात होणारी आतापर्यंतच्या नोंदीवरून असलेली सरासरी तारीख.

ii)देशातून दक्षिण द्वीपकल्पातील राज्यातून पाऊस पूर्णपणे निघून जाण्याची आणि तमिळनाडूत स्थिरावण्याची आतापर्यंतच्या नोंदीमध्ये असलेली सरासरी तारीख.

iii)वरील (i) मधील त्यावर्षीची प्रत्यक्ष तारीख.

iv)वरील (ii) मधील त्यावर्षीची प्रत्यक्ष तारीख.

v) महाराष्ट्रात पाऊस परत फिरण्यास सुरवात होण्याची त्यावर्षीची प्रत्यक्ष तारीख.

vi) महाराष्ट्रातून पाऊस पूर्णपणे निघून जाण्याची त्यावर्षीची प्रत्यक्ष तारीख.

(यामध्ये महाराष्ट्रातील v व vi मधील नोंदीनुसार सरासरी तारखा की साधारण ज्या अनुक्रमे १ व १० ऑक्टोबर आहेत त्या विचारात घेतल्या नाहीत )

Monsoon Update
Monsoon Prediction : माॅन्सून कधीपासून परतीच्या प्रवासावर निघणार ?

आता वरील क्रमानुसार या तारखा कोणत्या आहेत ते बघूयात.

i) १ सप्टेंबर

ii) ३० सप्टेंबर(अलीकडील आकडेवारीवरून ही तारीख १५ ऑक्टोबर पर्यंत गेली आहे )

iii) मागील वर्षी २०२१ मध्ये उशीर झाल्यामुळे ही तारीख ६ ऑक्टोबर होती. यावर्षी ही तारीख १७ ते २० सप्टेंबर किंवा त्यानंतर अपेक्षित असेल.

iv) मागील वर्षी २०२१ मध्ये ही उशिरामुळे तारीख २३ ऑक्टोबर ही होती. या वर्षी २०२२ ला ही तारीख ५ ते १० ऑक्टोबर दरम्यान किंवा त्या नंतर अपेक्षित ठेवू या!

v) मागील वर्षी २०२१ मध्ये उशिरामुळे महाराष्ट्रात ही तारीख १५ ऑक्टोबर ही होती. या वर्षीची तारीख येणारा काळ ठरवेल.

vi)मागील वर्षी २०२१ मध्ये उशिरामुळे महाराष्ट्रात ही तारीख १७ ऑक्टोबर ही होती. या वर्षीची तारीख येणारा काळ ठरवेल.

खरे तर या सर्व तारखांत राजस्थानमधून मोसमी पाऊस परत फिरण्यास सुरवात होणारी आणि संपूर्ण देशातून मोसमी पाऊस निघून पण फक्त तमिळनाडूमध्ये वेगळे नाव धारण करून तेथे पाऊस सुरु होण्याची तारीख या दोनच तारखा महत्त्वाच्या आहेत. कारण महाराष्ट्रातील या दोन आणि देशाच्या दोन तारखा यामध्ये विशेष असा काही जास्त दिवसांचा फरक नसतो. म्हणून कोणता संदर्भ सांगून तारीख सांगितली हे ही वाचकाने लक्षात घेणे गरजेचे आहे.

३) नैरूत्य मॉन्सूनची(परतीचा पाऊस) माघारीची सुरवात ः

देशाच्या अतिवायव्य टोकाकडील पश्चिम भागातून सहसा १ सप्टेंबरपूर्वी परतीच्या पावसाची माघारी फिरण्यास सुरवात होत नाही. तर ती १ सप्टेंबर नंतरच होते. त्याच्या घोषणेसाठी खालील मुख्य वातावरणीय बदलांचा विचार केला जातो.

i) सलग पाच दिवस त्या भागात पावसाची गतिविधिता थांबणे. म्हणजेच सलग पाच दिवस त्या भागात हवेच्या शुष्क वातावरणाचे प्राबल्य दिसते का? हे बघितले जाते .

ii)जमिनीपासून साधारण दीड किमी उंचीपर्यंत हवेचे उच्च दाबाची प्रत्यावर्ते (म्हणजे चक्रीवादळाच्या विरुद्धची स्थिती म्हणजे ज्यातून हवेच्या उच्च दाब वातावरणातून तयार होणारा आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बाहेर फेकणारा वेगवान भोवरा वारा) तयार होणे. म्हणूनच परतीचे मोसमी वारे जमिनीलगत पूर्वेकडून अंगावर आल्यासारखे भासतात.

iii) हवेतील आर्द्रता खूप कमी होणे. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण कमी होणे. म्हणजेच थोडक्यात हवेतील आर्द्रतेच्या सातत्याने कमी होण्याच्या प्रमाणाचे अवकाशीय सातत्याचे निरीक्षण करणे. हे डोळ्यापुढे प्रतिमा उभी राहील अशा उपग्रहीय चित्रातून तसेच दैनिक त्या भागातील रेखाटलेल्या 'टी-फाय' आलेखातून बघितले जाते.

४) आता देशातून परतीचा पाऊस पूर्णपणे निघून जाणे म्हणजे नैरूत्य मॉन्सूनचे सरासरी १ ऑक्टोबर नंतरच संपूर्ण देशातून परतीचा प्रवास करून पूर्णपणे निघून जाणे होय. देशाच्या दक्षिण द्विपकल्पतील तमिळनाडू, केरळ,पॉन्डेचरी काराईकल, आंध्र, येणम वगळता सर्व राज्यातून त्याचे पूर्णपणे उच्चाटन होते. अशावेळी देशात वाऱ्याच्या अभिसरणाच्या दिशेत होणारे बदलच दाखवून देतात की, देशात नैरूत्य मॉन्सूनचा अंमल संपला. हे बघितल्यानंतरच परतीच्या पावसाचे देशातून उच्चाटन झाले असे घोषित केले जाते.त्याच बरोबर तमिळनाडू राज्यात ईशान्य मॉन्सून किंवा हिवाळी पावसास सुरवात झाली असे समजले जाते.

--------------------------------------------

संपर्क ः

माणिकराव खुळे,

( लेखक भारतीय हवामान खात्यातील निवृत्त हवामान तज्ज्ञ आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com