Indian Politics : राजकारण चालले कुठल्या दिशेला?

या देशातील सुज्ञ नागरिकांनी राजकीय नेते आणि पक्षांनी मांडलेल्या भूमिकांतून सामान्यांना किती न्याय मिळाला, याचे आकलन केले पाहिजे.
Indian Politics
Indian PoliticsAgrowon

अतिश साळुंके

जनतेने ज्यांच्या हाती आपले वर्तमान आणि भविष्य सोपविले त्या राजकारण्यांमध्ये (Indian Politician) मात्र देशाचा भूतकाळातील इतिहास बदलायची चढा ओढ लागली आहे, सर्व राजकीय पक्षांमध्ये इतिहासकारांची गर्दी वाढत चालली आहे.

मनाला येईल तसा इतिहास सांगितला जात आहे. काही जणांना तर स्वतःला दिव्यदृष्टी प्राप्त झालीय असे वाटत आहे आणि रामायण, महाभारत, देवी, देवता, संत, प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व, इतिहास, धर्म, कूळ यांविषयी मनाला येईल तशी वक्तव्ये करत आहेत; या गोष्टींमुळे समाजात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, इतिहासात गुंतवून ठेवून सद्यपरिस्थितीतील महागाई आणि बेरोजगारी या आव्हानांवर कोणीही बोलत नाही.

त्यामुळे भविष्यात युवकांचा वापर देशाच्या उन्नतीसाठी (Country's Development) न होता समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी होऊ शकतो. राजकीय वक्तव्यातून (Political Statement) राजकारण्यांनाही केवळ एकच साध्य करायचं असतं मूळ मुद्द्याविरुद्ध जनतेला एकत्र न आणता त्यांना तथ्यहीन मुद्द्यांमध्ये विभागून ठेवायचं.

Indian Politics
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावरील सलग सुनावणी १४ फेब्रुवारीपासून

राजकीय नेत्यांचे दौरे

राजकारणी लोकांचे दौरे आणि प्रोटोकॉल जिथे खरंच गरज आहे अशा सामाजिक हिताचे जे कार्यक्रम असतील अशा वेळेसच राजकीय मंडळींनी दौरे करावे. स्वतःच्या पक्षाची बांधणी, पक्षाच्या मीटिंग, वैयक्तिक राजकीय भेटीगाठी यासारख्या दौऱ्यामध्ये शासकीय यंत्रणेचा वापर करू नये. आतापर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार मंत्र्यांच्या खासगी दौऱ्याचा खर्च हा संबंधित खात्यातील शासकीय अधिकाऱ्यांना करावा लागतो.

यामध्ये त्यांच्या हॉटेलमधल्या बुकिंगपासून पूर्ण दिवसभराची आर्थिक जबाबदारी घ्यावी लागते. अर्थातच यात खात्यातून वर्गणी काढावी लागते अशा गोष्टी पूर्वापार पद्धतीने चालत आल्यामुळे हेच शासकीय अधिकारी हा होणारा खर्च आपल्या पगारातून न करता वरच्या चिरीमिरीतून करत असतात हे सर्वज्ञात गुपित असून, यातून भ्रष्टाचाराला चालनाच मिळत असते. असल्या गोष्टी राजकीय व्यक्तींनी न घडण्यासाठी आपल्या पुढील खासगी कार्यक्रमात यावर कटाक्षाने लक्ष घालावे.

राजकीय नेत्यांचे कित्येक दौरे हे खासगी कामाच्या संदर्भात असतात, जसे लग्न समारोह, नवीन शॉप ओपनिंग, राजकीय मंडळींच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी भेटी, यामुळे नागरिकांची शासकीय कामे खोळंबली जातात. वाहतूक व्यवस्थेवरती ताण येऊन नागरिकांची गैरसोय होत असते.

सोबतच शासकीय निवासस्थानांचा वापर राजकारण्यांच्या नावाखाली त्यांचे कार्यकर्ते शासकीय निवासस्थानात राहतात, शासकीय निवासस्थानी परस्पर भाड्याने ही देतात, काही अघटित घटना शासकीय निवासस्थानात घडायची वाट न बघता शासनाने याची योग्य ती दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी.

Indian Politics
Maharashtra Politics : सत्यजित तांबे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात

वृत्तवाहिन्यांचा अजेंडा

लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि जनतेचे प्रश्‍न मांडण्याचे माध्यम म्हणून आपण ज्याच्याकडे आशेने बघत असतो अशा माध्यमातील काही वृत्तवाहिन्या उर्फी जावेद, लव जिहाद वर दिवसभर चर्चा घडवतात.

एकीकडे अशा बातम्या दाखवायच्या आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्यावरती एखादं चर्चासत्र सुद्धा केले जात नाही हा विरोधाभास नाही का? टीआरपीच्या नावावरती नेत्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आणि त्याच्यावरती आपले दिवसभराचे प्रोग्रॅम चालवायचे आणि मूळ मुद्द्यापासून समाजाला दूर ठेवायचं तसेच न्यायालयीन प्रविष्ट गोष्टींवर दिवसभर चर्चा करायची आणि स्वतःची प्रति न्यायालय बनवून त्याच्यावरती निर्णय सुद्धा द्यायचा.

कुठलाही अपराध हा वैयक्तिक विकृतीतून होतो धार्मिक विकृतीतून नाही याचे भान ठेवून त्याला धार्मिक रंग देऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम वृत्तवाहिन्यांनी करू नये.

राजकीय पक्षांचा अजेंडा

गतवर्षामध्ये वृत्तवाहिन्यांनी सर्व राजकीय पक्षांना आणि प्रसिद्धी झोतात राहू पाहणाऱ्या नेत्यांना समान न्याय दिला. भोंग्याचा विषय असेल, हनुमान स्तोत्राचा विषय असेल, पक्षीय उठाव, उठाव नव्हे ही तर गद्दारी, खरे हिंदुत्व कुणाचे, चित्रपटांचा विरोध, एसटी कर्मचारी यांना न्याय, काय झाडी... काय डोंगर... काय हाटील... याचाही विषय असेल यांत सर्वांना समान न्याय दिल्याचे पाहावयास मिळाले.

काही पक्षांनी तर बॉलिवूडमध्ये जसा नवीन चित्रपट येईल, अथवा समाजामध्ये जशा घटना घडतील त्या वेळेनुसार आपले अजेंडे ठरविले. काश्मीर फाइल्स रिलीज झाला, की काश्मिरी पंडित आणि हिंदुत्व, लव जिहाद, गेल्या वर्षभरात या विषयांवर सर्वच पक्षांनी उठाव, मोर्चे केले.

जनतेने आंदोलन मोर्चा आणि निषेध यातून साध्य काय झालं यासोबतच यामध्ये जनतेच्या जिव्हाळ्याचे पोटापाण्याचे किती प्रश्‍न सुटले, याचा विचार सुज्ञ नागरिकांनी करावा.

राजकारण

राजकारणी मंडळींनी मतदाराला जात, धर्म, आरक्षण आणि गटामध्ये विखरून ठेवले आहे. जनतेला विभागण्याच्या कामाबरोबर स्वतःची ताकद स्वतःच्या पक्षाची ताकद दाखवण्यातच राजकारणी व्यस्त असतात. खरे तर महापुरुषांना कुठल्याही जातीपुरते अथवा पक्षापुरते मर्यादित न ठेवता त्यांचा आदर्श सर्व जनतेने घेतला पाहिजे. परंतु महापुरुषांवरील बेताल वक्तव्यांवरून राजकारणी मंडळी केवळ आपली पोळी भाजण्याच्या प्रयत्नात व्यस्त असतात.

विभाजित झाल्यामुळे सामान्य माणसांचा दृष्टिकोन हा बदलत चालला आहे. दुसऱ्याची अडचण आपली नाही असे समजून आपण एकत्र न येता तो आपला मुद्दा नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो परंतु ही इंग्रज नीती वापरून राजकारणी आपल्याला हुकूमशहा पद्धतीनेच वागवत असतात. पूर्वी राजा राज्य करताना व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवला जात असून, खरे जनतेच्या हिताचे राज्य असायचे. परंतु सध्या राजाच उद्योगपती आणि ठेकेदारांच्या मर्जीनुसार निर्णय घेत असून, केवळ यातून मोठ्या वर्गातील लोकांचेच हित साध्य होत आहे.

त्यामुळे आर्थिक विषमतेची दरी अधिकच खोलवर होत चालली आहे. राजाने नेहमी जनतेसोबत राहून राज्य केले पाहिजे जेव्हा राजा चार मंडलिकांसोबतच महालात बसून चार भिंतीतच चर्चा करून मंडलिकांच्या हिताचा विचार करून राज्य चालवत असेल आणि सामान्य माणसाला अनुदान एक रुपया मात्र याच अनुदान वितरणाच्या जाहिराती वरती शंभर रुपयाचा खर्च आणि याच जनतेकडून कररूपी लाखो रुपयांची वसुली करत असेल, तर ही लोकशाहीची थट्टा तर नाही ना हा विचार सुज्ञ नागरिकांनी केला पाहिजे.

राजकीय बोधार्थ घटना

एका नामांकित राजकारणी व्यक्तीचा गावाकडे दौरा होता. दोन-तीन कुत्री लांबूनच नेत्यावरती भुंकायला लागली कार्यकर्त्यांनी दगडे मारण्यासाठी उचलली तर नेत्याने त्यांना अडवले आणि आता मजा बघा म्हणून कार्यकर्त्याला बिस्किटाचे पुडे आणायला सांगितले आणि नेत्याने लांबच्या कुत्र्यांना हळूहळू बिस्किटे टाकून त्यांना शेपटी हलवत स्वतःच्या जवळ पायापर्यंत आणले नंतर याच कुत्र्यांना हाड म्हणून लाथ मारून हाकलून दिले. सुज्ञ मतदार नागरिकांनी आता कुत्रा कोण याचे उत्तर शोधावे?

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com