
Pune News : पुणे विभागात आडसाली, पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा उसाचे सरासरी तीन लाख ४३ हजार ३९२ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत चार लाख १३ हजार १५० हेक्टरवर ऊस लागवडी झाल्या आहेत.
यामध्ये शेतकऱ्यांनी एक लाख ६९ हजार हेक्टर खोडवा उसाचे क्षेत्र राखले असल्याचे चित्र असून, सरासरीच्या तुलनेत ऊस क्षेत्रात ६९ हजार ७५८ हेक्टरने वाढ झाली आहे.
दरवर्षी बहुतांशी शेतकरी आडसाली उसाच्या लागवडी करतात. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीवर भर दिला. परिणामी, ऊस लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे.
दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामांत उसाच्या लागवडी करतात. जून ते जुलै महिन्यांत आडसाली उसाच्या, तर ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये पूर्वहंगामी व ऑक्टोबरनंतर सुरू उसाच्या शेतकरी प्रामुख्याने लागवडी करतात.
आडसाली उसाच्या लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी, तर पूर्वहंगामी १२ ते १४, पूर्वहंगामी १० ते १२ महिन्यांनी ऊस साखर कारखान्यास तोडणीस देतात. गेल्या वर्षी १३ जानेवारीअखेरपर्यत एक लाख ८६ हजार ५४० हेक्टरवर लागवडी झाल्या होत्या. यंदा आडसाली उसाच्या एक लाख २० हजार ८० हेक्टर, पूर्वहंगामी ७८ हजार ५७३ हेक्टर, सुरू ४४ हजार ५३४ हेक्टर आणि खोडवा उसाच्या एक लाख ६९ हजार ९६३ हेक्टरवर लागवड झाली आहे.
विभागातील नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर, इंदापूर, जुन्नर, हवेली, बारामती या तालुक्यांतही लागवडी झाल्या आहेत.
मुळशी, मावळ, वेल्हे, खेड हे तालुके उसाच्या लागवडीपासून दूर आहेत. सोलापूरातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांत उसाच्या लागवडी झाल्या आहेत. तर बार्शी, सांगोला, उत्तर सोलापूर तालुक्यांत कमी लागवडी झाल्या आहेत.
जिल्हानिहाय आडसाली उसाच्या झालेल्या लागवडी (क्षेत्र, हेक्टरमध्ये)
जिल्हा ---- सरासरी क्षेत्र --- यंदा झालेली आडसाली ऊस लागवड
नगर --- ९४,६९३ --- ८९,६५०
पुणे --- १,१७,०७१ ---१,०४,४७९
सोलापूर --- १,३१,६२८ --- २,१९,०२२
एकूण --- ३,४३,३९२ --- ४,१३,१५०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.