भारताची श्रीलंकेला मदत; देणार ६५ हजार टन युरिया

आर्थिक आणि राजकीय संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताने ६५ हजार टन युरिया द्यायचे कबूल केले आहे. भारताच्या या निर्णयामुळे श्रीलंकेला भातपीक लागवडीच्या हंगामात दिलासा मिळणार आहे.
भारताची श्रीलंकेला मदत; देणार ६५ हजार टन युरिया
Urea Supply Agrowon

आर्थिक आणि राजकीय संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताने ६५ हजार टन युरिया द्यायचे कबूल केले आहे. भारताच्या या निर्णयामुळे श्रीलंकेला भातपीक लागवडीच्या हंगामात दिलासा मिळणार आहे. भात पिकाच्या लागवडीसाठी श्रीलंकेला युरियाची गरज भासते आहे. भारताच्या मदतीमुळे श्रीलंकेची युरियाची गरज भागणार आहे.

श्रीलंकेचे दिल्लीतील उच्चायुक्त मिलिंद मार्गोडा आणि केंद्रीय खत मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार चतुर्वेदी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर भारताने श्रीलंकेला ६५ हजार टन युरिया देण्याचा निर्णय घेतला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. गुरुवारी (दिनांक १३ मे) मार्गोडा यांनी केंद्रीय खत मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार चतुर्वेदी यांची भेट घेतली. या भेटीत मार्गोडा यांनी श्रीलंकेतील भात पीक लागवडीच्या हंगामासाठी खतांच्या कमतरतेची व्यथा बोलून दाखवली. त्यावर चतुर्वेदी यांनी भारत श्रीलंकेला ६५ हजार टन युरिया पाठवणार असल्याचे सांगितले.

तसेच भारताकडून श्रीलंकेला केल्या वित्तपुरवठ्याच्या मर्यादेत या मदतीच्या संभाव्य समावेशावरही या दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. भारताकडून खतांची निर्यात केली जात नसतानाही केवळ शेजारधर्म पाळायचा म्हणून भारताने श्रीलंकेला युरिया पुरवण्याचे कबूल केल्याचे चतुर्वेदी म्हणाले आहेत. ऐन हंगामात श्रीलंकेला युरियाची कमतरता भासू नये या हेतूने भारताकडून हा युरिया लवकरच श्रीलंकेत रवाना केला जाणार असल्याचेही चतुर्वेदी म्हणाले आहेत.

दरम्यान श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेतील परिस्थिती चिघळली असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अशा परिस्थिती भारताने शेजारधर्म निभावत आतापर्यंत ३.५ अब्ज डॉलरची मदत केली आहे.

तत्पूर्वी श्रीलंका सरकारने रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचा निर्णय अंमलात आणला. गेल्यावर्षी रासायनिक खतांच्या वापरास मनाई केली होती. त्याचा मोठा परिणाम श्रीलंकेच्या कृषी उत्पादनावर दिसून आला आहे. दरम्यान रनिल विक्रमसिंगे यांची श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या आर्थिक संकटात त्यांनी सर्वसामान्य जनतेला पेट्रोल, डिझेल आणि विजेचा पुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.