
Kharif Season Parbhani News : येत्या खरीप हंगामात विविध पिकांवरील कीड-रोग व्यवस्थापनाची प्रमाणित कार्यप्रणाली जास्तीजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी लागेल. शेतकऱ्यांच्या पीक व्यवस्थाापन विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व शेतकरी यांनी समन्वयातून एकत्रित कार्य करावे लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर व लातूर कृषी विभाग अंतर्गंत खरीप हंगामातील संभाव्य कीड-रोग व्यवस्थापनासाठी पूर्व तयारी व विशेष मोहीम बैठक सोमवारी (ता.८) दुपारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांच्यातर्फे कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. इंद्र मणी होते.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी.देवसरकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर (लातूर), आर. टी. जाधव(छत्रपती संभाजीनगर), परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुरा लोखंडे, किटकशास्त्रज्ञ डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. इंद्र मणी म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या खरिपात शंखी गोगलगायींमुळे मोठे नुकसान झाले. येत्या हंगामात या किडींचा प्राद्रुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करावा. त्यादृष्टीने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती करावी.
खरिपातील पीकसंरक्षणासाठी महिनानिहाय कॅलेंडर तयार करावे.कृषी विभागाच्या उपक्रमात कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांना सहभागी करून घेतल्यास शेतकऱ्यांपर्यंत अधिकप्रभावीपणे सल्ला पोहचविता येईल. विविध पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करावेत.’’
डॉ. देवसरकर म्हणाले, ‘‘कृषी विद्यापीठाची विस्तार यंत्रणा तसेच कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत कीड-रोग व्यवस्थापन सल्ला पोहचविण्यासाठी आधुनिक माध्यमांचा वापर केला जाईल.’’
यावेळी डॉ.पुरुषोत्तम झंवर म्हणाले, ‘‘अवकाळी पावसामुळे शंखी गोगलगायीची सुप्त अवस्था संपू शकते.त्यावर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून वेळीच उपयायोजना कराव्यात.’
डॉ. बि. व्ही. भेदे म्हणाले, की यंदा फरदड कपाशीचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षात गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी राबविलेली मोहीम निष्फळ होऊ शकते.गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी जागरूक राहावे.
डॉ.राजेंद्र जाधव म्हणाले, सोयाबीनवरी खोड माशी ही महत्त्वाची कीड आहे.ही कीड नेहमी आर्थिक पातळीपेक्षा जास्त आढळून येते. डॉ. अनंत लाड यांनी हुमणी व्यवस्थापनावर, तर डॉ.अरविंद पंडागळे यांनी कपाशीची उत्पादकता वाढ यावर माहिती दिली.
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ सहभागी झाले होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.