Joyful Farming: आनंददायी शेती शक्य आहे का?

रूद्रा हट हे आमचं घर शेतातच आहे. तिथं आमच्या आधीच पाखरं, खारूताई आणि मुंगसांचा सीताफळांचा हंगाम सुरू झालाय. शेतातील फळांवर त्यांचा पहिला हक्क आहे, हे आम्हाला मान्यच आहे.
Joyful Farming
Joyful Farming Agrowon

रूद्रा हट हे आमचं घर शेतातच आहे. तिथं आमच्या आधीच पाखरं, खारूताई आणि मुंगसांचा सीताफळांचा हंगाम सुरू झालाय. शेतातील फळांवर त्यांचा पहिला हक्क आहे, हे आम्हाला मान्यच आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हे सगळे वन्यजीव माणसांसारखे हावरट नसतात. ते त्यांच्या भुकेपुरतंच खातात. त्यामुळं आम्हाला आमचा हिस्सा मिळतोच...

Joyful Farming
Indian Politics : पक्षनिष्ठा, विचारधारा लोप पावतेय!

माणसांची भूक मात्र प्रचंड आहे. संचयाची त्यांची हाव अफाट आहे. कुंपणाबाहेर आठ-दहा सीताफळांची झाडं आहेत. त्या झाडांना परिपक्व झालेलं सीताफळ कधीच बघायला मिळत नाही. रस्त्याने जा-ये करणारे अपरिपक्व फळं तोडून नेतात. ती नीट पिकत नाहीत. गोड लागत नाहीत... पण फुकटची फळं तोडून नेली, याचं समाधान त्यांना अधिक मिळत असावं! माणूस हेच अनेक समस्यांचं मूळ आहे.

पाच-सहा दिवसांपासून परिपक्व सीताफळं माझं लक्ष वेधून घेत होती. पण अनेक व्याप मागं लागल्यामुळे निवांतपणा मिळत नव्हता. आज सकाळी फिरायला जाण्याऐवजी सीताफळांच्या भेटीला गेलो. गेल्या बरोबर मुंगसाच्या एका छोट्या पिलाने लक्ष वेधून घेतलं. झाडावर चढून ते सीताफळ खात होतं. मला बघून धडपडून खाली पडलं...पण पळालं नाही. काही अंतर राखून गवतामधून माझ्या हालचाली ते बघत होतं. मी त्यानं अर्धवट खाल्लेलं सीताफळ तोडून त्याच्या दिशेनं फेकलं. ते त्यानं खाल्लं. मी बराच प्रयत्न करूनही ते माझ्या मोबाईल कॅमेऱ्याच्या टप्प्यात येईना. दहा-बारा फोटोंमधील एका फोटोत सावलीसारखं ते दिसतं. फोटो झूम केल्यानंतर. आता निसर्गासोबत आमचं वनभोजन सुरू झालंय.

Joyful Farming
Indian Agriculture : या तरुणांनो, परत फिरा रे!

गेला आठवडा भरपूर शारीरिक कष्ट, पळापळी करण्यात गेला. जागरणं झाली. रात्री-बेरात्री खावं लागलं. पाऊस झाल्याने आता थोडंस निवांतपण आहे. या शेताच्या लफड्याने जीव मेटाकुटीला आलाय...नको हे शेत..असं वाटतयं. ही मानसिकता सगळ्याच शेतकऱ्यांची झालीय. काल बाजारात कितीतरी शेतकऱ्यांशी बोललो. सगळे कदरून गेलेत. शेतीबद्दल आनंद व्यक्त करणारा एकजणही मला भेटला नाही. शेतीत कोणीच काम करायला तयार नाही, हे सगळ्यांच प्रमुख दुखणं आहे. यावर सध्या तरी औषध दिसत नाही.

मी नेहमी म्हणतो की, मला शेतीचा हा त्रास विसरण्यासाठी विविध फळा-फुलांची छोटीशी बाग आहे. मी निसर्ग वाचतो. पुस्तकं वाचतो. लिहितो. एकाच मुडमध्ये अडकून पडत नाही. विविध छंदांत मी रमतो. एका वेगळ्या दुनियेत जगतो. पण केवळ शेतीत अडकलेल्यांचं काय?

मला कायम असं वाटतं की, माझ्या फेसबुकच्या यादीत जास्तीत जास्त शेतकरी असायला हवेत. माझं जगणं त्यांच्या उपयोगाचं आहे. यातून त्यांच्या जीवनशैलीत बदल करून घेण्याची संधी आहे. मी अॅग्रोवनमध्ये नियमित लिहितो. या लेखांवर सामान्य शेतकरी ज्या पध्दतीने माझ्याशी व्यक्त होतात, ते पाहून मला त्यांच्यासोबतचा संवाद मोलाचा वाटतो. त्यांना असंही जगता येतं हे दाखविण्याची गरज आहे.

शेतीचे भोग संपण्याची सध्या कुठलीच चिन्हं दिसत नाहीत. उलट यापेक्षा अधिक वाईट दिवस येतील, असाच सध्याचा रागरंग आहे. अशा काळात शेतकऱ्यांनी माझी 'आनंददायी शेती' ची कल्पना अंमलात आणण्याची गरज आहे. शेतीतून आर्थिक प्रश्न सुटत नाहीत म्हणून आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलण्यातून काहीच निष्पन्न होत नाही. उलट कुटुंबाची फरपट होते. त्यामुळं शेती आपल्याला ऐशोआरामीचं तर सोडाच चांगलं आर्थिक स्थैर्य देऊ शकत नाही, हे मनात पक्कं बिंबवण्याची गरज आहे. त्यासाठी शेतीशिवाय दुसरी व्यवस्था करावीच लागेल. फक्त शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही.

मात्र ही शेती तुमचं जगणं आनंददायी, आरोग्यदायी करू शकते, हे मी अनुभवत असलेलं वास्तव आहे. शेतीतून आनंद मिळू शकतो. जीवनशैलीतला बदल तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल. अर्थात त्यासाठी तुम्हाला तुमचा जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलावा लागेल. हे कठीण आहे पण अशक्य नाही. त्यासाठी मनाचा निर्धार करण्याची गरज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com