Animal Story : नवा बैल आणायचा तरी सोप्प हाये का ?

रामभाऊ ओसरीवर डोकं धरून बसला होता.चिंता तशा अनेक असतात शेतकऱ्यांना, पण आजची घटना जीवाला घोर लावणारी होती.
 Animal Story
Animal StoryAgrowon

लेखक - शंकर बहिरट

रामभाऊ ओसरीवर (Rambhau Osrikar) डोकं धरून बसला होता.चिंता तशा अनेक असतात शेतकऱ्यांना, पण आजची घटना जीवाला घोर लावणारी होती.
आठवड्यापूर्वी त्याच्या हावश्याने अचानक खाणे पिणे सोडले होते.गेले सातआठ दिवस रोज औषध पाणी चालू होते.डॉक्टरांना काही केल्या आजाराचे निदान होत नव्हते.रोजचा खर्च वाढत होता आणि हावश्याची तब्येत ढासळत चालली होती.शेवटी काल डॉक्टरांनी अंदाज केला
"कदाचित चारा खाताना एखादी टोकदार सुई किंवा खिळ्यासारखी लोखंडी वस्तु पोटात गेली असण्याची शक्यता आहे. त्यासाठी एक्सरे काढून नक्की खात्री करावी लागेल.त्यानंतर  ऑपरेशन करावे लागेल.मात्र त्यासाठी बैलाला शहरात मोठ्या दवाखान्यात घेऊन यावे लागेल".
असे सांगून डॉक्टर निघून गेले.
आठवड्या भरात जवळचे सगळे पैसे संपत आले होते पण घरच्या गाईचा जोपलेला बैल उसनवारी करावी लागली तरी बेहत्तर पण खडखडीत बरा करायचा असा रामभाऊने निश्चय केला.
           

 Animal Story
बैल गेला अन् पोळा राहिला

आज सकाळी एखादा टेम्पो करून हावश्याला दवाखाण्यात घेऊन जायच्या आधी गोठ्यात चक्कर मारायला रामभाऊ गेला तर हावश्या निपचीत पडलेला....
         एखादा जवळचा माणूस गेल्या सारखा रामभाऊ ढसाढसा रडायला लागला.शेजारी पाजारी जमा झाले त्याची समजूत काढू लागले.
रामभाऊ दिवसभर दुःखी कष्टी होऊन ओसरीवरच बसून राहिला.संध्याकाळी चुलत भाऊ सदाने त्याची समजूत काढली.आपण आठवडी बाजारात जाऊन नवा बैल आणू म्हणाला.
दोन दिवस उलटून गेले रामभाऊंचे कामात लक्ष लागेना.दोन वळीव पडून गेले होते.रानातली ढेकळं मऊ झाली होती.लगबगीने पाळ्या घालून पेरणी साठी रान तयार करायचे होते कारण मिरीग तोंडावर आला होता.काही झाले तरी त्याला मिरीगाची वाफ जाऊ द्यायची नव्हती.
     आजपर्यंत त्याचा एक आणि चुलत भाऊ सदाचा एक अशी दोघात सावड करून एका बैल जोडीत त्यांची दोघांची एकूण दहा बारा एकर जमीन ते कसत होते.तसे दोघेही धोरणी होते आणि त्यांचे चांगले पटतही होते.औजारांच्या बाबतीतही दोघांनी वेगवेगळी औजारे तयार करण्याऐवजी त्यांची सगळी औजारे सामायिक होती.आजोबांच्या काळात शेती एकत्र होती.आता मात्र विभागण्या होत गेल्या पुढेही होतील.आताच पाच सहा एकरासाठी बैल जोडी आणि औजारे घेणे त्यांना परवडणारे नव्हते म्हणुन समजुतीने त्यांचे सगळे व्यवहार चालू होते.

"आवं आसं किती दिवस डोकं धरून बसणार ? काय म्हणले सदा भावजी ? "
रामभाऊ ची बायको रखमा हुशार होती.दोन दिवस तीही खूप विचार करत होती.
  "मी काय म्हणते आयकता का जरा"
"बोल"
"आता सदा भावजी नवा बैल आणायचा म्हणत असतील.त्यांचंही बरुबर हाये म्हणा .हावश्या मेला त्यांच्या नवश्याला जोड पायजेलच"
"व्हय"

 Animal Story
बैल सजावटीचे साहित्य खरेदीला प्रतिसाद कमी

"नवा बैल आणायचा तरी सोप्प हाये का ? हावश्या सारखा बैल मिळल का ? मिळाला तरी त्याची खोड औताला जुंपल्याशिवाय कशी कळणार ? "
"व्हय गं !" रामभाऊ चर्चा करायच्या मनस्थितीत नव्हता.
"आता मी काय म्हणते ते आयका, सदा भावजीला सांगा नवश्याला इकून टाका आपण दोघात टॅक्टर घीऊ. मला माहित आहे काही वर्ष तुमी गावातला  तरकारीचा टेम्पो चालवत व्हता, मग ट्रॅक्टर काय अवघड हाय का ?"
"तू लागली का शानपणा शिकवायला ! "
रामभाऊ ताडकन उठला आणि गोठ्याकडे गेला.रखमा त्याच्या मागे मागे गेली.
"आवं आयकून तर घ्या मी काय वाईट सांगतेय का ?"
"तुला कळतय का काही! आता पावसाळ्यात ट्रॅक्टर इकत घेऊन  काय पेरणी सोडून नांगरट करत बसू का ?"

 Animal Story
बैल पोळा सणाच्या तोंडावर बाजार सुनासुना 

"छोटा टॅक्टर घ्या की, सगळी कामे होतील पेरणी पासून नांगरटी पर्यंत"
  तेव्हढ्यात हातावर तंबाखु चोळत सदा आला.रामभाऊ त्याला बघून पुन्हा ओसरीवर आला.
" रामा आता व्हायचं ते झालं कामगती रखडल्यात. काय ठरलं मग,जायचं ना बैल आणायला ?" ओसरीवर बसता बसता सदाने तंबाखु तोंडात टाकली.
"सदा आपण आसं केलं तर ?"रामभाऊ चाचरत बोलला.
"आता फांद्या फोडीत बसू नको.पेरण्या तोंडावर आल्यात.नवश्याच्या जोडीला काय आपुण जुंपून घ्यायचं का आळीपाळीनं ? ऑ ?"
"भावजी ते टॅक्टर घ्यायचा म्हणत्यात"
रामभाऊ ची जीभ रेटत नव्हती म्हणून रखमा मध्ये बोलली.
"टॅक्टर घेऊन काय वल्यात रानं तूडवायची व्हय ?"

"बारका टॅक्टर निघालाय की आता,माझ्या माहेराला एकानं घेतलाय"
"मोठा काय आन बारका काय , टॅक्टरच त्यो ! रामा बग बॉ गावात हसू व्हईल आपल्या बापाजन्मी अशी शेती केली व्हती का कुणी?"
"सासरवाडीला गेलो होतो तवा पाह्यलाय त्यो टॅक्टर, चांगलं काम व्हतंय त्यानी, आन एक बैल पाळायचा  म्हणलं तरी आपल्याशिवाय कुणाला सोडबांध करून देत नाय.काम आसू नसू रोजचं वैरणपाणी शेणकुर चुकत नाय.त्याच्यामुळं कुठं जाता येत नाय." रामभाऊ बोलता झाला.
"म्हंजी टॅक्टरचा घेर चांगलाच तुह्या डोक्यात बसलाय की! आरं बैला शिवाय शेती खोटी. आपले बापजादे काय येडे व्हते का?"
"सदा थोडं आयकुन तर घे "
"काय आयकून घेऊ!"

सदा संतापला आणि हात झटकून निघाला
"मी शनवारी बैल आणायला जातोय.तुला काय करायचं ते तू ठरव. आज पासून आपली सावड संपली ! बायका नको तिथं डोकं चालवायला लागल्या की हे आसच व्हणार !" सदा तनतन करत निघून गेला.
       सदाला आपण उगीचच दुखावले याची चुटपुट रामभाऊला लागून राहिली.रामभाऊची मात्र आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली . " रखमा तुझा शहाणपणा नडला बग! बैल तर मेलाच सदाबरोबरची इतक्या वर्षांची सावड तुटली आन एकट्यानं ट्रॅक्टर घेणं काय खायचं काम आहे का ? "
       "तुमी काळजी करू नका,आपण कर्ज प्रकरण करू चौथाई भरायला माझा दोन तोळ्याचा डाग हाय त्यो मोडू नायतरी वर्षातून कधीतरी सणावारालाच घालते  तसाही तो पडूनच असतोय. उग चोरा चिलटाची भीती! त्यापेक्षा तो कारणी तरी लागल. "
शनिवारच्या बाजारात जाऊन सदाने हावश्या सारखाच देखणा व धिप्पाड खिलारी बैल आणला आणि त्याने कुळव जोडून उभाटी पाळी चालु केली.
     

  रामभाऊला आता दुसरा पर्याय नव्हताच.जवळच्या शहरात जाऊन त्याने छोट्या ट्रॅक्टरची चौकशी केली. वेगवेगळ्या कंपन्यांच्या ट्रॅक्टरची माहिती घेऊन इतर आवाजारांसाहित  कोटेशन काढले त्यावर पंचवीस टक्के सरकारी अनुदान होते ही नवीन माहिती सुद्धा त्याला समजली.
सातबाराचे पेपर देऊन आढवड्याभरात कर्ज प्रकरण मंजूर झाले.रखमाचा डाग मोडून चौथाई भरली आणि ट्रॅक्टर ,नांगर,रोटावेटर,छोटी ट्रॉली आणि ऑटोमॅटिक पेरणीयंत्र आनंदाने घरी घेऊन आला.रखमाने खुशीत ट्रॅक्टरची पूजा केली.
     रामभाऊ च्या अंगणात सगळी वस्ती लोटली होती,कारण गावात पाहिल्यांदाच इतका लहान ट्रॅक्टर आला होता.पोरं कौतुकाने बघत होती मात्र बाया बापड्या नाकं मुरडत होत्या,मोठी माणसं आपापसात कानात कुजबुजत होती.काय येड लागलंय का याला कसलं खेळणं घेऊन आलाय हा! म्हणत फिदीफिदी हसत होते.सदा सुद्धा दुरून मजा बघत होता.रामभाऊ ने त्याला बोलावले तर तो घरात निघून गेला.
         

 दुसऱ्या दिवशी तांबडं फुटायच्या आत रामभाऊने वावरात रोटाव्हेटर सुरू केला.रोटाव्हेटर ने वावरातला कचरा बारीक होऊन मातीत मिसळला गेला.ढेकळं बारीक होऊन वावरं पोळी सारखी मऊ दिसायला लागली.दोन दिवसात सहा एकरची मशागत करून रामभाऊ पेरणी साठी मिरगाची वाट पाहू लागला.
रामभाऊला हळू हळू अनेक गोष्टीचा उलगडा व्हायला लागला.दिवसभर बैलांना हाकून आणि औत धरून संध्याकाळी त्याचा जीव अगदी मेटाकुटीला यायचा तरी काम संपत नव्हते बैलाला वैरणपाणी आणि रात्री अचानक सुटतो की काय याची काळजी असायची.आता मात्र सकाळी एकदा डिझेल टाकले आणि थोडीशी देखभाल केली की दिवसभर ट्रॅक्टर चालवून रामभाऊ पहिल्या इतका थकत नव्हता आणि संध्याकाळी ट्रॅक्टर अंगणात उभा करून निवांत झोपी जात होता.

सदाला मात्र आठवडा झाला तरी काम उरकत नव्हते.नवा बैल भलताच अवखळ आणि मारका होता.त्याचे औत काही सरळ चालत नव्हते.तो पुरता वैतागला होता.दुपारी अचानक पाऊस फुटला आणि वावधान सुरू झाले आता जोराचा पाऊस येणार म्हणून सदा घाईघाईने औत सोडायला बैलाची जुंपनी काढत होता तेवढ्यात गाफील क्षणी नव्या बैलाने घात केलाच. विजेच्या चपळाईने बैलाने मान  खालून वर फिरवली तसे बैलाचे शिंग सदाची पँट टराटरा फाडत मांडीत घुसले.सदा जीवाच्या आकांताने ओरडू लागला.शेजारी पाजारी पळत आले.रामभाऊ सुद्धा धावत आला. बैलाला दगडी मारून,आरडा ओरडा करून दूर हाकलले.जोराचा पाऊस सुरू झाला होता.रामभाऊने उभ्या पावसात सदाला तातडीने दवाखान्यात नेले.
डॉक्टरांनी सदाला धीर दिला

"जास्त काही नाही थोडे रक्त गेले आहे त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा आला आहे जखमेला टाके घालून महिनाभर विश्रांती घेतली की तुम्ही ठणठणीत बरे व्हाल"
सदाला काळजी पडली त्याच्या डोळ्यात पाणी आले "रामा..आता मी पेरणी कशी करू रं "
"सदा आरं मी हाये ना तू अजिबात काळजी करू नको"
"आरं ट्रॅक्टरनं जमल का नीट?"
"सदा तो पर्यंत तू घरी येशीलच की, उगवून आल्यावर मग मला बोल"
सदाला त्या अवस्थेतही ट्रॅक्टरवर भरोसा नव्हता पण त्याचा नाईलाज होता.
रामभाऊ ने वाफसा झाल्या झाल्या ऑटोमॅटिक पेरणी यंत्र जोडले आणि दोन दिवसांत दोघांची पेरणी उरकली.
आठवड्यानंतर सदाला हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळाला.गावातून येताना जिकडे तिकडे बैलांच्या पाभारीने पेरणीची लगबग सुरू होती.आपले काय झाले असेल याची चिंता त्याला लागली होती.घरी आल्यावर त्याला वावरात गेल्याशिवाय राहवले नाही.
बघतो तर काय अगदी पट्टीने मोजून लावल्यासारखे एक एक रोपटे अगदी रांगेत टवकारून उगवले होते.
अशी पेरणी त्याने कधीच बघितली नव्हती.रामभाऊ आणि रखमा बांधावर उभे होते.सदाने त्यांना जवळ बोलावले
" टॅक्टरनं इतकं चांगलं आन जोरात काम होतं खरंच मला माहित नव्हतं उद्याच्या शनवारी बैल जोडी विकून टाकतो.मी किती पैसे द्यायचे ते सांग पण आपली सावड चालू ठेव "
सदा गहिवरून बोलता होता आणि रामभाऊ त्याला जवळ घेऊन
"पैशाची घाई नाही तू आधी बरा हो "म्हणत होता.

 Animal Story
Lumpy Skin : यात्रेतील बैल बाजारावर लम्पी स्कीनचे सावट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com