
गुजरातमध्ये लंपी त्वचा रोगामुळे (Lumpy Skin Disease) पशुपालक हैराण झाले आहेत. या रोगामुळे तेथील दुभत्या जनावरांचं दूध उत्पादन घटलं (Milk Production) आहे. महाराष्ट्रातही या रोगाचा प्रसार होईल का, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
गुजरातमधील एकूण ३३ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यांमध्ये लंपी त्वचा रोग पसरला आहे. यातील बहुतेक जिल्हे दूध उत्पादनात अग्रेसर आहेत. त्यामुळे राज्याच्या दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे.
या रोगाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव कच्छ जिल्ह्यात झाला. राज्यात लंपी त्वचा रोगाची लागण झालेल्या जनावरांची संख्या ५४ हजारांच्या घरात आहे. त्यापैकी एकट्या कच्छ जिल्ह्यात सुमारे ३८ हजार जनावरे आहेत.
गुजरात हे महाराष्ट्राचं शेजारी राज्य आहे. गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. अनेक शेतकरी दुधाच्या जोडधंद्यावर अवलंबून आहेत. ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये दुधधंद्याचा वाटा मोठा आहे. गुजरातमधील लंपी त्वचा रोगाचं लोण महाराष्ट्रातही पसरेल का, अशी काळजी शेतकऱ्यांना वाटत आहे.
लक्षणे कशी ओळखावीत?
लंपी त्वचा हा विषाणूजन्य रोग असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांचे दूध घटते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. जनावराला ताप येतो, डोळ्यातून व नाकातून पाणी येते. यानंतर जनावराच्या सर्व शरीरावर कडक आणि गोल आकाराच्या गाठी येतात.
बाधित जनावराच्या त्वचेवरील व्रण, नाकातील स्राव, दूध, लाळ, वीर्य, इ. माध्यमामार्फत हा रोग निरोगी जनावरांत पसरतो. त्यामुळे बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील परिस्थिती काय आहे?
महाराष्ट्रात हा रोग २०२० - २१ मध्येच सर्व विभागांत येऊन गेला आहे. या काळात लसीकरण झाले असल्यामुळे जनावरांमध्ये आवश्यक प्रतिकारशक्ती तयार झाली आहे, असे म्हणावे लागेल. महाराष्ट्राला या रोगाच्या साथीचा अनुभव असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने या रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपायोजनांची तयारी करुन ठेवलेली आहे.
असे असले तरीही गुजरातमधील स्थिती पाहता आपण सावध राहणे आवश्यक आहे. त्यासाठी गोठ्यामध्ये स्वच्छता राखणे, जनावरांवर ताण येणार नाही अशा प्रकारे जनावरांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या रोगाचा जनावरांना प्रादुर्भाव झाला तरी ताबडतोब जनावरांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल, यासाठी उपचार करावेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या रोगाबद्दलची सगळ्यात काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे जनावरांची प्रतिकारशक्ती झपाट्याने कमी होते. दोन ते तीन जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण करणे सोपे जाते, परंतु ५ ० ते ६० जनावरांमध्ये हा रोग पसरल्यावर नियंत्रण करणे अवघड होऊन बसते. या रोगावरचे उपचार खर्चिक असल्यामुळे सजग राहणे आवश्यक आहे.
लसीकरण हा या रोगावरचा प्रभावी उपचार आहे. परंतु यातली ग्यानबाची मेख म्हणजे आजार आल्यावरच लसीकरण करता येते. जनावरांच्या वर्षभराच्या लसीकरण वेळापत्रकात या रोगाच्या लसीकरणाचा समावेश नाही, अशी माहिती परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे पशुतज्ज्ञ डॉ. नितीन मार्कंडेय यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.