Canal Irrigation : कालवा सिंचनाचा अंत अटळ आहे का?

सिंचन प्रकल्पात आजही पाणीपातळी आणि विसर्ग यांच्या नियमनाची व प्रवाह-मापनाची व्यवस्था नाही. सिंचन प्रकल्पातील सत्य कल्पितापेक्षाही विचित्र आहे.
Canal
Canal Agrowon

जीवनाच्या अनेक क्षेत्रांत आधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology) व स्वयंचलितीकरण येऊन जमाना झाला असला, तरी राज्यातील कालवा प्रचलनाचे तंत्र (Techniques of canal circulation) मात्र जुनाट व मागासलेले राहिले.

सिंचन प्रकल्पात आजही पाणीपातळी (Water Level) आणि विसर्ग यांच्या नियमनाची व प्रवाह-मापनाची व्यवस्था नाही. सिंचन प्रकल्पातील (Irrigation Project) सत्य कल्पितापेक्षाही विचित्र आहे.

आधुनिकीकरण, व्यवस्थापन आणि समन्याय

सिंचन प्रकल्पांचे आधुनिकीकरण केले, व्यवस्थापनाकडॆ लक्ष दिले आणि समन्यायी पाणीवाटप चळवळीचा अंकुश निर्माण झाला, तर फार मोठे सामाजिक आर्थिक बदल संभवतात.

अन्यथा, सामूहिक कृतीला वाव देणाऱ्या सोप्या, स्वस्त सार्वजनिक कालवा सिंचनाचा अंत आणि वैयक्तिकतेला व खासगीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या खर्चिक व ऊर्जा-पिपासू उपसा सिंचनाची सार्वभौम राजवट अटळ आहे.

Canal
Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’चा मुख्य कालवा वाहू लागला

अभियांत्रिकीदृष्ट्या सक्षम कालवे ही पूर्वअट

धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नेण्यासाठी कालवे, शाखा कालवे, वितरिका, लघू वितरिका इत्यादींचे भले मोठे जाळे लागते. संकल्पनातील गृहीतांप्रमाणे कालव्यातून पाणी वाहण्यासाठी हे माध्यम अभियांत्रिकीदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.

नव्हे, कार्यक्षम कालवा प्रचलनाची ती एक महत्त्वाची पूर्वअट आहे. हे अभियांत्रिकी माध्यम एकविसाव्या शतकातील आधुनिक संकल्पनांना किती अनुरूप आहे, यावर पाणीवाटपातील पारदर्शकता, जबाबदेही, लोक सहभाग व समन्याय अवलंबून असतो.

कालवा प्रचलन म्हणजे काय?

पाणी वापर संस्थांना किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांना धरणातील पाणी विहित पद्धतीने वेळापत्रकानुसार देण्यासाठी कालवा व वितरण व्यवस्थेत पाण्याचा विसर्ग (Discharge) आणि पातळी (Water Level) यांचे नियमन करणे; प्रवाहमापन करणे; पाणीपाळी व हंगामनिहाय पाण्याचा हिशेब ठेवणे या प्रक्रियेला कालवा प्रचलन असे म्हणतात.

कालवा प्रचालनासाठी काय आवश्यक आहे?

कालवा प्रचालनासाठी पूढील बाबी आवश्यक असतात ः

(१) पाणी सोडणे, कमी जास्त करणे आणि बंद करणे याकरिता कालवे, शाखा कालवे, वितरिका, लघू वितरिका इत्यादींच्या मुखाशी हेड रेग्युलेटर्स (एचआर)

(२) पाणीपातळी नियमनासाठी कालवा व वितरण व्यवस्थेत क्रॉस रेग्युलेटर्स (सीआर)

(३) आवश्यकतेनुसार एचआर व सीआर खालीवर करणे

(४) पाणी मोजण्यासाठी प्रवाह मापक

(५) कालवा प्रचालन करताना पाणी केव्हा व किती सोडायचे, किती काळ सोडायचे, विसर्गात केव्हा व किती बदल करायचे वगैरे निर्णय घेण्यासाठी विविध ठिकाणी पाणी पातळी किती आहे, कोणती दारे किती उघडी आहेत आणि कोठे किती विसर्ग चालू आहे याची रियल टाइम माहिती व तिचे विश्‍लेषण.

कालवा प्रचलनात अडचणी काय आहेत?

वर्तमान व्यवस्था अक्षरश: उघड्यावर पडलेली असल्यामुळे ऊन, वारा, पाऊस, उंदीर, घुशी, खेकडे आणि पाणी चोरी करण्यासाठी कालव्यांवर विध्वंस व मोडतोड करणाऱ्या व्यक्ती यापासून तिचे संरक्षण करणे अवघड आहे.

ही व्यवस्था सब घोडे बारा टक्के पद्धतीने ठोकताळ्यांवर आधारित असल्यामुळे तिचा भर व्यवस्थापनाऐवजी प्रशासनावर जास्त आहे.

Canal
Crop Damage : कालवा फुटून झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

पाणीपातळी आणि विसर्ग यातील बदल विलंबाने का होतात?

एचआर व सीआर ही अगडबंब दारे. प्रत्यक्ष त्या दारांपाशी जाऊन मानवी हस्तक्षेपाने (manual) वर-खाली करणे हे काम दमछाक करणारे आणि वेळखाऊ आहे.

त्यामुळे दारांची हालचाल फार सावकाश होते. विशिष्ट वेळेवर पटकन ती दारे हलवता येत नाहीत. कालव्यातील पाणीपातळी आणि विसर्ग यातील बदल विलंबाने होतात.

जलगतिशास्त्राचा आदर का होत नाही?

बहुसंख्य एचआर, सीआर आणि प्रवाह मापक नादुरुस्त तरी आहेत किंवा ते जागेवर नाहीत /चोरीला गेले आहेत. काही मोठ्या प्रकल्पांतील मुख्य कालवे सोडल्यास इतरत्र सीआरची तरतूद मुळात केलेलीच नाही.

त्यामुळे विसर्ग व पाणीपातळी नियमनाअभावी जलगतिशास्त्राचा आदर करेल असे अभियांत्रिकी स्वरूपाचे कालवा प्रचलन होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

व्यक्तिवादाला उधाण का येते?

बांधकामातील त्रुटी व दोषांमुळे कालवा व वितरण व्यवस्थेची प्रत्यक्ष वहनक्षमता ही संकल्पित क्षमतेपेक्षा पहिल्यापासूनच कमी असते. देखभाल-दुरुस्तीचा अभाव आणि पाणी चोरीसाठी केलेले हस्तक्षेप यामूळे वहनव्ययात वाढ व वहनक्षमतेत उत्तरोत्तर घट होते.

परिणामी, पाणीपाळ्यांच्या कालावधीत वाढ व संख्येत घट होते. कालवा व वितरण व्यवस्थेतील व्ययामुळे लाभक्षेत्रातील विहिरींचा लाभ होतो; त्यांच्या पाणीपातळीत वाढ होते.

कालव्यावरून मिळणाऱ्या पाणीपाळ्यांच्या दरम्यान भूजलाच्या आधारे सिंचन केले जाते. कालवा व विहीर अशा दोन्ही स्रोतांतून होणाऱ्या पाणी वापराने विहीरमालकांचे कालव्यावरील आणि पाणी वापर संस्थेवरील अवलंबित्व संपते.

सामूहिकतेचा अंत होतो. व्यक्तिवादाला उधाण येते. अगोदरच कुपोषित असलेल्या ‘नकोश पाणी वापर संस्थां'ची भ्रूणहत्या होते.

आधुनिक व्यवस्था कशी असेल?

आधुनिक कालवा व वितरण व्यवस्था अनेक प्रकारच्या असू शकतात. उदाहरणार्थ, एक पर्याय पुढील स्वरूपाचा असू शकतो ः

(१) रिमोट कंट्रोल पद्धतीने विजेवर चालणारी एचआर व सीआर दारे

(२) पाणीपातळी दर्शवणारे वॉटर लेव्हल सेन्सर्स

(३) दारे किती उघडी आहेत, हे दर्शवणारे गेट पोझिशन सेन्सर्स

(४) प्रवाह मापनासाठी वॉटर मीटर्स

(५) Supervisory Control & Data Acquisition (SCADA) यंत्रणा

(६) रियल टाइम (जे घडते आहे त्याची माहिती त्याच वेळी मिळणे) स्वयंचलित यंत्रणा.

वरील पर्यायात अनेक सुधारणा करता येतात. उदाहरणार्थ, सर्व सीआर एकाच वेळी एकाच वेगाने सारख्या प्रमाणात खाली अथवा वर करणे (सायमलटेनियस गेट ऑपरेशन) किंवा सर्व सीआर एकाच वेळी परंतु वेगवेगळ्या वेगाने, वेगवेगळ्या प्रमाणात खाली अथवा वर करणे (टाइम्ड गेट ऑपरेशन). मोठ्या प्रकल्पातील मुख्य कालव्यावर अशा प्रकारचे डायनामिक रेग्युलेशनच करावे लागेल.

विशिष्ट पाणीपातळी कायम राखण्यासाठी डकबिल विअर आणि विसर्ग-नियमन व मापन एकत्रित करावे. स्वतंत्र प्रवाह मापकाची गरज भासू नये म्हणून डिस्ट्रिब्युटर अशा प्रकारचे Hydraulic पद्धतीचे स्वयंचलितीकरण लघू व मध्यम सिंचन प्रकल्पात आणि मोठ्या प्रकल्पात वितरिकांवर उपयोगी पडेल.

देखभाल-दुरुस्ती आणि शिस्तीला पर्याय नाही

कालवा व वितरण व्यवस्थेची वेळीच व पुरेशी देखभाल-दुरुस्ती होणे, HR व CR यांची दारे तसेच प्रवाह-मापनाची अचूक व्यवस्था कार्यरत असणे, वहनक्षमता, वहनव्यय, कालवा भरायला लागणारा वेळ, पाणीपातळी, आवर्तन पूर्ण व्हायला लागणारा वेळ इत्यादी घटक संकल्पनेतील गृहीतांच्या जवळपास असणे या बाबी महत्त्वाच्या असतात.

या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना कधी, किती, किती वेळ, किती वेळा पाणी मिळणार हे अवलंबून असते. हे गृहीत धरून चालत नाही. त्याची सुनिश्‍चिती करावी लागते. आधुनिक तंत्रज्ञान हा काही देखभाल-दुरुस्ती आणि शिस्तीला पर्याय नाही!

सब घोडे बारा टक्के- विविधतेमुळे तडजोड

१) कमी-जास्त जमीन धारणा, साक्षर-निरक्षर, गरीब-श्रीमंत, अनुभवी-अनुनभवी, वयोगट, सिंचन पद्धत, पाण्याचा स्रोत, भिन्न भिन्न सिंचन-वर्तणूक(irrigation behaviour).

२) शेत-जमिनीचे उतार, मातीचे प्रकार व खोली, पिकांचे वाण व पेरणीच्या तारखा, पीक-कालावधी, सिंचन गरजा, पाणी देण्याच्या पद्धती.

सत्य कल्पितापेक्षा विचित्र

१) मूळ नियोजन फक्त प्रवाही सिंचनासाठी. उपसा सिंचन आणि बिगर सिंचन यांची तरतूद नाही. त्यामुळे कालवे फार लांब व लाभक्षेत्र खूप मोठे झाले.

२) उपसा सिंचन आणि बिगर सिंचन याकरिता प्रवाही सिंचनाचे पाणी कमी केले; पण त्या प्रमाणात प्रवाही सिंचनाचे लाभक्षेत्र कमी केले नाही. कार्यक्षमतेतही वाढ नाही.

३) पाण्याचा स्रोत एक पण वापर तीन हेतूंसाठी, या रचनेमूळे जल संघर्ष वाढले.

४) कालवा व वितरण व्यवस्था अर्धवट. अनेक प्रकल्प अपूर्ण. देखभाल-दुरुस्ती दुर्लक्षित.

५) अधिकृत लाभक्षेत्र कोरडे; अनधिकृत लाभक्षेत्र हिरवेगार. कायद्याची अंमलबजावणी नाही.

६) लाभक्षेत्रात विहिरी, कोल्हापुरी पद्धतीचे / उच्च पातळी बंधाऱ्यांचे पाणी. एकाच क्षेत्राला दोन स्रोतांतून पाणी.

७) खालच्या प्रकल्पांचे पाणी वरच्या प्रकल्पांनी अडवले.

८) उसाला प्राधान्य दिल्याने इतर पिकांना पाणी मिळत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com