Catchment Area : पाणलोट क्षेत्राचे गुणधर्म तपासणे का आहे आवश्यक?

Panlot Kshetra : भूपृष्ठावरील प्रत्येक जलाशयास व प्रत्येक जल प्रवाहास त्याचे स्वतंत्र पाणलोट क्षेत्र असते. असे प्रत्येक लहान प्रवाहाचे स्वतंत्र पाणलोट क्षेत्र, एकत्र आल्यावर त्याचे मोठे एकत्रित पाणलोट क्षेत्र तयार होते.
Catchment Area
Catchment AreaAgrowon

डॉ. सचिन शिंदे,प्रवीण मताई

Water Management Update : भूपृष्ठावरील प्रत्येक जलाशयास व प्रत्येक जल प्रवाहास त्याचे स्वतंत्र पाणलोट क्षेत्र असते. असे प्रत्येक लहान प्रवाहाचे स्वतंत्र पाणलोट क्षेत्र, एकत्र आल्यावर त्याचे मोठे एकत्रित पाणलोट क्षेत्र तयार होते.

असे अनेक प्रवाह एकत्र येऊन जेव्हा ते एखाद्या नदीस मिळतात तेव्हा त्याचे नदीखोरे तयार होते.पाणलोट क्षेत्र विकासाचा अभिकल्प तयार करण्यापूर्वी त्या पाणलोट क्षेत्राचे गुणधर्म तपासणे आवश्यक आहे.

पाणलोट क्षेत्राचे वर्गीकरण :

१.अतिलहान पाणलोट क्षेत्र : १०- १०० हेक्टर पर्यंत

२. लघु पाणलोट क्षेत्र : २०० हेक्टर पर्यत

३. उप पाणलोट क्षेत्र : ४००० हेक्टर पर्यत

४. नदीखोरे : क्षेत्र मर्यादा नाही.

Catchment Area
Amravati Water Storage : अमरावती जिल्ह्यात ४४ टक्के जलसाठा

१) आकारमान :

- पाणलोट क्षेत्रातील किती पाणलोटाची व्यवस्था लावायची आहे, हे त्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात ठरते. त्याचप्रमाणे पाण्याचा निचरा करावयाचा झाल्यास त्यासाठी मोठे पाणलोट क्षेत्र सोईचे असते. परंतु पाणलोट क्षेत्र जसजसे विस्तारत जाते, तसतशी त्याच्या भूगर्भाची रचना, मातीचा प्रकार, उतार इत्यादी गुणधर्मातील भिन्नताही वाढत जाते.

२) आकार

- पाणलोट क्षेत्राच्या आकाराचा परिणाम त्याच्या निर्गम मार्गापाशी येणाऱ्या पाणलोटाच्या परिमाणावर होतो. पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाणलोटाचे प्रमाण हे त्याच्या लांबी व रुंदी यांच्या गुणोत्तराशी संबंधित असते, ते लांबीशी व्यस्त प्रमाणात तर रुंदीशी सम प्रमाणात असते.

- पाणलोट क्षेत्राची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा जास्त असेल तर निर्गम मार्गाजवळ पाणी येण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे पाणी खोळंबून राहण्यास व जमिनीत मुरण्यास वाव मिळतो. निर्गम मार्गाशी कमी प्रमाणात पाणी येते.

हीच परिस्थिती जर उलट असेल म्हणजे रुंदी लांबीपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण पाणलोट क्षेत्रातील पाणलोट निर्गम मार्गापाशी लवकर येतो. त्यामुळे ते कमी प्रमाणात अडविले जाते, जमिनीत कमी मुरविले जाते. निर्गम मार्गापाशी येणारा पाणलोट मोठा असतो, तेव्हा पाणलोट क्षेत्राचे वेगवेगळे आकार कसे असू शकतात हे पाहणे आवश्यक आहे.

३) उतार

- पाणलोट क्षेत्रातील सर्वोच्च बिंदुची उंची आणि उताराच्या दिशेने असलेली जास्तीत जास्त लांबी यावरुन त्या पाणलोट क्षेत्राचा सरासरी उतार कळतो.

सर्वात वरच्या दूरच्या बिंदुवरुन वहात येणाऱ्या पाण्याच्या थेंबास निर्गम मार्गापर्यत येण्यास लागणारा कालावधी हा त्या बिंदुचे निर्गम मार्गापासूनच्या आडवे अंतरापाशी उंचीच्या व्यस्त प्रमाणात म्हणजेच तीव्र उताराच्या पाणलोट क्षेत्राला पाणलोटास वाहून जाण्यास सपाट पाणलोट क्षेत्रापेक्षा कमी वेळ लागतो.

- पाणलोट वाहून जाण्यास जर वेळ जास्त लागला तर, पाणी जमिनीत जास्त प्रमाणात मुरते, पाणलोट कमी होतो. तेव्हा तीव्र उताराच्या पाणलोट क्षेत्राच्या निर्गम मार्गाजवळ येणारा पाणलोट हा तेवढ्याच क्षेत्रफळाच्या सपाट पाणलोट क्षेत्रातील पाणलोटापेक्षा केव्हाही जास्त असतो.

४) जमिनीवरील आच्छादन

- जमिनीवरील आच्छादन म्हणजे भूपृष्ठावरील वनस्पती, याचा परिणाम भूपृष्ठावरुन वाहणारा पाणलोट, तसेच जमिनीची धूप या दोहोंवर होतो. जर जमिनीवर सर्वत्र गवत असेल तर, त्यामुळे मातीचे कण घट्ट धरुन ठेवले जातात. जमिनीची धूप कमी प्रमाणात होते.

- जमिनीवर दाट झाडी असेल, तर जमिनीवर होणाऱ्या पावसाच्या माऱ्याची तीव्रता मध्येच अडकल्याने कमी होईल व त्यामुळे मातीचे कण कमी प्रमाणात उडून धूप कमी होईल. पण जर जमीन मशागत करून पिकाखाली आणलेली असेल, तर अशा जमिनीत मातीचे कण मोकळे असल्याने धूप मोठया प्रमाणात होईल. यावरुन कोणत्या प्रकारच्या जमिनीत कोणते उपचार करावयाचे हे ठरविता येईल.

- वनस्पतींची मुळे मातीची सच्छिद्रता वाढवितात. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरते, व भूपृष्ठीय पाणलोट कमी येतो.

५) प्रवाह घनता

- पाणलोट क्षेत्रात वाहणारे ओघळ, नाले, ओढे इत्यादी जलप्रवाह किती आहेत याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण त्यावरही पाणलोट क्षेत्रातील पाणलोटाचे प्रमाण, जमिनीची धूप तसेच पुराची समस्या अवलंबून असते.

- पाणलोटाचे विभाजन व निर्गमन दिशा त्यावरुन पाणलोटाचे व्यवस्थापन व धुपेचे नियंत्रण याचे नियोजन करणे सुलभ होते.

६) जमिनीचा उपयोग

- पाणलोट क्षेत्रातील जमिनीचा उपयोग सध्या कसा केला जात आहे याचा अभ्यास करणे व जमिनीच्या उपयोगिता क्षमतेनुसार भविष्यात तिचा उपयोग कसा करावा ? याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- जमिनीच्या होणाऱ्या उपयोगावर, त्यावर घेतली जाणारी पिके व अवलंबिण्यात येणारी लागवड पध्दत यावर त्या पाणलोट क्षेत्रातील पाणलोटाचा वापर, जलअंत:सरण व निचरा अवलंबून असतो.

- धुपेचा प्रकार व धुपेची तीव्रता देखील काही प्रमाणात यावरुन ठरत असते.

Catchment Area
Ground Water Management : भूजलाचे व्यवस्थापन आव्हानात्मक : जोशी

७) जलअंत:सरण

- जमिनीची जलधारणाशक्ती व निचराशक्ती यावर त्या जमिनीतील जलअंत:सरणाचे प्रमाण ठरते. जमिनीची जलधारणाशक्ती जर जास्त असेल तर पावसाच्या पाण्याचा बराचसा मोठा भाग ती शोषून घेईल. परंतू अशा जमिनीत पाण्याचा नैसर्गिक निचरा होत नसल्याने पाण्यामुळे त्या नापिक होण्याचा धोका असतो.

- ज्या जमिनीची निचराशक्ती जास्त असेल अशा जमिनीत जास्तीत जास्त पाणी जिरविले जाईल. भूपृष्ठावरुन वाहणारा पाणलोट कमी होईल. ज्या जमिनीची जलधारणा व निचरा अशी दोन्ही क्षमता कमी असतील अशा जमिनीवरून वाहणारा पाणलोट जास्त असेल.

८) मातीचा प्रकार

- हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यावर जमिनीची जलधारणाशक्ती, निचरा व जलअंत:सरणाचे प्रमाण अवलंबून असते. म्हणजेच पाणलोटाचे व धुपेचे प्रमाणही यावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. यासाठी मातीची रचना, पोत, रंग इत्यादी अनेक गुणधर्माचा अभ्यास करून मातीचा प्रकार ठरवावा लागतो.

- हे काम मृद सर्वेक्षण यंत्रणेमार्फत केले जाते. भारी जमिनीत धुपेचे प्रमाण जास्त असते. हलक्या जमिनीत ते कमी कमी होत जाते.

९) भूगर्भ

-भूगर्भाचे स्तर व खडक यावर मातीचा प्रकार अवलंबून असतो. म्हणून याचाही अभ्यास करणे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे दृष्टीने महत्त्वाचे आहे.

१०) मातीची खोली

- मातीची खोली देखील जमिनीची धूप, तिच्यावरून वाहणारा पाणलोट इत्यादी बाबींवर परिणाम करणारा एक घटक आहे. याचाही अभ्यास मृद सर्वेक्षणात केला जातो.

संपर्क: डॉ. सचिन शिंदे, ९४२१६१८७९०, (विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी), कृषी विज्ञान केंद्र, लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com