Healthy Lifestyle : आहार-विहार अन् आरोग्य

शरीर हे निसर्गाची किंवा परमेश्‍वराची आपल्याला मिळालेली सर्वोत्तम अशी देणगी आहे. या शरीराच्या माध्यमातूनच आपण जीवनात सर्व काही मिळवू शकतो. त्यामुळे ते निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
Healthy Lifestyle
Healthy LifestyleAgrowon

प्राचीन काळापासून निरोगी शरीराचे (Healthy Body) महत्त्व आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. वेदशास्त्र, धर्मग्रंथ, संत साहित्य, महापुरुष या सर्वांनी शरीराची काळजी घेऊन शरीर निरोगी राहण्यासाठीचे उपाय सांगितले आहेत. निरोगी शरीराच्या माध्यमातून आपण धर्माची साधना चांगल्या प्रकारे करू शकतो असा उल्लेख अनेक ठिकाणी आहे.

Healthy Lifestyle
Agriculture Technology : टरफलासह शेंगांचा ‘एक्स-रे’ देईल गुणधर्माची माहिती

शरीराचा उपयोग धनसंपत्ती कमावण्यापासून ते परमात्मा प्राप्तीपर्यंत होत असतो. त्यामुळे निरोगी शरीराचे महत्त्व सर्वांनी ओळखले पाहिजे. शरीराचा परिणाम मनावर आणि मनाचा परिणाम शरीरावर होत असतो. अनेक आजार शरीराकडून मनावर तसेच मनाकडून शरीरावर उमटत असतात. शरीर आणि मनाचा समतोल साधने अत्यंत आवश्यक आहे.

प्राचीन काळी आपल्या पूर्वजांची जीवनचर्या फार वेगळी होती. शारीरिक कष्ट जास्त होते. मात्र मानसिक ताणतणाव कमी होते. याच्या परिणाम स्वरूप शरीर निरोगी असल्याचे प्रमाण अधिक होते. आज मात्र परिस्थिती खूप बदलली आहे. आधुनिकतेच्या आणि धावपळीच्या युगात आपण आपली शरीरुपी संपत्ती व्यवस्थित संभाळत आहोत का, हा खरा प्रश्‍न स्वतःला विचारायला पाहिजे.

धनसंपत्ती, पद मिळविण्यासाठी आपल्याला मर्यादा नाहीत. मात्र शरीराला आणि आयुष्याला खूप मोठ्या मर्यादा आहेत. जोपर्यंत शरीर चालत आहे तोपर्यंत आपल्याला शरीराची किंमत कळत नाही. परंतु शरीराला छोटीशी जखम जरी झाली तरी आपल्याला शरीराची किंमत समजते. शरीरात निर्माण होणारे बहुतांश आजार हे आहार-विहार योग्य नसल्याने होत असतात.

शरीरात एखादा आजार आनुवंशिकरीत्या उद्‍भवल्यास त्या आजारानुसार आपण जीवनचर्या दिनचर्या बदलणे आवश्यक आहे. हा बदल आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करील हे नक्की! मात्र आजच्या धावपळीच्या युगात इथे कुणालाच वेळ नाही. अगदी शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून ते एखाद्या मंत्र्यापर्यंत सर्वच इथे बिझी असतात. ज्या कामासाठी धावपळ सुरू आहे तिचा उपयोग शरीर चांगले राहिले तरच घेता येईल. अन्यथा, मिळणाऱ्या यशाचा उपयोग घेण्यासाठी शरीर मात्र व्यवस्थित असणार नाही हे सत्य स्वीकारले पाहिजे.

पूर्वी डायबेटिस, रक्तदाब यावरील औषध घेणारे शोधून सापडत नव्हते. एखाद्याला जर या प्रकारचे आजार असेल तर तो माणूस सर्वांना माहीत असायचा. आज हे आजार सर्वसामान्य झाले आहे. ग्रामीण भागात थोडी परिस्थिती बरी आहे मात्र शहरी भागात २० ते २२ वर्षांच्या तरुणांना रक्तदाबाची गोळी सुरू असल्याचे दिसते.

Healthy Lifestyle
Agriculture Credit : बाजार समितीकडून शेतीमाल तारण कर्जासाठी १ कोटीची तरतूद

हे खूपच धक्कादायक आणि खेदजनक आहे. जगातील सर्वाधिक तरुणांची संख्या असलेल्या देशात तरुण जर या प्रकारे रोगग्रस्त होत असेल, तर निश्‍चित देशाच्या प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होईल यात शंका नाही. कारण देशातल्या तरुण हा देशाचा खांब आहे त्याच्याकडे खूप गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

शारीरिक आरोग्य बिघडण्याची अनेक कारणे आहेत आणि जवळपास सर्वच प्रमुख कारणे आपण बदलू शकतो. त्यासाठी फक्त आपण आपली मानसिक शक्ती वाढवण्याची गरज आहे. शरीर बिघडण्यामागे आहार आणि विहार या दोन बाबी मुख्यत्वेरीत्या काम करत असतात.

आहार आणि विहार फक्त शरीराचा नसून मनाचा देखील आहे ते आपण लक्षात घेतले पाहिजे. शरीराचा बिघडलेला आहार अनेक रोगांना आमंत्रण देतो. आजकाल बाजारात मिळणारे फास्ट फूड, बर्गर, पिझ्झा, केक इत्यादी सर्वच पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत.

Healthy Lifestyle
Agriculture Department : एसएओ’ची संधी ८१ कृषी उपसंचालकांना मिळणार

त्यातील केमिकल प्रिझर्व्हेटिव्ह शरीरावर विपरीत परिणाम करतात. हॉटेलमधील पदार्थात ग्राहकांच्या आरोग्याचे भान ठेवले जात नाही. पैसा कमाविण्यासाठी शासनाने घालून दिलेले अनेक नियम आणि निकष मोडले जातात. एखादा पदार्थ तयार करण्यासाठी त्यात वापरण्यात येणारे पदार्थ हे खाण्यायोग्य आहेत का, याची एकदा शहानिशा झाली पाहिजे. अन्नभेसळ विभागाने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा इमानदारीने तपासणी आणि धाडसत्र वापरणे आवश्यक आहे.

घरचा जेवणाचा डबा आणि घरचे जेवण हॉटेलच्या तुलनेत सर्वोत्तम असते म्हणून शक्य तिथे घरचे जेवण सोबत घेऊन जावे. बाहेर खाण्याची वेळ आल्यास फळे, सॅलड, भाजी-पोळी यास प्राधान्य द्यावे. तेलकट, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, चायनीज, बर्गर, पिझ्झा हे पदार्थ टाळावेत. याबरोबर जेवणाच्या वेळा पाळल्या गेल्या पाहिजे.

शरीराला ज्या वेळेस जेवणाची सवय आहे त्याच वेळेस शरीरात अन्न गेले पाहिजे. सरकारी आणि खासगी नोकरीच्या ठिकाणी या वेळा काटेकोर पाळल्या गेल्या पाहिजे. योग्य आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. आपल्याकडून अनेकदा शरीराच्या गरजेपेक्षा अधिक आहार घेतला जातो तो टाळणे हितावह आहे. शाळेतल्या मुलांना आणि तरुणांना घरचे पदार्थच खाण्याची सवय लावावी.

घरी पदार्थ तयार करण्यास थोडा ताण होईल मात्र मुलांचे आरोग्य चांगले राहील. घरी देखील स्वयंपाक करताना मीठ, तेल, साखर, मैदा आदी पदार्थांचा कमीत कमी वापर करणे आवश्यक आहे. हंगाम आणि वातावरणानुसार आहार पद्धती असणे आवश्यक आहे. प्रत्येक पदार्थाचे थंड आणि उष्ण गुणधर्म असतात त्याचा विचार करून ते सेवन केले पाहिजेत.

अति चहा, अति कॉफी, शीतपेयांचे अतिसेवनही टाळावे. त्याऐवजी ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, नैसर्गिक फळे खाण्याची सवय लावणे आवश्यक आहे. अतिमांसाहार तसेच मद्यपान, व्यसने टाळलेलीच सर्वोत्तम. आजची तरुणाई वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी जात असल्याने भविष्यात त्यांची कार्यक्षमता किती राहील, यात शंका वाटते.

योग्य आहाराबरोबरच योग्य विहार असणे आवश्यक आहे. विहार या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. योग्य व्यायाम, योग्य मेहनत निरोगी शरीराच्या दृष्टीने आवश्यक असणारी योग्य कसरत याचा त्यात अंतर्भाव आहे. योगासने, पायी चालणे, सायकलिंग करणे, पोहणे, एरोबिक्स यांसारख्या कसरती करायला हव्यात. अनेकदा जवळच्या प्रवासासाठी गाडीचा किंवा बाइकचा वापर केला जातो त्यापेक्षा पायी किंवा सायकलचा वापर करावा. अगदीच व्यायामाला वेळ कमी असल्यास घरातील सायकल तसेच घरातील यंत्रांचा वापर करून कमी वेळात व्यायाम करता येतो.

कपालभाती, अनुलोम-विलोम, प्राणायाम इत्यादी अनेक प्रभावी प्राणायाम क्रिया करणेही आवश्यक आहे. शरीरासाठी व्यायाम तर मनासाठी ध्यान धारणा व इतर उपायांचा जीवनात अंतर्भाव करायला हवा. अनेकांना सकाळी वेळ नसतो त्यांनी सायंकाळी व्यायाम करावा. आहार आणि विहारासोबत निद्रा हा फार महत्त्वाचा घटक आहे. शांत पुरेशी निद्रा असल्यास अनेक आजार वाढीस प्रतिबंध होतो. म्हणून मोबाईलवर वेळ वाया घालवण्यापेक्षा योग्य आणि पुरेशी झोप कशी घेता येईल याचा विचार करावा.

आपण आपल्या वाहनाला, आपल्या घराला आणि आपल्या आवडीच्या वस्तूंना खूप जपतो. मात्र सर्वांत बहुमूल्य असणाऱ्या आपल्या शरीरासाठी आपण काहीही करत नाही. आजारी पडल्यावर हॉस्पिटल किंवा दवाखाने करण्यापेक्षा आजारी पडू नये यासाठी खऱ्या अर्थाने काम झाले पाहिजे. निरोगी शरीर, निरोगी तरुण असेल तर आपला देश सुद्धा निरोगी असेल म्हणून त्यासाठी आहार-विहारावर नियंत्रण आणि निरोगी विचार असणे आवश्यक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com