Inflation : फळे-भाज्यांना महागाईचे प्रतीक समजणे चुकीचे

सरकार कोणाचे आहे आणि त्यामुळे महागाई वाढली आहे, या मुद्द्याकडेही मला जायचे नाही. मला एवढे आणि एवढेच सांगायचे आहे, की या सगळ्या घटकांमुळे ताज्या फळ-भाज्यांच्या दर वाढीशी काहीही संबंध नसतो.
Inflation
InflationAgrowon

देशात महागाई (Inflation) किती वाढली याबद्दल मी लिहीत नाही. देशाच्या महागाईचा संबंध जागतिक घडामोडींशी आहे किंवा नाही, याबद्दल इथे मी काहीही भाष्य करणार नाही. इंधनाचे दर, युक्रेन-रशिया युद्ध (Russia Ukraine War), विस्कळीत पुरवठा साखळी (Supply Chain) व या सगळ्यांमुळे महागाई वाढते आहे, यावरही मला इथे काहीच म्हणायचे नाही. सरकार कोणाचे आहे आणि त्यामुळे महागाई वाढली आहे, या मुद्द्याकडेही मला जायचे नाही. मला एवढे आणि एवढेच सांगायचे आहे, की या सगळ्या घटकांमुळे ताज्या फळ-भाज्यांच्या (Fruit Vegetable) दर वाढीशी काहीही संबंध नसतो. नाही. आणि तरीही संसदेपासून ते राजकीय आंदोलनापर्यंत, मोर्चांपासून ते माध्यमांतील बातम्या व चर्चांपर्यंत महागाईच्या निषेधात मात्र प्रतिकात्मकता म्हणून तुम्ही फळे-भाजीपाला वापरत असतात. फळे भाजीपाल्याचे फोटो, व्हिडिओ, ग्राहकांच्या याच भोवतीच्या प्रतिक्रियांनी तुमचा मजकूर, भाषणातील भाषा ठरलेली असते. हे पूर्ण चुकीचे तर आहेच आणि आकलनाच्या मर्यादा स्पष्ट करणारे देखील!

Inflation
Inflation : महागाईच्या विरोधात विरोधकांची निदर्शने

महागाई (Inflation) वाढवणारे काही ठरावीक घटक असतात आणि त्यातील काही घटक सामान्य माणसाला समजतात. ते म्हणजे कर, इंधनाचे दर (Crud Oil Rate), कच्च्या मालाचे वाढलेले दर, वाहतुकीचे दर (Transportation Rate) आदी. अमुक वस्तूवर जीएसटी (GST) लागला, इंधनाचे भाव वाढल्याने वस्तू महाग झाल्या हे आपण वारंवार ऐकतो. विशेषतः यातील बहुतांश चर्चा व्यापक प्रमाणावर होते ती किरकोळ विक्रीच्या ठिकाणी म्हणजे रिटेल स्टोअर्स किंवा विक्रीच्या पॉइंटला. त्यातही जिथे वस्तू खरेदी विक्रीच्या वेळी घासाघीस (म्हणजे आपले निगोशिएशन) होते, तिथे. तो जो कोणी विक्रेता असतो, तो वस्तू महाग का, याला वर सांगितल्याप्रमाणे कुठल्यातरी प्रकारामुळे दर वाढले असे ठोकून सांगत असतो. यामध्ये काही बाबतीत तथ्य असतेही. मात्र फळे-भाजीपाल्याबाबत यात अजिबातच तथ्य नसते. हे थोडेसे अव्यावहारिक वाटेलही. पण आपण वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करू.

Inflation
Inflation: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तरच महागाईला लागेल 'ब्रेक'

दर नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. उत्पादन खर्चाएवढाही भाव न मिळाल्याने कांद्याचे ट्रॅक्टर रस्त्यावर ओतून दिले. उलटी पट्टी येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी मार्केट यार्डातच भाजीपाला टाकून दिला. अशा अनेक बातम्या आपण विविध माध्यमांमध्ये पाहत असतो. मग अशावेळी महागाईवर परिणाम करणारे घटक कुठे जातात. अशावेळी शेतकऱ्यांना माल उत्पादन करायला काहीच खर्च आलेला नसतो का? वस्तुतः शेती उत्पादन घेताना महागाई वाढविणारे घटक शेतकऱ्यांचा करेक्ट कार्यकम करीत असतात. म्हणजे करवाढ, युद्ध, पुरवठा साखळ्या विस्कळीत होणे, इंधन दरवाढ यामुळे महाग झालेल्या कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना खरेदी कराव्याच लागतात. मात्र या खर्चानुसार तो किंमत ठरवू शकत नाही. याबद्दल सतत बोलले जाते. त्याबद्दलही आता इथे मी लिहिणार नाही.

मला मुद्दा मांडायचा आहे, तो फळे-भाजीपाला यांच्या किमतीचा संबंध असतो तो केवळ आणि केवळ मागणी-पुरवठ्याच्या स्थितीवर. ताज्या फळे आणि भाजीपाल्याची आवक किती होते यावरच हे भाव ठरतात. इथे दुसरा कुठलाही घटक म्हणजे महागाईचा वगैरे काहीही परिणाम करीत नाही. म्हणूनच वरती दिलेल्या टोमॅटो- कांदा फेकण्याचे उदाहरण दिले आहे. देशात किंवा कुठेही महागाईचे चित्र काहीही असू देत, ताज्या फळ-भाजीपाल्याचे दर किती वर-खाली होतात हे आपण वर्षानुवर्ष अनुभवतो आहोत. ग्राहक म्हणूनही आपण त्याचा अनुभव घेत असतो. ५ रुपये किलो कांदा ते ५० रुपये किलो कांदा असे चित्र आपण अनेक वेळा पाहतो. म्हणून ताज्या फळ-भाजीपाल्याला महागाईशी जोडणे व माध्यमे किंवा आंदोलनामध्ये प्रतीकात्मक म्हणून ते वापरणे चुकीचे आहे. केवळ चुकीचेच आहे असे नव्हे तर शेतकऱ्यांवर ते अन्यायकारक देखील आहे.

सारांश एकच आहे फळे-भाजीपाला व बाजारातील दर मागणी-पुरवठ्यावरच असतात. राहतील. मात्र कधीतरी शेतीमाल बाजारभाव उसळण्याचा संबंध महागाईशी लावणे अगदी प्रतीकात्मक का होईना चुकीचे आहे. महागाई वाढविणारे विविध घटक आहेत, त्यांच्यामुळे महागाई वाढते असे असंख्य उत्पादने, सेवा असतात. ते तुम्ही माध्यमांमध्ये दाखविताना, आंदोलनात प्रतीकात्मक म्हणून दाखवताना (फळे आणि भाजीपाल्याच्या ऐवजी) वापरा एवढीच शेतकऱ्यांच्या वतीने संबंधितांना विनंती असेल.

- प्रमोद राजेभोसले, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com