जेथे आर्थिक शुचिता तेथे लक्ष्मी

परवाच आपण लक्ष्मीपूजन केले. पूजन करणे म्हणजे तिला नमस्कार करणे. अशा कितीतरी देवता पुराणकथांतून आपल्याला भेटतात.
LaxmiPujan
LaxmiPujanAgrowon

संजय गोर्डे

परवाच आपण लक्ष्मीपूजन (Diwali Laxmipujan) केले. पूजन करणे म्हणजे तिला नमस्कार करणे. अशा कितीतरी देवता पुराणकथांतून आपल्याला भेटतात. त्यांची ऋषींनी केलेली सांकेतिक वर्णने ऐकून वाचून चित्रकार व शिल्पकारांनी त्यांची प्रतीकात्मक रूपे साकारली, त्यांचं स्वरूप आणि त्यामागचं लॉजिक आपण समजून घेणं गरजेचं आहे.

उत्सवांकडे बघताना दरवेळी आपला एक डोळा श्रद्धेचा, तर दुसरा डोळा विवेकाचा असला पाहिजे. आपल्या शेकडो पिढ्या गतानुगतिक होऊन हजारो वर्षांपासून या उत्सवांच्या प्रथा पाळत आल्या आहेत. दरम्यान, त्यावर जी अविवेकाची काजळी येते ती झटकली तरच माउली म्हणतात तसा ‘विवेकाचा दीप’ उजळेल.

LaxmiPujan
Crop Damage : वाशीम जिल्ह्यात खरिपाची सुधारित पैसेवारी ४७ पैसे

लक्ष्मी म्हणजे धन. ऋषी सांगतात, की लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे. विश्‍वात सर्वाधिक धनवान कोण असेल तर तो समुद्र होय. त्याच्या वैभवाचा थांग लागणे अशक्य आहे. शेतकऱ्यांच्या घरात पीक आणि त्यापासून पैसा येण्याचा मूळ स्रोत समुद्रच आहे! ज्याच्या कृपादृष्टीने आपली जमीन सुफलाम् होते तो पाऊस समुद्राच्या वाफेमुळे पडतो. त्यामुळे समुद्र हा सर्वार्थाने लक्ष्मीचा पिता आहे.

लक्ष्मी नावाची कुणी एखादी हाडामांसाची व्यक्ती नव्हे. लक्ष्मी हे संपत्तीचे शाश्‍वत व प्रतीकात्मक रूप आहे. तिचे रूप हिरण्यवर्णाम् म्हणजे सोन्यासारखे आहे. ती कमळावर विराजमान आहे. कमळ चिखलात असले तरी अनासक्ती आणि अलिप्तता हा त्याचा स्वभाव आहे. ते गुणग्राही असून दोषांचा द्वेष करणारे आहे.

लक्ष्मी या सगळ्याचा पुरस्कार करते. तिच्या तळहातातून अविरत पैशांचा वर्षाव होत असतो. म्हणजे ती प्रवाही आहे. ती हस्तिनाद प्रबोधिनिम् म्हणजे मोठ्या दिमाखात गज-गर्जनांनी तिचे स्वागत केले जाते. म्हणून आपण फटाके वाजवतो.

लक्ष्मीचे थोडक्यात स्वरूप आपण समजून घेतले तर ती उमगत जाते. लक्ष्मीला कला, साहित्य, संगीत, विविध प्रकारच्या विद्या, आणि त्या प्राप्त करण्यासाठी लागणारी प्रज्ञा व बुद्धी या सर्वांचे सान्निध्य आवडते. त्यातूनच ती वृद्धिंगत होते. गणेश ही बुद्धीची तर सरस्वती ही सृजनाची देवता मानली जाते.

म्हणून लक्ष्मीची पूजा ही श्रीगणेश आणि सरस्वतीसोबत होते. आपल्या संस्कृतीने आर्थिक शुचितेला इतर कोणत्याही स्वच्छतेहून पवित्र मानले आहे. जिथे आर्थिक व्यवहार स्वच्छ नीतिमत्तेने केले जातात तिथे लक्ष्मी नांदते. तिथेच उद्यम, सामर्थ्य, साहस, धैर्य, यश आणि कीर्ती वास करते. तेव्हा लक्ष्मीला थांबावं वाटेल असे वातावरण तयार करणं म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करणे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com