जेथे कीर्तन करावे...

महाराष्ट्र राज्य एक असं राज्य आहे की त्याचा इतिहास सांगत असताना तो केवळ राजकीय, भौगोलिक, आर्थिक, सामाजिक इतक्याच पातळ्यांवर सांगून भागत नाही.
जेथे कीर्तन करावे...
Mashagat ArticleAgrowon

अजिंक्य कुलकर्णी

महाराष्ट्र राज्य एक असं राज्य आहे की त्याचा इतिहास सांगत असताना तो केवळ राजकीय, भौगोलिक, आर्थिक, सामाजिक इतक्याच पातळ्यांवर सांगून भागत नाही. त्याला अजून एक आयाम आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदायाचा. वारकरी संप्रदायाला वगळून महाराष्ट्राचा इतिहास कोणी लिहू नये. तसा तो शक्यही नाही. इतिहासाचार्य राजवाडे यांना मात्र ही परंपरा फारशी रुचत नसे. पण न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांच्या ‘राइज ऑफ मराठा पॉवर’ या ग्रंथात मात्र वारकरी संप्रदायाची मोठ्या प्रमाणात दखल घेतली आहे. लोकांच्या मनाची मशागत वारकऱ्यांमार्फत केल्या जाणाऱ्या कीर्तनाने होत असते. कीर्तन हे समाजातील अनिष्ट प्रथांबाबत समाजाचे प्रबोधन करण्याचे एक मोठे माध्यम आहे.

कीर्तनाचेही विविध प्रकार आहेत. पण त्या तपशिलात शिरण्याची सध्या काही कारण नाही. मधल्या काळात वारकरी संप्रदायाला जोग महाराज, मामासाहेब दांडेकर यांनी मोठ्या प्रमाणात शिस्त लावण्याचे काम केले. पण आज आपल्या सभोवताली कीर्तन परंपरेची काय अवस्था आहे? ज्ञानोबा, तुकोबा, जनाबाई, एकनाथ, रामदास, मुक्ताबाई या संतांनी समाजाचे प्रबोधन करणाऱ्या कीर्तन या माध्यमाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं! कीर्तन करताना तेजस्वी शब्दांची सुधा वाहत असे. कीर्तनासाठी कुठेही कोणत्याही प्रकारच्या लाचारीचा लवलेश नसायचा त्याच्या उलट ऐकणाऱ्‍यांना कीर्तनातून खुमारी प्राप्त होत असे. वारकऱ्‍यांनाही कोणत्या योग्य ठिकाणी ‘वार’ करायचा हे माहीत असे. पण आज परिस्थिती फार बदललेली दिसते आहे.

आज कीर्तनकारांचे समाज प्रबोधनापेक्षा बिदागीकडे जास्त लक्ष असते. सर्वच कीर्तनकार असे वागतात असे मला मुळीच म्हणायचं नाही. पण तुकोबारायांनी जे सांगून ठेवले आहे ते काही केल्या डोक्यातून जात नाही. तुकोबांनी बहुमताला कधी मानले नाही. जे योग्य असेल ते परखडपणे सांगायला तुकोबांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. कीर्तनाच्या बाबतीतही तुकोबा खूप काटेकोर होते. ते म्हणतात की,

जेथे कीर्तन करावे। तेथे अन्न न सेवावे।

बुक्का लावू नये भाळा। माळ घालू नये गळा।

तट्टा-वृषभासी दाणा। तृण मागू नये जाणा।

तुका म्हणे द्रव्य घेती। देती तेही नरका जाती।

जी व्यक्ती किर्तनाची बिदागी घेते ती व्यक्ती नरकात जाण्यास पात्र आहे. जरा आठवून पहा आपल्या आजूबाजूला कोणत्या कीर्तनकाराने या अभंगावर निरूपण केलं आहे? या अभंगावर निरूपण केलेले कीर्तनकार औषधालाही सापडत नाही. काही अपवाद असतीलही. त्या अपवाद असणाऱ्यांच्या संख्येत वाढ व्हायला हवी आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com