जिवंतपणीच चार घास सुखाचे द्यावेत

एका गावात दशक्रियेला गेलो होतो. दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन चालू होतं. लोकं कावळा शिवायची वाट पाहत होते.
जिवंतपणीच चार घास सुखाचे द्यावेत
मशागत लेखAgrowon

देवा झिंजाड

एका गावात दशक्रियेला गेलो होतो. दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन चालू होतं. लोकं कावळा शिवायची वाट पाहत होते. दुसऱ्या बाजूला जी व्यक्ती वारली होती त्या व्यक्तीचे भाऊबंद ‘डोकी’ करत होते. डोकी करून झाल्यावर डोक्याला शेण चोळून अंघोळ करून पिंडाजवळ जाऊन उभे राहत होते. जमलेल्या गर्दीत अधूनमधून रडल्याचा आवाज काळीज चिरीत होता. बायामाणसे फार हळवी असतातच, पण आई किंवा बाप या जगातून निघून गेल्यावर त्या जास्त हळव्या होतात. तसं पाहिलं तर मुलीला वाटे लावण्याचा प्रसंग अन् जवळच्या व्यक्तीच्या जाण्यानंतरच त्यांना चारचौघांत रडता येतं.

कावळा घिरट्या घालत होता. प्रवचनकार परगावचा असावा. त्यांच्या बोलण्यात जी म्हातारी वारली होती तिच्याविषयी कमी अन् तिच्या पोरांविषयी जास्त कौतुक सुरू होतं. महाराज म्हणत होते, की ह्या माउलीच्या पोरांनी तिची मरेपर्यंत खूप खूप सेवा केली, दवादारू असुद्या, कपडालत्ता असुद्या काही काही कमी पडू दिलं नाही. महाराजांच्या समोर बसलेली मंडळी शांतपणे ऐकत होती. मलाही बरं वाटत होतं. पण प्रवचन ओट्यापासून लांब बसलेल्या काही माणसांच्या गप्पा वेगळ्याच सुरू होत्या. त्यातला एकजण तंबाखूला चुना लावून इडा बनवता बनवता दुसऱ्या माणसाला कुत्सितपणे म्हणत होता, की ह्यान आईला कव्हा तांब्या भरून दिला नाहयी, जशी म्हातारी आजारी पडली तशी तिला बाहेरच्या पडवीत नेऊन टाकली; आन मेली तव्हाच बाहीर काढली!

मी हे सगळं ऐकून हादरूनच गेलो. त्यांना विचारलं मग समोर चाललेला कौतुक सोहळा काय भानगड आहे बुवा? तो माणूस म्हणाला, ‘बुवाला काय माहितीय बिचाऱ्याला, त्यो आपुन्या बोलावला म्हणून आलाय.’

बुवाचं काहीच चुकत नव्हतं. त्यांना हे माहिती नव्हतं, की जी म्हातारी वारली होती तिला बिचारीला शेवटी अन्न अन्न करून मरावं लागलं होतं. कावळा शिवेना म्हणून म्हातारीची आवडती जिलेबी पिंडाजवळ आणून ठेवली. थोडी मिषारीही ठेवली, पण कावळा शिवला नाहीच. सगळी लोकं उठली अन् जेवणाच्या पंगती पडल्या. जेवायला जिलेबी, भात, वरण, पुऱ्या, शाकभाजी केली होती. त्या गेलेल्या म्हातारीच्या पोरांच्या म्हणण्यानुसार ‘दशक्रियेचं जेवण जोरदार झालं पाहिजे. भाऊबंद नुसते टकामका पाहत राह्यले पाहिजेत...’

पण मी म्हणतो मेल्यानंतर एवढा पुळका आणून पंचपक्वान्न बनवून गावजेवण घालण्यापेक्षा, अन् स्वतःचा मोठेपणा दाखवण्यापेक्षा जिवंतपणीच आईला चार घास सुखाचे दिले असते, तर किती बरं झालं असतं. मेल्यावर फोटोपुढं सोन्याच्या ताटात जेवण वाढून काय फायदा?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com