Cotton Production : कापूस उत्पादन अंदाजाचे गौडबंगाल

‘सीएआय'ने यंदा सलग तिसऱ्यांदा कापूस उत्पादनाचा अंदाज घटवला आहे.‘सीएआय'चा अंदाज गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही फसला. त्यामुळे ‘सीएआय'च्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसेच वस्त्रोद्योग आणि प्रक्रिया उद्योगाचं पितळ उघडं पडलं आहे.
Cotton production
Cotton productionagrowon

Cotton Production News कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) (Cotton Association Of India) नुकताच कापूस उत्पादनाचा (Cotton Production) ताजा अंदाज जाहीर केला. जानेवारी महिन्यासाठीचा हा अंदाज आहे. त्यात आधीच्या अंदाजापेक्षा कापूस उत्पादनात ९ लाख गाठींची (Cotton Bales) कपात करण्यात आली आहे.

‘सीएआय'ने यंदा सलग तिसऱ्यांदा कापूस उत्पादनाचा अंदाज घटवला आहे. ‘सीएआय'चा अंदाज गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही फसला. त्यामुळे सीएआयच्या भूमिकेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झालं आहे. तसेच वस्त्रोद्योग आणि प्रक्रिया उद्योगाचं पितळ उघडे पडले आहे.

उत्पादन कपातीचा सिलसिला

यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ‘सीएआय'ने ३७५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ३४४ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज देण्यात आला. गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन १२ टक्के अधिक राहील, कापूस लागवडीत १० टक्के वाढ झालेली असून, पिकाची उत्पादकताही चांगली आहे, असे त्यावेळी ‘सीएआय’चे अध्यक्ष अतुल गणात्रा म्हणाले होते.

शेतकऱ्यांनी त्या वेळीही ‘सीएआय'च्या अंदाजाबद्दल संताप व्यक्त केला होता. देशात पाऊस, रोगराई, गुलाबी बोंड अळी यामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे; मग सीएआय उत्पादनवाढीचा अंदाज कसा काय जाहीर करतंय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला होता.

‘सीएआय'ने त्यानंतर डिसेंबरमध्ये अंदाज जाहीर केला. त्यात कापूस उत्पादनात कपात करून ते ३३०.५ लाख टन दाखविण्यात आले. त्यानंतर आता ३२१.५ लाख टन उत्पादनाचा ताजा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Cotton production
Cotton Procurement : कापूस महासंघाचा कापूस खरेदीचा प्रस्ताव फेटाळला

‘सीएआय'चा कापूस अंदाज (२०२२-२३)

महिना ......... उत्पादन (लाख गाठींमध्ये)

सप्टेंबर २२ .........३७५

ऑक्टोबर २२....... ३४४

डिसेंबर २२..........३३०.५

जानेवारी २३.........३२१.५

दूध का दूध...

वस्त्रोद्योग आणि कापूस प्रक्रिया उद्योगाकडून गेल्या काही महिन्यांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खलनायकाच्या भूमिकेत रंगवलं जात होतं. ‘सीएआय'ने कापूस निर्यात घटल्याचं खापर शेतकऱ्यांवर फोडलं होतं.

बाजारात किफायतशीर दरात कापूस उपलब्ध होत नसल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातून ओरड सुरू झाली होती.

जागतिक बाजाराच्या तुलनेत देशात कापूस महाग आहे, सध्या केवळ ५० टक्के क्षमतेने उद्योग चालू आहेत, अशी कैफियत सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून मांडली होती.

Cotton production
Cotton Market: कापूस उत्पादनात घट, निर्यातीमुळे बाजाराला आधार

गणात्रा यांनी या परिस्थितीसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोषी धरलं होतं. शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने माल रोखून धरलाय, त्यामुळे बाजारात आवक घटल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवरील ११ टक्के शुल्क रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

पण ‘सीएआय'च्या ताज्या अंदाजामुळे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ झालं आहे. केवळ शेतकऱ्यांनी माल रोखल्यामुळे नव्हे तर मुळात यंदा उत्पादनच कमी असल्यामुळे कापसाचा पुरवठा रोडावला, ही वस्तुस्थिती ‘सीएआय’च्या अंदाजामुळे उघड झाली.

खरं तर यंदा शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामानाचा मोठा फटका बसला. त्यामुळे जो माल हाताशी येईल, त्याला चांगला दर मिळाला तरच त्यांचं नुकसान कमी होऊ शकतं.

गेल्या वर्षी उद्योग क्षेत्राने कापूस उत्पादन अधिक राहणार असल्याच्या पुड्या बाजारात सोडल्या. ‘सीएआय’ने सुरुवातीला कापसाचे उत्पादन ३६० लाख गाठी राहील, असं सांगितलं होतं. नंतर त्यात कपात करून ३३५ लाख गाठी केलं. त्यानंतर वेळोवेळी अंदाज बदलत गेले. आधी ३२५ लाख, नंतर ३१५ आणि शेवटी ३०७ लाख गाठी कापूस उत्पादन झाल्याचं सीएआयने सांगितलं.

उद्योगाची चलाखी

उद्योग क्षेत्राकडून हंगामाच्या सुरुवातीला कापूस उत्पादनाच्या बाबतीत गुलाबी चित्र रंगवलं जातं. कापसाचं प्रचंड उत्पादन होणार असून, त्यामुळे भाव पडतील अशी आवई उठवली जाते. शेतकऱ्यांनी घाबरून कमी किमतीत कापूस विकावा, हा त्यामागचा हेतू असतो.

गेल्या वर्षी नेमकं असंच झालं. उद्योग क्षेत्राने लॉबिंग आणि अफवांचे हत्यार वापरून बाजारभाव पाडण्याचा प्रयत्न केला. अनेक शेतकऱ्यांनी घाबरून कापूस सात ते आठ हजार क्विंटल रुपये दराने विकून टाकला.

पुढे मात्र कापसाचे दर १० ते १५ हजारांवर गेले. हा अनुभव लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी यंदा अपेक्षित दर मिळाल्याशिवाय कापूस विकायचा नाही, असं ठरवलं. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात आवक कमी राहिली.

Cotton production
Cotton Market : वायदे बाजारात कापूस दर नरमले !

‘सीएआय'ची विश्‍वासार्हता पणाला

या सगळ्यात ‘सीएआय’चा कापूस उत्पादनाचा अंदाज हा मुद्दा कळीचा ठरतो. एखाद्या पिकाच्या उत्पादनाच्या अंदाजात बदल करणे, यात काही गैर नाही. अमेरिकी कृषी खाते म्हणजे यूएसडीए, केंद्र सरकार आणि विविध संस्था वेळोवेळी जे अंदाज जाहीर करतात; त्यात बऱ्याच वेळा आधीच्या अंदाजात कपात किंवा वाढ केलेली असते.

त्यामुळे ‘सीएआय’ने गैरहेतूने कापूस उत्पादनात कपात केली, असा सरसकट आरोप करण्यात अर्थ नाही. परंतु सलग दुसऱ्या वर्षी ‘सीएआय'चा अंदाज फसला आणि व्यापाऱ्यांनी व उद्योग क्षेत्राने ‘सीएआय'च्या सुरुवातीच्या अंदाजांचा फायदा उठवत शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ‘सीएआय’बद्दल शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

अर्थात ‘सीएआय’ही स्वतःच्या विश्‍वासार्हतेची काळजी असल्यामुळे ही संस्था कापूस उत्पादनाच्या अंदाजात जास्तीत जास्त अचूकता आणण्याचा प्रयत्न करेल, अशी आशा करायला हरकरत नाही, असे या क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितलं.

शिल्लक कापूस किती?

यातला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता शेतकऱ्यांकडे किती कापूस शिल्लक आहे? ‘सीएआय’ने जाहीर केलेल्या अंदाजानुसार ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत ११५.७० लाख गाठी कापसाची आवक झालेली आहे.

‘सीएआय’ने कापूस उत्पादन ३२१.५० लाख गाठी दाखवलं आहे. याचा अर्थ अजून २०५.८ लाख गाठी कापूस बाजारात येणं बाकी आहे. थोडक्यात, आतापर्यंत केवळ ३६ टक्के कापूस बाजारात आला आहे, अजून ६४ टक्के कापूस आवक बाकी आहे.

यातला सगळाच कापूस शेतकऱ्यांकडे आहे, असं मानणं योग्य ठरणार नाही, असे अभ्यासकांनी सांगितले. त्यांच्या मते बराचसा कापूस दलालांकडे आहे. परंतु नेमकं प्रमाण आताच सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.

Cotton production
Cotton Market : कापूस बाजारभाव टिकून; वायद्यांमध्ये मात्र नरमाई

ज्या शेतकऱ्यांनी कापूस शिल्लक ठेवला आहे, त्यांनी आता हुशारीने निर्णय घेतला पाहिजे. कापूस उत्पादन कमी राहणार, हे आता स्पष्ट झालं आहे. सीएआयच्या पुढच्या अंदाजात कापूस उत्पादनात आणखी कपात झाली तरी आश्‍चर्य वाटणार नाही.

दुसऱ्या बाजूला मागणी स्थिर आहे. निर्यातही आधीच्या अंदाजाइतकी राहील, असं सीएआय म्हणतंय. तसेच वस्त्रोद्योगाची स्थितीही सुधारत आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढण्यासाठी स्थिती अनुकूल आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारावर नजर ठेवून कापसाचे दर वाढल्यानंतर कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांनी साडेआठ हजार ते साडेनऊ हजार रुपये क्विंटल ही किंमतपातळी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने माल विकावा, असा जाणकारांचा सल्ला आहे.

‘सीएआय'च्या अंदाजातील ठळक मुद्दे ः

कापूस उत्पादन अंदाजात ९ लाख गाठींनी घट.

सलग तिसऱ्यांदा उत्पादन अंदाजात कपात.

कापूस उत्पादनातील सर्वाधिक कपात महाराष्ट्रात.

कापूस मागणी ३०० लाख गाठींवर स्थिर.

कापूस निर्यात ३० लाख गाठी होण्याचा अंदाज कायम.

आतापर्यंत बाजारात केवळ ३६ टक्के कापसाची आवक.

गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन जास्त

‘सीएआय’च्या ताज्या अंदाजात कापूस उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा घटलेले असले, तरी गेल्या वर्षीच्या (२०२१-२२) तुलनेत मात्र ते १४.४ लाख गाठींनी जास्त दिसत आहे. गेल्या वर्षी देशात सुमारे ३०७ लाख टन कापूस उत्पादन झाले होते.

तसेच मागणी आधीच्या अंदाजाइतकीच म्हणजे ३०० लाख गाठी दाखवली असली तरी ती गेल्या वर्षीच्या मागणीच्या तुलनेत १८ लाख गाठींनी कमी आहे. त्याच प्रमाणे निर्यातीचा अंदाज ३० लाख गाठी कायम ठेवण्यात आला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ती १३ लाख गाठींनी कमी आहे.

(लेखक ॲग्रोवन डिजिटलचे कन्टेन्ट चीफ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com