Chichora-dara village : न्याय मागून मिळत नसतो तो झगडून कमवावा लागतो

जिथे झाडेच नाहीत त्याठिकाणची जमीन कसणुकीसाठी मिळाली पाहिजे ही मागणी त्यातूनच पुढे आली. त्यासाठी सत्याग्रह संघटित केले गेले.
Chichora-dara village
Chichora-dara villageAgrowon

कुमार शिराळकर

Rural Story : चिंचोरा-दरा हे सातपुड्याच्या (Satpuda) पायथ्याशी असणारे गाव. गावात राहणारी सर्व कुटुंबे भिल्लांची. इतर जाती, जमातीचे कोणी ही नाही. गावपातळीवरील मुख्य स्थानिक उद्योग शेती. परंतु स्वत:ची खासगी महसुली जमीन असणारी शेतकरी कुटुंबे मोजकी.

शेतात मका (Maize), माणी ज्वारी (Jowar), तूर (Tur), उडीद (Urad), मूग (mung), चवळी, अंबाडी, अशी पिके घेतली जात. घराच्या चौफर वाड्या करून तिथेही पिके व वेलभाज्या-फळभाज्या होत असत. बहुसंख्य कुटुंबे भूमिहीन. गावालगतच असणाऱ्या खडकांना फोडून (खडी सेंटर म्हणा) मिळणा-या मजुरीत पोट भरणे हाच त्यांचा मुख्य जीवनाधार.

१९७२-७३ च्या दुष्काळात बांधकाम खात्याने (B & C) काढलेल्या रोजगार हमीच्या कामावर. काही वेळा शहादा व नंदुरबार तालुक्यातील बागायती गावात मालदारांच्या शेतीतील कामावर. परिसरातील वनक्षेत्रात त्यावेळी ब-यापैकी वृक्ष, वनस्पती, कंदमुळे, भाज्या, फळे मिळायची. सरपण, चारा, मिळे.

त्यामुळे जंगली खाद्य पदार्थ गोळा करून खाणे शक्य असे. झाडे तोडून मोळ्या बनवून किंवा त्यांच्या दांड्या-आडे दूरदूरच्या मोठ्या गावांत/शहरात डोक्यावरून वाहून चालत जाऊन विकणे उपजीविकेसाठी केले जात होते. तेंदुपत्ती गोळा करून ती ठेकेदारांना विकण्याचे कामही सिझनपुरते मिळत होते.

गावात सवर्ण मालदार नसल्यामुळे प्रकाशा सारख्या गावात जी उच्च वर्गजातीय दहशत होती ती इथे नव्हती. मात्र फॉरेस्ट गार्ड, रेंजर यांची भीषण दहशत होती. शोषण आणि छळ यांचा कमालीचा दबदबा होता. स्त्रिया-मुलींवर शारीरिक जुलुम केले जात.

पोलीस व एसआरपी फॉरेस्टवाल्यांच्या मदतीला हजर रहात. पकडून अटक करणे बेड्या घालून मिरवत कोर्टापुढे उभे करून तुरुंगात पाठवणे सर्रास चाले. इतकेच नव्हे तर इंग्रज राजवटीपासून स्वातंत्र्योत्तर काळातही भिल्ल जमात गुन्हेगार मानली गेली.

भिल्ल तरुणांपैकी काही जणांना कायमचे गुन्हेगार म्हणून पोलिस कस्टडीत ठेवले जाई. न्यायासाठी लढा म्हणजे तेव्हा फॉरेस्ट पोलिसांच्या दहशतीविरुद्धचा संघर्ष होता. वनक्षेत्रातील संसाधनांचा पूर्वापार असलेला पण ब्रिटीशांनी हिसकावून घेतलेला अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्याचा लढा होता.

Chichora-dara village
Indian Agriculture : शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या पंगतीसाठी गावोगावच्या भाकरी

जिथे झाडेच नाहीत त्याठिकाणची जमीन कसणुकीसाठी मिळाली पाहिजे ही मागणी त्यातूनच पुढे आली. त्यासाठी सत्याग्रह संघटित केले गेले. कोरडवाहू जमिनींना पाणी पुरवठा करण्यासाठी जवळच्या वाकी नदीवर धरण बांधले पाहिजे या मागणीवर सातत्याने दीर्घकाळ यशस्वी आंदोलन करण्यात आले.

दरा धरण बांधले गेले. बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी ठेकेदारामार्फत खडी फोडण्याचे काम दिले होते. पण त्याची मजुरी मात्र दिली नव्हती. फुकट काम करून उपाशी मारण्याच्या या भ्रष्ट कारभाराविरोधात जंगी आंदोलन या गावातील लोकांनी केले.

या आंदोलनाला भावकीच्या नात्याने तीन तालुक्यातील खूप गावांनी सहकार्य केले. प्रथम बांधकाम खात्याच्या तालुक्याच्या ठिकाणच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला. मग धुळ्याच्या बांधकाम खात्याच्या कार्यालयात घुसून भिल्ल तरुणींनी कार्यकारी अभियंता, डी. ए. पी. यांना घेराव घातला.

मागच्या दाराने त्यांनी पोबारा केला. धुळ्यातील कामगार संघटना, हमालमापाडी, डावे पक्ष यांनी मोठे सहकार्य केले. त्यामुळे लढा यशस्वी होऊन सर्व मजुरी मिळाली. पण मुख्य यश आदिवासी महिला व पुरुषांची हिम्मत वाढण्यात झाली. शोषण-छळाच्या विरुद्ध न्यायासाठी चळवळ कशी करायची असते याचे शिक्षण मिळाले.

आजची स्थिती:

चिंचोरा गावातली लोकसंख्या ११०० च्या आसपास आहे. गावात २१४ कुटुंबे आहेत. महसूली जमीन असणारी कुटुंबे २० टक्के तर भूमिहीन ८० टक्के आहेत. शेतीतील पिके हायब्रीड मका, हायब्रीड ज्वारी, हायब्रीड कापूस, सोयाबिन आहे. तूर, चवळी थोडीच घेतली जाते. गेल्या तीन वर्षापासून दोन चार जण ऊस घेऊ लागलेत.

रासायनिक खतांचा वापर केला जाऊ लागला आहे. एकही बोअर वेल नव्हती आता पाच झाल्यात. पिण्याच्या पाण्यासाठी एका बोअर वेलचा उपयोग होतो. चार हॅंड पंप आहेत. वीज पोचली आहे. पण बेभरवशी आहे.

अलिकडे गावात रात्री लाईट असतात. दरा धरणाचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाल्याचे सिंचन खात्याकडून लेखी दिले गेले. परंतु हे पाणी उपयोगात आणण्याकरिता वाकी नदीत धरणाच्या खाली दुसरी भिंत बांधून कालवे खोदणे हे काम बंद पडले. ठेकेदार पळून गेला. धरणात खूप गाळ साचला आहे.

गावात रोजगार नसल्याने कुटुंबेच्या कुटुंबे स्थलांतर करतात. जळगाव-अमळनेर-धुळे-नंदुरबार असे खडी सेंटर्सवर खडी फोडण्यासाठी जातात. ऊस तोडीसाठी महाराष्ट्र, गुजरात राज्यात जातात. शेतातील शेंगा, कापूस, मिरची यांची कामे करण्यासाठी सौराष्ट्र, कच्छ कडे जातात.

Chichora-dara village
Indian Agriculture : शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या पंगतीसाठी गावोगावच्या भाकरी

या बदललेल्या नव्या परिस्थितीत रोहयोची कामे निघावीत या मागणीवर आंदोलन झाले. अभियंते व ठेकेदार यांनी संगनमताने कामे काढली. पण महिनोन् महिने पूर्ण वेतन दिले गेले नाही. संघटित लढा करून वेतन मिळवावे लागले.

बदललेल्या परिस्थितीचा गंभीर विचार करून चळवळीविषयी गावातील लोकांच्या सम्मतीने काही निर्णय घ्यायला हवेत असे कार्यकर्त्यांनी ठरविले. सगळा गाव एकत्र बसला. सविस्तर चर्चा, वादविवाद होऊन महत्वाच्या तातडीने करावयाच्या गोष्टी एकजुटीने करण्याचे ठरले.

तहसील व जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून धरणे धरून बसायचे आणि या मागण्यांची तड लावायची -

* चिंचोरा गावाला स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा मिळाला पाहिजे.

* चिंचोरा गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हायला पाहिजे.

* वनाधिकार कायद्यानुसार गावसमुहाला सामुहिक वनाधिकाराचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे.

* दरा धरणाखाली ज्यांच्या जमिनी बुडाल्या त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळाले पाहिजे.

* रोहयोची कामे सातत्याने वेळेवर वेतन देऊन पुरवली पाहिजेत.

* पेसा कायद्यानुसार चिंचोरा गावाची स्वतंत्र ग्रामसभा भरवून त्या सभेने निव़जडलेल्या वनव्यवस्थापन समितीला लोकसहभागाने आणि शासकीय जलयुक्त शिवार योजनेतून जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पुरेसा निधी मिळाला पाहिजे.

ठरल्याप्रमाणे एकूण पाच वेळा तहसील, प्रांत व जिल्हाकचेरीवर मोर्चे-निदर्शने करण्यात आली. अधिका-यांशी चर्चा करून यापैकी काही मागण्या धसास लावण्यात आल्या. पैकी चिंचोरा गावाला स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा मिळून त्याची नोंद सरकारी गॅझेट मध्ये करण्यात आली.

चिंचोरा गावातील आदिवासी समुहाला १३८.८४ हेक्टर वनक्षेत्रावरील सामुहिक वन संसाधांचा आणि त्याचे संवर्धन करण्याचे हक्कपत्र मिळाले. परंतु स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी ग्रामसेवकानी केलेल्या विलंबामुळे पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे.

तसेच रोहयोची कामे काढली जातील आणि ग्रामसभेने केलेल्या ठरावानुसार निधी दिला जाईल अशी आश्वासने अधिका-यांनी गावात येऊन सभा घेऊन दिल्यानंतर सुद्धा या मागण्यांची पूर्तता अजून झालेली नाही.

त्यामुळे स्थलांतर कमी करून गावातच उपजीविकेची साधने निर्माण करण्याच्या उद्दिष्टाला पुरे करणे अवघड जात आहे.

तथापि या आंदोलनात भाग घेतल्यामुळे महिला, युवक-युवती, प्रौढ सर्वांनाच आंदोलनातून आजही काही गोष्टी पदरात पाडून घेता येतात असा आत्मविश्वास आला. उपजीविकेची स्थानिक साधने आपणच संवर्धित करायला हवीत आणि पुढच्या पिढ्यांसाठी जैवविविधतेचा पाया मजबूत करून तिचा पसारा वाढवायला हवा अशी स्पष्ट जाणीव तयार होत आहे.

आदिवासी समुहात होती ती (आजही बरीच शिल्लक असलेली) सहकारी सामुहिक सहजीवनाची संस्कृती टिकवून ठेवण्याची प्रेरणा मिळत आहे.

आदिवासी जनजीवनावर नागरी संस्कृतीने, रूढीधर्मांनी केलेले आघात आणि साम्राज्यवादी जागतिकीकरणाचे होणारे प्रहार याच्याशी एकेकट्या गावाने झुंज देणे कठिण असले तरी, नव्या टवटवित वैज्ञानिक दृष्टीने त्याचा मुकाबला करण्याची शक्ती, आपण करत आहोत त्यामधून मिळेलच, असा विश्वास वाटु लागला आहे.

न्याय मागून मिळत नसतो तो झगडून कमवावा लागतो, त्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात हे १९७०-८० सालांच्या चळवळीतून मागील पिढ्यांना उमगले होते. आता नव्या पिढीला त्याची जाणीव वेगळ्या आशय-रूपातून होणे गरजेचे आहे. चिंचोरा गावातील उपक्रम तशी जाणीव निर्माण करण्याचा एक अतिशय छोटासा प्रयोग आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com