काळाचा जरासा घास

भेटी राहून जातात, माणसं निघून जातात, मग पश्‍चात्तापाच्या टोचण्या काळीज कुरतडत राहतात. माणसं असतात तोवर कुठल्याशा धुंदीने अंध होतात डोळे.
काळाचा जरासा घास
मशागत लेख Agrowon

जयश्री वाघ

भेटी राहून जातात, माणसं निघून जातात, मग पश्‍चात्तापाच्या टोचण्या काळीज कुरतडत राहतात. माणसं असतात तोवर कुठल्याशा धुंदीने अंध होतात डोळे. मग खाडकन उघडतात ते फक्त अश्रूपातासाठीच. किती गृहीत धरतो आपण माणसांना आणि काळालाही. आयुष्याच्या क्षणभंगुरतेचा असा बऱ्याचदा विसर पडतो आपल्याला. गेलेल्या माणसाबद्दलच्या शोकाचं प्रमाण त्याच्या उपयुक्तता मूल्याएवढं असतं, हे जरी वास्तव असलं तरीही, राहून गेलेल्या भेटी, राहून गेलेले संवाद, राहून गेलेला सहवास, अशा राहून राहून गेलेल्या अनेक गोष्टी आठवत राहतात. नि मग पश्‍चात्तापाच्या भावनेने अश्रूंचे उमाळे दाटत राहतात.

माणसं एकदा फोटोआड बंदिस्त झाली की पुन्हा कधीच दिसणार नसतात. आठवांचे काहूर उठते. ही अस्वस्थता जिवाला खात सुटते. संवाद, सहवास, भेटी हे नात्यांतलं वंगण असतं, अन्यथा ती कुरकुरतात आणि शेवटी अपराधीभाव देतात. जन्म-मृत्यूची दोरी आपल्या हातात नसली तरी कसे जगायचे, कसे वागायचे हे आपल्या हातात असते. कोण कुठल्या संघर्षातून मनोवस्थेतून जात असेल आपल्याला माहीत नसते. म्हणूनच कुणीही आपल्या अस्तित्वाने, वाणीने दुखवले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सहेतुक मौनही दुःखदायक असते. अशावेळी संवादाचे पूल बांधायला हवेत. आपुलकीचे, काळजीचे दोन शब्द हिरवळीचा सुखद गारवा देतात. तो देत राहता यावा.

‘सातवा आसमान’ चित्रपटात एक गाणं आहे.

व्हेअर इज द टाइम टू हेट, व्हेन देअर इज अ लिटील टाइम टू लव्ह.

कोरोनाच्या महामारीत तर आपण हे अनुभवलंय. जगण्याची लढाई असेल किंवा आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलणारे दिवस, माणूस आपल्यातच गर्क असतो. सभोवतालच्या अनेक गोष्टींचा त्याला विसर पडतो. ध्येयाच्या पाठीमागे धावताना वाटेतले अनेक हिरवे, सुगंधी, रंगीबेरंगी कोपरे सहज दुर्लक्षित होतात. छोट्या छोट्या गोष्टींतल्या मोठ्या आनंदाला पारखा होतो. नात्यांची गुंतावळ तयार होते. पण तरीही त्वचेआडचं एकटेपण सरत नाही, ते अबाधित राहतं अनंताचा प्रवास सुरू होईपर्यंत. हा जन्म म्हणजे त्या प्रवासात लागलेलं एक ठिकाण. इथे रेंगाळू नये म्हटलं तरीही पायगुंता होतोच. मग सगळे धागे एकदम तुटल्यावर वेदना तर होतातच.

शोक, आनंद या गोष्टी मानण्यावर असतात तरीही ते मानणं इतकं सोपं कुठे असतं. मनाच्या अश्‍नाचे लगाम कधीच सुटलेले असतात. सहजपणे स्वीकारता येत नाही आपल्या माणसाचं जाण, आयुष्य अल्प असो वा भव्य, दीर्घ पण काळाच्या अजस्र कराल दाढेत तो जरासा घासच ठरतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com