School Bag : गरिबीसोबत आपल्या दप्तरांची गोष्टही पार इतिहासजमा झाली!

बाराशे म्हणजे काहीच नाही. अडीच तीन हजाराला याच्यापेक्षा चांगलं टिकाऊ दप्तर मिळेल. तो पुढे अजून काहीबाही सांगत होता. ते ऐकता ऐकता मला माझं दप्तर आठवलं.
School bag
School bagAgrowon

माझ्या मुलाला शाळेसाठी दप्तर घ्यायला गेले होते. बराचवेळ शोधल्यावर त्याला एक दप्तर (School bag) आवडलं. ते बाराशे रूपयांना होतं. महाग वाटलं म्हणून मी मुलाकडं (Son) बघीतलं. मला काय म्हणायचंय ते त्याला बरोबर समजलं. तो म्हणाला, तुला हे महाग वाटतंय पण ब्रँडेड आहे.

बाराशे म्हणजे काहीच नाही. अडीच तीन हजाराला याच्यापेक्षा चांगलं टिकाऊ दप्तर मिळेल. तो पुढे अजून काहीबाही सांगत होता. ते ऐकता ऐकता मला माझं दप्तर आठवलं.

शेतात पेरणीसाठी दुकानातनं बी (Seed Bag) आणलं की रिकाम्या झालेल्या त्या पिशव्यांवर आम्ही टपून असायचो. त्या पिशव्या धुवून आम्ही दप्तर म्हणून वापरायचो. आखूड बंदाच्या, हिरव्या पिवळ्या रंगाच्या त्या लांबलचक पिशव्या असायच्या.

आम्ही लहान असल्याने हातात घेऊन चालताना त्या खाली खरडायच्या. मग काखोटीला मारव्या लागायच्या.

त्या पिशव्यांवर ज्वारी किंवा बाजरीची टपोऱ्या दाण्यांची कणसं, भूईमुगाच्या मोठाल्या आणि भरपूर शेंगांचे टगळे, अर्धी सोललेली चकचकीत दाण्यांची मकंची कणसं, वा-यावर डोलणा-या गव्हाच्या ओंब्या असे सुंदर फोटो असायचे.

दुसऱ्या बाजूला बियाणे कंपनीचं नाव, पत्ता असायचा. अशा पिशवीत पाटी,वह्या, पुस्तकं टाकली की झालं दप्तर. घरातल्या कुणाच्या तरी चष्म्याचं रिकामं पाकीट किंवा सोनाराच्या दुकानातनं काहीतरी किडूकमिडूक आणताना त्याबरोबर आलेलं पाकिट मिळालं की झालं कंपास.

ब-याच मुलांची दप्तरं, कंपास अशीच असायची. त्यामुळं यंदा यांच्याकडे ज्वारी महिकोची पेरली का गहू पेरला तेपण कळायचं. घरचं गावरान बी मोडीत निघण्याचा आणि संकरीत बियाण्यांनी हळूहळू मूळं पसरण्याचा तो काळ होता.

नोकरदारांच्या लेकरांची दप्तरं मात्र वेगळी असायची. म्हणजे कोणत्यातरी स्टेशनरी दुकानाचं नाव वगैरे छापलेलं किंवा खास शाळेसाठी म्हणून विकायला असलेलं दोनतीन कप्प्यांचं दप्तर असलेली पोरं आम्हाला भारी वाटायची.

ती स्वच्छ, नीटनीटकी दप्तरं आम्हाला आवडायची पण तशा दप्तरांसाठी आम्ही कधी हट्ट करत नसायचो. कारण एकतर तसं दप्तर मिळणार नाही याची पक्की खात्रीच असायची आणि दुसरं म्हणजे त्या नादानं शाळाच बंद व्हायची !

मग कशाला त्या फंदात पडा ? शाळेतली काही मुलं तर अतिशय गरीब होती. त्यांची दप्तरं फारच फाटकीतुटकी असायची. त्यांना डबेही नसायचे. फडक्यात चटणी भाकरी बांधलेली असायची. त्यांचे वाईट वाटायचे पण आम्हालाही इलाज नव्हता.

काहींची दप्तरं म्हणजे रंगीत वायरच्या पिशव्या असायच्या. काही दिवसांतच त्याच्या बंदाची वायर तुटून सुटी सुटी झालेली दिसायची. मग पोरं वर्गात बसल्या बसल्या त्या वायरी ओढून काढून एखाद्याच्या कानात घालायची आणि ते अचानक ओरडलं की मग फीदीफीदी दात काढायचे किंवा स्वतःच्या नाकात वायर घालून उगीच शिंकत बसायचं.

वर्गात पुढे शिकवणं चाललेलं असलं तरी मागे असले काही ना काही उद्योग सुरूच असायचे.

School bag
Education System : इंग्रजी शाळा शिकून घोटाळा...

काहींची दप्तरं तर कमाल सुंदर असायची. पांढऱ्या कापडावर रंगीबेरंगी लोकरीच्या दो-यांनी नक्षी विणलेली असायची. त्या पिशवीच्या तिन्ही बाजूंनी लाल रिबीनीची झालर लावल्याने ते अधिकच आकर्षक दिसायचं.

एकदा आईला मी म्हणाले की, शाळेसाठी मला एक छानपैकी पिशवी विणून दे. तर म्हणाली, साध्या पिशवीत रूततंय काय पुस्तकांला ? का उड्या मारून वह्या बाहेर पळतेत ? यावर काय बोलणार.

आईच ती ! आधीच घरादारातल्या, रानातल्या प्रचंड कामांनी वैतागलेली. ती कधी विणत बसणार ? दप्तरापेक्षा अभ्यासाकडं ध्यान दे म्हणून मला खेटरणारी.

नंतर नंतर आम्हाला युरियाच्या गोण्यांची दप्तरं असायची. रिकाम्या गोण्या पाटाच्या पाण्यात खळखळून धुवून वाळायला घालायच्या. आमचे आजोबा घरच्याघरी हातावर त्या गोण्यांची दप्तरं शिवून द्यायचे.

शाळेत जाताना त्यांना गोणी धुवून दिली की शाळेतून परत येईपर्यंत दप्तर तयार असायचं. लिंबाखाली बसून ते दिवसभर दप्तर शिवायचे.

गोणीचं तोंड उसवलेल्या काची दो-यानं घातलेले एकदम पक्के टाके. सायकलला अडकवून न्या नाहीतर हातात न्या. बंद तुटायची भीती नव्हती की उसवायची, फाटायची काळजी नसायची.

पण अशा दप्तराला चेन किंवा हुक वगैरे नसल्यानं वरून वह्या पुस्तकं उघडी रहायची. गावातले काही शिंपिही युरियाच्या रिकाम्या गोण्यांच्या पिशव्या शिवून द्यायचे, तळवट शिवून द्यायचे.

काही मुलांची दप्तरं खाकी रंगाची दोन कप्प्यांची असायची. कप्पे बंद करायला हुक असायचे. त्या दप्तरांचे जाड दोरे सहज सुटे व्हायचे. ती मूलं मधल्या सुट्टीत आसपास बाटल्यांची पत्र्याची झाकणं हुडकायची.

झाकण सापडलं की ते दगडानं टेचून टेचून चपटं करायची. मधोमध दोन बोळं पाडायची. मग वर्गात बसल्यावर कर्कटकने दप्तराचे दोरे काढायचे आणि भिंगरी करायची.

एकाचं बघून दुस-यांनी पण तसंच करायचं. दप्तरांचे दोरे लोंबले तरी हरकत नसायची पण भिंग-या भिंगल्या पाहिजेत ! मारकुटे गुरूजींचा मार चुकवण्यासाठीही दप्तराची खूपच मदत व्हायची.

अभ्यास केला नाही तर गुरूजी हमखास मारायचे. मारायला लागले की दप्तर ढालीसारखं मधे करायचं.

बारावीनंतर पुढे शिकायला माझ्या चुलत्यांनी मला पुण्यात नेले. तेव्हाही माझ्याकडं दप्तर नव्हतं. कारण तिकडे जाण्याआधी आमच्याकडे दोनचार वह्यापुस्तकं हातात न्यायची फॅशन आली होती किंवा फारतर एखाद्या कॅरीबॅगमधे पुस्तकं न्यायची.

तर तेव्हा आमच्या काकींकडे एक बरी पिशवी होती. गावाला, बाजारला वगैरे जाताना त्या ती पिशवी वापरायच्या. मी तिथं गेल्यावर माझा चुलत भाऊ आणि मी तीच पिशवी वापरायचो.

सकाळी शिकवणीला जाताना तो ती पिशवी घेऊन जायचा. परत आल्यावर त्याची पुस्तकं काढून ठेवून मी ती पिशवी कॉलेजला न्यायचे. तीन वर्षे आम्ही ती पिशवी दोघांत वापरली.

नंतर पाठीवरच्या दप्तरांची लाटच आली. ती शहरांत तर आलीच आली पण खेड्यापाड्यातली दुकानं वेगवेगळ्या दप्तरांनी गच्च भरली. आठवडी बाजारातसुद्धा दप्तरांचे ढीग विकायला आले.

बाजारातून दप्तरं घरोघरी आली. लहानमोठे चारपाच कप्पे, चोरकप्पे, चेन असलेली, रंगीबेरंगी सुंदर दप्तरं. चेन तुटली की दप्तरं कोपऱ्यात पडू लागली. पुन्हा नव्यासाठी हट्ट. नाहीतर शाळेला न जाण्याची धमकी.

लाडक्या मुलांना आवडीची दप्तरं मिळू लागली. कोणाचं दप्तर भारी त्यावरून चढाओढ लागली. पुन्हा डबा आणि पाण्याच्या बाटलीसाठी दुसरी छोटी पिशवी आली.

पाठीवर सॅक आणि हातात टिफिनबॅग आली. आम्ही दप्तरातच डबे न्यायचो. आईने भाजलेल्या वांग्याच्या भरितावर टाकलेली तेलाची धार दप्तरभर पसरायची. पुढे वर्षभर ती तेलकट अक्षरं सोबत करायची आणि दुसऱ्या कुणाच्या अभ्यासालाही जायची.

लेकराच्या टिफीन बॅगमध्ये बाटली भरून ठेवताना आपल्याला कधीच बाटली नव्हती हे आठवतं. बाटली भरून सांडताना दोन थेंब लेकराच्या अंगावर उडतात आणि ते आपल्यावर तणतणतं. तेव्हा दप्तर बाजूला ठेवून वाटंतल्या पाईपलाईनचं गार पाणी पोटभर पिताना कितीही भिजलं तरी आपली तक्रार नसायची हेपण हमखास आठवतं.

बारीक विचार केला तर असं लक्षात येतं की जे जागतिकीकरण, यांत्रिकिकरण म्हणतो आपण त्याने आपली मूळं हळूहळू इतकी पसरवली आणि घट्ट केली की स्थानिक श्रमाला हद्दपार केलं.

सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंना मागं सारून बाजारातला ठराविक मालच कसा चांगला हे लहानथोरांच्या मनावर बिंबवलं. सगळं कसं चकचकीत आणि ब्रँडेड पाहिजे.

‘नाकापेक्षा मोती जड’ अशी एक म्हण आहे आपल्याकडे. आता लेकरापेक्षा दप्तर जड, असं म्हणावं लागतं. अगोदर ओझं वाढवायचं आणि मग ओझं कमी करण्याचे नामी उपाय शोधायचे यात खूप पटाईत आहोत आपण !

School bag
ZP School : कोल्हीतील ‘जि. प’ची शाळा जिथे, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी

मला प्रश्न पडतात की, हातात लॅपटॉप घेऊन धडे गिरवणा-या लेकरांना आपल्या दप्तरांच्या गोष्टी कळतील का ? लॅपटॉपपर्यंत पोचण्याचा हा आडवळणी प्रवास कळेल का ? डीजीटल धडे, डीजीटल शिक्षक, डीजीटल अक्षर, ई-बुक, ई-लर्निंग या सगळ्यांमध्ये आपलं खोपाडीत पडलेलं दप्तर असेल का ?

असेल तर त्याच्याकडे कुणी दप्तर म्हणून बघेल का ? बिनदप्तरांच्या शाळेत जाणाऱ्यांना हे समजेल का ? माहीत नाही, पण माझ्या पिढीच्या दप्तराची गोष्ट विसरताही येत नाही.

एका गोष्टीच्या पोटातून निघणाऱ्या असंख्य गोष्टींच्या आठवणींनी मन भरून जातं नाहीतर जगणं कोरडं व्हायला कितीसा वेळ लागतो ? भुतकाळाच्या पाटीवर कोळशाने घासूनपुसून स्वच्छ करून त्यावर शुभ्र पेन्सिलने लिहिता येतंय म्हणून अजून दप्तराच्या दो-याची भिंगरी भिंगते, नाकात वायर जाऊन अजून शिंका येतात.

गाभूळलेल्या चिंचा कितीही जपून ठेवल्या तरी टरफल निघून वह्यापुस्तकांना लागलेल्या गाभ्याचा अजून वास येतो. कै-यांचं हळदमीठ अजून बोटांना लागतं. पुस्तकांखाली लपून बसलेली बोरं अजून हाताला लागतात.

बोरीला मारलेला दगड फांदीला धडकून माघारी फिरतो. मैत्रिणीच्या डोक्याला कोच पाडतो. धार लागते रक्ताची. तरी त्यावर हात दाबून धरत ती म्हणते, नाही ग थोडंच लागलंय. तू मारलेला नव्हता तो दगड. कसं विसरायचं हे सगळं ?

ज्यांना कुणी शाळेची वाट दाखवली नाही, दप्तराची गाठ पडू दिली नाही त्या माझ्या आज्ज्या, आई, आत्या आणि त्यांच्या सारखी असंख्य माणसं मात्र शहाणपणानं माझ्यासारख्यांना शाळेत पाठवत राहिले.

आम्ही पुढच्या वर्गात जाताना त्यांच्या अंगावर मुठभर मास चढत गेलं. आपलं शिक्षण त्यांच्या डोळ्यात चमकत राहिलं. अशीही असंख्य माणसं आहेत ज्यांच्या हातातलं दप्तर हिसकावून घेतलं गेलं, ज्यांनी स्वतःहुन दप्तराला रामराम केला अशा सगळ्यांप्रती मला आदर वाटतो.

शेवटी शिक्षण म्हणजे लिहिण्यावाचण्या पलीकडे असलेलं जगण्याचं सुंदर भान आणि शहाणपण!

माझा मुलगा त्याच्या लेकरांना दप्तर घेताना म्हणेल, माझी आई मी फक्त बाराशेचं दप्तर घे म्हणलं तरी एवढं महाग म्हणून अशी बघायची ! बाराशे, तेराशेवाल्या साध्या साध्या दप्तरांवर शिकलो आम्ही ! आणि ती लेकरंही इवले इवले कान टवकारून बापाच्या गरिबीच्या गोष्टी ऐकतील तेव्हा आपल्या दप्तरांची गोष्ट पार इतिहासजमा झालेली असेल.

आपल्याबरोबर काळ चालत असतो आणि तो अनुभवांच्या ओंजळीच्या ओंजळी आपल्या आठवणीत टाकत असतो. अशा ओंजळी मुठीमुठीनं वाटता आल्या तर अजून काय हवंय ना ? त्यातलीच एक मूठ इथं उलगडली इतकंच.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com