सोनगाव ग्रामस्थांची कांदळवन सफारीला चालना

खेड परिसरातील खाडीपट्ट्यात मगरींचे वास्तव्य असून, कांदळवनांची बेटही विस्तारलेली आहेत. त्यांचे रक्षण करतानाच ‘मगरींचे गाव’ म्हणून सोनगावला जागतिक नकाशावर आणण्यासाठी शासनाच्या वनविभाग आणि कांदळवन कक्षाने पुढाकार घेतला आहे.
Kandalwan Safari
Kandalwan SafariAgrowon

रत्नागिरी ः खेड परिसरातील खाडीपट्ट्यात मगरींचे (Crocodile) वास्तव्य असून, कांदळवनांची (Kandalvan) बेटही विस्तारलेली आहेत. त्यांचे रक्षण करतानाच ‘मगरींचे गाव’ (Crocodile Village) म्हणून सोनगावला (Songaon) जागतिक नकाशावर आणण्यासाठी शासनाच्या वनविभाग आणि कांदळवन कक्षाने पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने सोनगाव-भोईवाडीत नुकताच वाशिष्ठी मगर सफारीचा शुभारंभ झाला आहे. फेरीबोटीमधून एकावेळी आठ जणांना एक तासाची सफर घडवून आणली जाणार आहे.

खेड तालुक्याच्या हद्दीत असलेल्या सोनगावमध्ये वीसहून अधिक मगरींचे वास्तव्य दिसून आले आहे. जलपर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांना मगर सफारीचे आयोजन करून येथील गावच्या विकासालाही चालना देण्यासाठी रत्नागिरी वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान, मुंबई आणि रत्नागिरी येथील कांदळवन कक्षाचा प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून सोनगाव येथे कांदळवन सह-व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत सोनगाव येथे वाशिष्ठी-मगर सफारी सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली. कांदळवन प्रतिष्ठानकडून सोनगावला आठ आसनी मोटार बोट देण्यात आली आहे. सोनगाव-भोईवाडी येथे ३ मे रोजी सोनगावच्या सरपंच सौ. भारती पडवळांच्या हस्ते ‘वाशिष्ठी’ बोटीचे पूजन झाल्यानंतर सफारीस सुरुवात झाली.

कांदळवन कक्ष, रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील यांनी या वेळी उपजीविका निर्माण योजना आणि पर्यटनबद्दल मार्गदर्शन केले. कांदळवन कक्षातर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. या वेळी उपसरपंच मिलिंद घोरपडे, तंटामुक्त अध्यक्ष नितीन खेराडे, वनपाल उपरे, वनरक्षक अशोक ढाकणे, उपजीविका तज्ज्ञ वैभव बोंबले, उपजीविका सहायक अभिनय केळसकर, प्रकल्प समन्वयक श्रीमती क्रांती मिंडे, गौरांग यादव, स्वस्तिक गावडे, निमिशा नारकर उपस्थित होत्या.

रोजगाराभिमुख उपक्रम

नदी सफरीसाठी बोटीत एकावेळी आठ पर्यटकांना फिरवून आणण्याची व्यवस्था केली आहे. एका व्यक्तीला दोनशे रुपये प्रमाणे शुल्क आकारले जाणार असून, एका फेरीमधून १६०० रुपये उत्पन्न मिळेल. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदळवन कक्षाने ग्रामस्थांच्या सहकार्याने समिती स्थापन केली आहे. पर्यटकांना माहिती देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना कांदळवन कक्षातर्फे प्रशिक्षण दिले आहे.

काय पाहू शकाल सफरीमध्ये

* खाडीतील मगरींचे दर्शन.

* किनाऱ्यावरील कांदळवनांची माहिती, पक्ष्यांची ओळख.

* गावांची वैशिष्ट्ये आणि नैसर्गिक संपदेची माहिती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com