
शिवानंद नारायणराव कंठाळे
गाव : बोरी (ता. जिंतूर, जि. परभणी)
एकूण क्षेत्र :२.५ एकर
तुती लागवड : १ एकर
Parbhani Agriculture News : शिवानंद कंठाळे हे बोरी (ता. जिंतूर) येथील रहिवासी असून, त्यांच्या कुटुंबाची गावाजवळच बोरी ते कौसडी रस्त्यालगत हलकी ते मध्यम प्रकारची अडीच एकर शेती आहे. सोबतच नातेवाइकांची तीन एकर शेती करार पद्धतीने करतात.
शेती अतिशय कमी असल्यामुळे पूरक व्यवसायाच्या शोधात असताना त्यांना रेशीम शेतीविषयी वृतपत्र आणि समाज माध्यमातून कळाले.
मग त्यांनी देवठाणा (ता. पूर्णा) आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील काही रेशीम शेतीतील अनुभवी शेतकऱ्यांच्या शेती आणि रेशीम शेडला भेट दिली. त्यातून त्यांचा अनुभव आणि बारकावे जाणून घेतल्यानंतर आपण हे करू शकतो, याचा त्यांना अंदाज आला.
स्वतः शिवानंद हे एका विविध कार्यकारी पत संस्थेमध्ये सचिव (सेक्रेटरी) म्हणून कार्यरत आहेत. मात्र दररोज सकाळी, संध्याकाळी आणि सुट्टीचे पूर्ण दिवस यात ते रेशीम शेतीतील कामांना प्राधान्य देतात. या कामामध्ये त्यांना वडील नारायणराव आणि बंधू मोहन यांची मोठी मदत मिळते.
शाश्वत उत्पन्न देणारी रेशीम शेती
२०१७ मध्ये एक एकर क्षेत्रावर तुतीच्या ‘व्ही- १’ जातीची एक एकर क्षेत्रावर पाच बाय तीन बाय दोन फूट अंतरावर लागवड केली. २०१८ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेतर्फे आयोजित रेशीम शेतीचे प्रशिक्षण पूर्ण केले.
रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांच्याकडून प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती मिळाली. बोरगव्हाण (ता. पाथरी) येथील रेशीम उत्पादक शेतकरी राधेश्याम खुडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये जालना जिल्ह्यातील चॉकी सेंटरवरून १५० बाल्य कीटक (चॉकी) खरेदी करून रेशीम शेतीस प्रारंभ केला. मात्र अनुभवाची कमतरता आणि व्यवस्थापनात राहिलेल्या काही त्रुटींमुळे पहिल्या बॅचपासून कोष उत्पादन मिळाले नाही.
त्यामुळे खचून जाण्याऐवजी व्यवस्थापनात सुधारणेला प्राधान्य दिले. वर्षभरातच त्यांना रेशीम शेतीचा चांगला अनुभव मिळाला. त्यातील बरेच बारकावे माहीत झाल्यामुळे कोष उत्पादनात सुधारणा होत गेली. आता ते वर्षभरात रेशीम कोष उत्पादनाच्या ४ बॅच घेत आहेत.
त्यांनी रेशीम कीटकाच्या बायव्होल्टाइन जातीच्या १०० ते १५० अंडीपुंजाच्या प्रत्येक बॅचपासून ७८ ते१२५ किलोपर्यंत कोष उत्पादन मिळवले आहे. वर्षाला सरासरी ३५० ते ४०० किलो कोष उत्पादन मिळते. प्रत्येक बॅचसाठी सरासरी १० ते १२ हजार रुपये खर्च येतो.
माफक खर्चात संगोपनगृहाची उभारणी
शेतातील उंच जागी २४ बाय ५० फूट आकाराचे तसेच १५ फूट उंचीचे रेशीम कीटक संगोपनगृह उभारले आहे. छतासाठी सिमेंट पत्र्याचा वापर केला आहे. संगोपनगृहाभोवती जमिनीवर चारही बाजूंनी सिमेंट पत्रे लावले आहेत. त्यावर शेडनेट कापड लावले आहे. लोखंडी पट्ट्या, नायलॉन जाळी आणि साड्यांच्या वापरातून रॅक तयार केले आहेत.
त्यामुळे खर्च बराच कमी आला आहे. उन्हाळ्यात तापमान कमी करण्यासाठी आणि आतील आर्द्रता स्थिर ठेवण्यासाठी कुलर, फॉगरचा वापर करतात. तर हिवाळ्यात गारे वाऱ्यापासून बचावासाठी तागाच्या पिशव्या लावतात.
काटेकोर व्यवस्थापनावर भर
कोष काढणी आणि विक्री झाल्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण या बाबींवर विशेष भर देतो. पुढील बॅचसाठी रेशीम कीटकांना पुरेशा प्रमाणात खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी तुती बागेचे काटेकोर व्यवस्थापन करतात. त्यासाठी कोष काढणी सुरू होतानाच तुतीची छाटणी केली जाते. त्यानंतर सऱ्यामध्ये नांगरणी, वखरणी केली जाते.
मग खताच्या मात्रा देऊन पाणी दिले जाते. छाटणीनंतर दीड महिन्यात फिडींग योग्य तुतीची पाने तयार होतात. दरम्यानच्या काळात बाल्यकीटकांची मागणी चॉकी सेंटरकडे कळवलेली असते. त्यामुळे ठरलेल्या दिवशी बाल्य कीटक प्राप्त होतात.
रेशीम कोष उत्पादनासाठी पुढील बॅच सुरू होते. बाल्य अवस्थेत रेशीम कीटकांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो. दर्जेदार कोष उत्पादन मिळते.
मागील महिनाभरातील कामे
१ एप्रिल रोजी १५० अंडीपुंजाची बॅच घेतली. दर्जेदार कोष उत्पादनासाठी फीडिंग तसेच स्वच्छता, संगोपनगृहाचे तापमान योग्य राखण्यावर भर दिला. एप्रिलच्या २२ तारखेला कोष काढणी केली. एकूण १ क्विंटल १४ किलो कोष उत्पादन मिळाले.
जागेवरूनच परळी येथील व्यापाऱ्याने प्रतिकिलो ४२५ रुपये दराने कोषांची खरेदी केली. त्या कोष काढणीनंतर संगोपनगृहाची स्वच्छता केली आहे.
पुढील नियोजन
-येत्या दोन तीन दिवसांत तुतीची बागेची छाटणी करणार आहे.
- कोळपणी करून आंतरमशागत करणार आहे. त्यानंतर डीएपी आणि युरिया या खतांची प्रत्येकी एक पिशवी यानुसार बेसल डोस देण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पाणी सुरू केले जाते. मे महिन्यात पाणी व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे लागते.
-तण काढून घेणार आहे.
-पुरेशा प्रमाणात तुती पाने उपलब्ध झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात १५० अंडीपुंजाची बॅच घेण्याचे नियोजन आहे.
संपर्क - शिवानंद कंठाळे - ७७६७९७४२८८, ९५५२२८३५३५
(शब्दांकन : माणिक रासवे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.