
उस्मानाबाद: उद्धव बाळसाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि भाजपचे आमदार राणा पाटील (Rana Patil) यांच्यात पीक विम्या बैठकीवरुन (Crop Insurance) जिल्हाधिकारी कार्यालयात हमरातुमरी झाली. शनिवारी (ता.३) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पीकविम्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
परंतु या बैठकीचा निरोप मात्र खा. ओमराजे निंबाळकर आणि उस्मानाबाद-कळंब मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांना देण्यात आला नव्हता.
राणा पाटील यांनी काही शेतकऱ्यांना या बैठकीसाठी आमंत्रण दिले होते. त्यामुळे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. मात्र ११ ची वेळ असूनही १ वाजले तरीही बैठक सुरू झाली नव्हती. म्हणून शेतकऱ्यांनी गोंधळ करायला सुरूवात केली.
शेतकऱ्यांचा गोंधळ सुरू झाल्यानंतर खा. निंबाळकर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. तेव्हा त्यांनी "सत्ताधारी आहात म्हणूनच तुम्ही आम्हाला निरोप दिला नाही", असा आरोप आ. राणा पाटील यांच्यावर केला. तेव्हा राणा यांनी प्रत्युत्तर देत "तू अजून बाळ आहेस" असे म्हणाले. त्यानंतर खा. निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत, "तुमचे संस्कार आणि औकात काय आहे हे माहीत आहे" अशी आ. राणा पाटील यांच्यावर टिपणी केली. त्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाले.
शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत दोघांनाही शांत केले. या बैठकीत खरीपातील पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येणार होती. मात्र बैठक सुरू झाली नाही म्हणून शेतकऱ्यांमध्ये गोंधळ सुरू झाला. त्यानंतर निंबाळकर आणि राणा यांच्यात यावरून वाद निर्माण झाला. या हमरीतुमरीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान मागच्या महिन्यात उस्मानाबाद-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पीकविम्यासाठी आंदोलन केले होते. या उपोषणात खा. निंबाळकर सहभागी होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.