Diwali Nostalgia : खंडेराव, तू आपलं डीप्लोमॅटीक व्हायला शिक!

रानातून आलं की फुसक्या फटाकड्या गोळा करणे हाच खरा धर्म होता आणि मग त्याचा आटुंबाँब बनवणे. कुणाचं तरी तोडं हात फुटल्याशिवाय दिवाळी झाल्यासारखं वाटत नव्हतं.
Diwali
DiwaliAgrowon

लेखक- विकास गोडगे

लहानपणी धनत्रयोदशी वगैरेचं एवढं प्रस्थ नव्हतं. पहिल्या आंघोळीच्या अगोदर, "आज पाणी भरायचं हाय " हा खूप मोठा सण असावा. गावातल्या सगळ्या नळांना एकदम पाणी आलं की दिवाळी वाटायची. मग पहिली आंघोळ, पाडवा आणि भाऊबीज.

पहिल्या आंघोळी दिवशी आजोबा भाकर बांधुन रानात जायचे. पाडव्याला रानात पांडव घालायला हक्कानं जायचं. कारण तोटं उडवायला भेटायचं, पण त्या विराट पसरलेल्या रानात तोट्याचा आवाज कुठच्या कुठं विरून जायचा आणि ते वाजवल्याचं समाधान पण नाही भेटायचं.

रानातून आलं की फुसक्या फटाकड्या गोळा करणे हाच खरा धर्म होता आणि मग त्याचा आटुंबाँब बनवणे. कुणाचं तरी तोडं हात फुटल्याशिवाय दिवाळी झाल्यासारखं वाटत नव्हतं. शेतकऱ्यांच्या घरची दिवाळी म्हणजे सकाळी ओवाळणं, चिवडा बिवडा खाऊन तूर फवारायला नाहीतर ज्वारी कोळपायला जाणं.

नंतर एक मित्र तहसिलदार झाला आणि पहिली दिवाळी सासरवाडीला करून आल्यावर सांगु लागला, "ईकास दिवाळी हा सण श्रीमंताचाय हाय. श्रीमंत लोकं ती श्रीमंतच असतात, काय लका त्यांचं लक्ष्मी पुजन तीन तास चालतं, बामण बोलवुन काय काय करतेत. मला सासुरवाडीला उगंच गरीबासारखं वाटु लागलं आणि गावाकडची आठवण आली. आई रानात गेली आसंल. तसलं कडक लाडु, चिवडा करून ठिवला आसंल.... सांग आपल्या गावात तरी कोण करतं का लक्ष्मी पुजन? "

मी आपलं बिईंग गुड होत मान हालवुन.." खरंय लका... आपलं काय खरंयरं " आसलं कायतरी बोलायचं म्हणुन बोललो असेल..

"आरे आपण शेतकरी, आपला पाडवा असतो, आपण बळी राजाचे वंशज " असल्या तोंडात आलेल्या गोष्टी आवरून, खरंय लका तुझं, म्हणनं म्हणजेच डीप्लोमॅटीक होनं.

रानात जायला आता डांबरी सडक झालीय. रानातला पाऊस नेहमीच असा पिच्चर मधल्या सारखा नसतो किंवा या पावसात भिजणारी माणसं पण फोटोतल्या सारखी किंवा पिक्चरमधल्या सारखी साबण लाऊन धुतलेली नसतात. त्यांच्या अंगावरचा आंगरखा चिखलामातीने श्रीमंत झालेला असतो, त्या काळ्या मातीच्या चिखलाची श्रीमंती अनुभवायची असेल तर त्या डांबरी सडकंवरून खाली उतर, पायाला पेंड लागंल तसंच चालायला शिक, चप्पल तुटली तर वाईट वाटुन घेऊ नकु, तुझ्या अनेक पिढ्या बिन चपलंचंच रानात खपल्यात, विसरु नकोस....

जरा आत पेंडवलता चिखल तुडवत गेलास तर पुढं म्हसुबाच्या लिंबा जवळ तुझी आज्जी बसलेली आसंल, ती ताडकन उठुन म्हणेल, "आरं माझ्या राज्या कशाला आलासरं रानात पावसापान्याचं...आणि तुला डोक्यावर घ्यायला चवाळं देईल...घेऊन डोक्यावर ठेव, आज्जीनं प्रेमानं दिलेलं असतंय.

आजीचा चेहरा, लुगडं, कमरेचा बटवा, चिखलात भरलेलं पाय बघुन तुला टिव्हीतली म्हातारी आठवेन किंवा नेटफ्लीक्स वरची एखादी पांढरी म्हातारी आठवेन, त्या म्हाताऱ्या खोट्या असतात, तुझी आज्जी सेंद्रिय आहे. खरी माणसं अशीच असतात....दिवस मावळोस्तर म्हातारीला कामात मदत कर..बघ जमतंय का ....नाहीतर ही माती एकदा तुटली की पुन्हा जोडून घेत नाही...शहरातल्या उपऱ्या लोकांची तोंडं बघुन तुला ह्या मातीची नाळ तुटायची भिती वाटेलंच.

दिवाळीला गावात आलेलो आहे. गेले पंधरा दिवस लाईट नाही. लाईट आली कि डिपु जळतोय, डिपु बसवीला कि लाईट येत नाही पुन्हा लाईट आली कि डिपु जळतोय. वायरमेनला फॉल्ट सापडंना गेलाय. आल्या आल्या पाटलाच्या चंद्यानं विचारलं, "ईकास तुज्या कंपणीनं टि शर्ट वाटल्यातं म्हणं, घालायजोगं हायत का हालगी मंडळातल्या सारखं हायेत?

खंडेराव, नवी कापडं घ्या, पांढरा बुट घालु नका,हिप्पी कट आसंल तर हजामत करून घ्या, अर्ध्या चड्ड्या पुण्यातंच ठिवा, लै नावं ठिवत्यात गावाकड, जीनची पॅंट तीनशे वाली न घालता कमीत कमी हजाराची घ्या, वर्षातुन एकदा एवढं करूच शकता, गावाकड गेल्यावर शुध्द बोलायची झकमारी करू नका, लयंच म्हणा, खुप वगैरे म्हणलं कि लोकं हासत्यात...बायकुला सांगा खरीच पगार सांग म्हणावं कुणी विचारल्यावर, तू ज्या शेजारनीला आणि वैनीला पॅकेज सांगणार हायस तिच्या नवऱ्याला आपली खरी पगार माहीत असती...पोराला गावाकडचं पाणी बाधत फिदत काही नाही, उगं दोन दिवस बिसलरीचं नाटक करू नका.

बायकुला म्हणा तुझ्या भावाला लै पगार आसंल तर राहुदे, आमच्या घरी तुपातलं नाही तर तेलातलंच लाडु असत्यात...बायकु गावाकड गेल्यावर ईडली गुलांबजाबु करत आसंल तर करू द्या, पण उगंच आईच्या सयपाकाला नावं ठिवलं तर ठिऊन दिन म्हणावं.तूर यायची आसंल आजून पण उडीद, मुग झाला आसंल, एकदोन ठिकी नाही तर वाटनी घिऊन या. चीनाहानलानीहुनसनी बास झालं आता, भावाच्या मड्यावर घालायचं नाहीतर वाटनी मागा...

सगळ्यात महत्वाचं, भाऊबीजीला उगंच आपला डाव आला डाव आला, क्रश दिसला म्हणुन लै बोबाटा करू नका, बायकु समोर लोकांनी पाठ मऊ केलेली चांगली दिसंल का?शेवटचं पण महत्वाचं, गेल्यावर दोन दिवस उगंच पैसे उडवु नका, येताना येस्टीला उस्नं मागावं लागत्याल..

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com