
Crop Damage : खानदेशात रविवार (ता. ५) ते मंगळवार (ता. ७) या कालावधीत अनेक भागांत वादळी पाऊस (Stormy Rain) व गारपिटीने (Hailstone) मोठी पीकहानी झाली आहे.
काढणीवर आलेले गहू पीक (Wheat Crop) हातातून गेले आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे सुरू असून, त्यासंबंधीची आकडेवारी लवकरच जारी होईल, अशी अपेक्षा आहे.
शनिवार (ता. ४) ते मंगळवार (ता. ७) या कालावधीत शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. यामुळे पंचनामे, नुकसानीची प्राथमिक माहिती, पाहणी ही कामेही बंद होती. परंतु बुधवारपासून (ता. ८) पंचनाम्यांचे काम सुरू झाले आहे.
काही भागांत हे काम पूर्ण झाले आहे. तर काही भागांत काम सुरूच आहे. कृषी व महसूल विभाग कमी मनुष्यबळामुळे सर्वत्र पोहोचत नसल्याची स्थिती आहे. जशा तक्रारी प्राप्त होत आहेत, तशी पाहणी करून पंचनामे केले जात आहेत. ही कार्यवाही लांबली आहे.
परंतु तातडीने पंचनामे व अहवाल शासनाने मागितला आहे. यामुळे शनिवारी (ता. ११) याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती आहे.
गहू काढणीवर होता. अशात पाऊस आल्याने तो जमिनीवर लोळला. त्याची हार्वेस्टरने मळणी होऊ शकणार नाही. त्याची कापणी करून ट्रॅक्टरचलित थ्रेशरने मळणी करावी लागेल. यात खर्च वाढणार आहे. दादर ज्वारीदेखील आडवी झाल्याने तिची कापणी किचकट होत आहे.
मजूर अधिकची मजुरी आडवी झालेल्या दादर ज्वारीच्या कापणीसाठी घेतील, अशी स्थिती आहे. काही भागांत पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांसमोर वित्तीय संकट वाढले आहे. तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या पिकांचे झाले नुकसान
खानदेशात किमान ५० ते ६० हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. त्याची टक्केवारी कमी अधिक आहे. परंतु पीकहानी झाली आहे. दादर ज्वारी आडवी झाली आहे.
कांदा, मका, केळी, पपई, भाजीपाला, कलिंगड आदी पिकांचे मोठे नुकसान धुळे, नंदुरबार, जळगाव भागांत झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.