...तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतणार
Chana Bajarbhav Agrowon

...तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतणार

किसान सभेचा निर्वाणीचा इशारा

पुणे ः ‘‘केंद्र सरकारने हरभरा खरेदी (Chana Procurement) पुन्हा सुरू करावी. राज्य सरकारनेही हरभरा उत्पादक (Chana Farmer) शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा (Chana) ओतण्याचे आंदोलन केले जाईल,’’ असा निर्वाणीचा इशारा किसान सभेने (Kisan Sabha) दिला आहे.

खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहनांचे भाडे दररोज वाढत आहे. नाईटचार्ज भरावा लागत असल्याने व खरेदी होईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी काकुळतीला आले आहेत.

राज्यात नाफेडद्वारे ५२३० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरु होती. खुल्या बाजारात ४२०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकण्याचा पर्याय निवडला होता. नाफेडकडे रीतसर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले होते. रीतसर संदेश आलेल्या शेतकऱ्यांनी वाहने भाड्याने करून आपला माल खरेदी केंद्रांवर आणला. मात्र आता खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण सांगून खरेदी नाकारली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. केंद्रांवर आणलेल्या मालाचे काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे, असेही किसान सभेतर्फे स्पष्ट करण्यात आले. किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com