
आपल्या देशात चहाप्रेमींची संख्या प्रचंड आहे. कुठेही गेलात तरी चहाच्या टपऱ्या जागोजागी दिसतील. रेल्वे स्थानकं, बसस्थानकं अशा ठिकाणी चहाचे अनेक स्टॉल असतात.
तिथं चहा देण्यासाठी मातीच्या पेल्यांचा म्हणजेच कुल्हडचा (Kulhad) वापर केला जातो. माती पासून बनवलेले कुल्हड अतिशय स्वस्त आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे त्याचं आरोग्याच्या दृष्टीनंही महत्व आहे.
तर असे हे कुल्हड आता चाहासोबत नाश्ता म्हणून खाता येणार आहेत. तर हे कसं शक्य आहे? तर, उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका शेतकरी गटाने नाचणीच्या पीठापासून (Ragi Floor) 'कुल्हड' तयार केले आहेत, जे खाताही येतात.
नाचणी हे धान्य पौष्टिक भरडधान्य (Millets) प्रकारात (मिलेट) येत असल्यामुळे नाचणीपासून बनवलेले हे कुल्हड अतिशय पौष्टिक आहेत.
त्यामुळे या कुल्हडमध्ये जो कुणी चहा पेईल त्याला हे 'मीलेट कुल्हड' (Millet Kulhad) खाऊन पौष्टिक न्याहारीचाही आस्वाद घेता येणार आहे.
आपण जसं कोनमधे दिलं जाणार आईस्क्रिम कोनसह खाऊन टाकतो अगदी तसंच हे मिलेट कुल्हड चहा पिल्यानंतर खाता येणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी भरडधान्याचे आरोग्यवर्धक फायदे लक्षात घेऊन देवरिया येथील शेतकरी गटाने नाचणीपासून खाता येतील असे कुल्हड बनवायला सुरुवात केली.
हे कुल्हड बनविण्यासाठी एक खास साचा तयार केला. या साच्याचा वापर करुन एकाच वेळी २४ कुल्हड बनवता येतात.
नाचणी आणि मक्याच्या पिठापासून बनवलेल्या या पौष्टिक कुल्हडांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघ मेळ्यात चहाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
शेतकरी गटाचे सदस्य अंकित राय यांच्या म्हणण्यानुसार, पूर्व उत्तर प्रदेशातील ग्रामीण आणि शहरी भागात या कुल्हडांची मागणी झपाट्याने वाढत आहे.
सुरुवातीला उत्तरप्रदेशातील देवरिया, गोरखपूर, सिद्धार्थ नगर आणि कुशीनगरसह पूर्व उत्तर प्रदेशातील छोट्या गावांमधील चहा विक्रेत्यांना या कुल्हडचा पुरवठा केला.
मागणी वाढल्यामुळे हे नाविन्यपुर्ण कुल्हड लोकप्रीय झाले. त्यामुळे प्रयागराज, वाराणसी, लखनौ आणि इतर जिल्ह्यांमध्येही कुल्हडची मागणी वाढली.
कुल्हड बनवण्यासाठी अतिशय कमी म्हणजे पाच रुपये खर्च येतो. चहासह कुल्हड दहा रुपयांना विकले जातात. चहा पिल्यानंतर फेकून दिल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या किंवा पेपरच्या कपामुळे पर्यावरणाचे प्रदुषण होते. हे टाळण्यासाठीही या कुल्हडमुळे मदत होणार आहे.
२०१९ मध्ये भारताच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्ष' म्हणून घोषित केलं. त्यामुळे मानवी आहारात दुर्लक्षीत असलेल्या पौष्टिक अशा भरडधान्याचा वापर होण्यासाठी विविध उपक्रम राबवीले जात आहेत.
याशिवाय नाचणी, बाजरी, वरई, सावा, राळा यासारख्या भरडधान्याचे उत्पादन वाढावे आणि विविध पदार्थांच्या माध्यमातून लोकांनी आहारात भरडधान्याचा समावेश करावा यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
नाचणी हे पौष्टिक भरडधान्य म्हणून मानवी आरोग्यासाठी अतिशय फायदेशिर आहे त्यामुळेही या 'मिलेट कुल्हडला' एक वेगळ महत्व प्राप्त झालयं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.