Ladakh River : वाहत्या नद्यांचा लडाख आक्रसतोय...

जम्मू-काश्मीरसंदर्भातील लेखामध्ये लडाखमधील वातावरण बदलांविषयी आपण माहिती घेतली होती. सध्या केंद्रशासित असलेला व मुळातच ‘शीत वाळवंट’ असलेला लडाख वातावरण बदलासाठी अतिसंवेदनशील ठरणार आहे. एकेकाळी किमान वसंतात तरी वाहत्या नद्यांचा असलेला प्रदेश आक्रसत चाललाय, हेच खरे.
Ladakh Rivers
Ladakh RiversAgrowon

तीन वर्षांपूर्वीपर्यंत राजकीयदृष्ट्या जम्मू- काश्मीरला जोडलेला लडाख (Ladakh) हा हिमालयाच्या (Himalaya) कुशीमधील भूभाग. ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी केंद्राने त्याला वेगळ्या केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. लेह आणि कारगिल (Kargil) असे दोन जिल्हे असलेल्या या प्रदेशाची सीमा तिबेट, हिमाचल प्रदेश पाकव्याप्त गिलगीटबरोबर जोडलेली आहे. तिबेट चीनच्या ताब्यात गेल्यामुळे त्याचा व्यापारी मार्गावरील स्थान असा दर्जा कमी झाला. लडाखची २ लाख ९० हजार लोकसंख्येपैकी निम्मी केवळ पर्यटनावरच (Ladakh Tourism) अवलंबून असल्याने अर्थकारणही पर्यटनावरच आधारलेले.

Ladakh Rivers
Waghadi River : ‘वाघाडी’ च्या स्वच्छतेसाठी शेकडो हात सरसावले

कारण ही आहे मॉन्सूनची शापित भूमी. येथे पाऊस अतिशय कमी, त्यामुळे ‘शीत वाळवंट’ (कोल्ड डेझर्ट) म्हणून ओळखले जाते. शुष्क हवामानामुळे शेतीसाठी योग्य वातावरण नाही. तरिही वसंत ऋतूत वितळलेल्या बर्फाच्या पाण्यावर येथील शेतकरी गहू, बार्ली, बटाटा, वाटाणा, शेंगावर्गीय पिके, हिरव्या भाज्या, लसूण घास आणि टरनिपसारखी कंदमुळे पिकवतात. असे कष्टप्रद जीवन असूनही येथील शेतकरी अतिशय आनंदी आहे. तुलनेसाठी आमच्याकडे सारे काही असले तरी आनंद कोठे हरवला आहे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. लडाखमध्ये पाणी नाही, आणि आमच्याकडे अतिरिक्त पावसाने पिके वाहून चालली आहेत. हीच वातावरण बदलाची खरी झलक आहे.

शेतीही आकसतेय...

लडाख नद्यांनी समृद्ध प्रदेश आहे. हिमालयातून खाली आलेल्या नद्या खोऱ्यामध्ये येताच शांत होतात म्हणून लडाख हा नद्यांनी समृद्ध प्रदेश आहे. लेह जिल्ह्यामध्ये इंदू, शॉवोक (Shyok) नुब्रा (Nubra) या, तर कारगिल जिल्ह्यामध्ये सुरू (suru), द्रास (Dras) झान्सकार (Zanskar) अशा नद्या वसंत ऋतूमध्ये खळाळतात. सारी लोकवस्ती नद्याकाठी आहे. त्यांपैकी द्रास ही नदी शेतीसाठी महत्त्वाची आहे. मॉन्सून जुलै ते सप्टेंबरदरम्यान नावापुरताच पडतो. त्यामुळे लडाखमधील ९० टक्के शेतकरी बर्फाच्या वितळलेल्या पाण्यावरच शेती करतात.

वातावरण बदलाची तीव्रता गेल्या दोन दशकांपासून प्रखरतेने जाणवू लागली आहे. आशिया खंडामधील पाण्याच्या दुर्भिक्षावर कार्यरत असलेल्या ‘द थर्ड पोल’ या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने तयार केलेला ‘लडाख आणि त्यावर होत असलेला वातावरण बदलाचा परिणाम’ हा अहवाल अतिशय बोलका आहे. त्यानुसार वातावरण बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे हिमनद्या (Glaciers) वेगाने वितळत आहेत. बर्फ पडणे आणि पाऊस कमी झाला आहे. याचा परिणाम या शीत वाळवंटातील शेतीवर होत आहे.

Ladakh Rivers
Soybean Harvesting : सोयाबीन कापणीवर पावसाचं सावट ?

येथील नुब्रा व्हॅलीतील हंडर गावातील नामग्याल (Namgyal) हे ६५ वर्षांचे शेतकरी सांगतात, ‘‘माझे गाव वीस वर्षांपूर्वी हिवाळ्यात पूर्ण बर्फात झाकले जाई. आज हिवाळ्यातही आम्हाला दूर कुठेतरी बर्फ दिसतो. गावामधील वाहत्या नद्यामधील पाणी आटले, झरे कोरडे पडले आहेत. असे असून, वितळणाऱ्या बर्फामुळे धबधबे दिसत आहेत. तीस वर्षांपूर्वी बर्फ पडल्याने लडाखला इतर भागाशी जोडणारा खारडंग (Khardung) हा रस्ता सहा सहा महिने पूर्ण बंद असे. आता तो रस्ता मोकळा आहे. आम्ही आमची शेती विसरून जाऊ की काय, याची भीती वाटत आहे.’’

याच गावापासून १०० कि.मी. वरील खारडंग गावामधील नुरबो (Nurbo) या शेतकऱ्याची सुद्धा हीच कहाणी आहे. तो म्हणतो, ‘‘मागील एक दशकापासून शेतीचे सोडाच, प्यायलाही काही दिवस पाणी मिळत नाही. तिथे समोरच्या पर्वत रांगावर सगळे शुभ्र बर्फ होते, आता कोरडे रुक्ष पडले आहेत. बर्फ वितळून शेकडो झरे तयार होतात, त्वरित सुकूनही जातात. पाऊस झपाट्याने कमी होत आहे. २०१६ मध्ये तर पावसाचा एक थेंबही पडला नव्हता.’’

गवतही होतेय कमी

लडाखमधील पाण्याचा हा तुटवडा ही वातावरण बदलाचाच परिणाम असल्याचे शास्त्रज्ञांचे एकमत झाले. मागील चार दशकांत लडाखचे तापमान ३ अंश सेल्सिअसने वाढले आहे. बर्फवृष्टी थांबली आहेच, पडलेले बर्फही वेगाने वितळत आहे. पश्‍चिम हिमालयातील हिमनद्या २० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. वाढती उष्णता, कमी पाऊस यामुळे ‘नुब्री व्हॅली’ मधील शेतीचे उत्पादन ३० ते ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.

पाणीच नसल्याने बटाटा, बार्ली, टरनिप, मुळा आणि वाटाणा ही पिके शेतकरी लावायला धजावत नाहीत. येथील डिसकीट गावामधील महिला म्हणतात, ‘‘पिकाचे सोडाच, पाळीव जनावरांना गवतही मिळणे अवघड झाले आहे. पूर्वी बर्फ वितळलेल्या जागी भरपूर गवत उगवे. त्यावर गुरे चरत असत. शेतीपासून पशुपालनाकडे वळलो होतो, पण तिथेही निसर्ग आडवा येत आहे.’’

दिल्ली स्थित ‘टेरी’ या संस्थेमधील शास्त्रज्ञ डॉ. विभा धवन म्हणतात, ‘‘लडाख हा प्रदेश तेथील शुष्क हवामान (Arid climate) आणि त्याच्या भौगोलिक स्थानामुळे वातावरण बदलास यापुढे जास्त संवेदनशील राहणार आहे. वेगाने वितळणारा बर्फ भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण करेल.’’

जेथे संकट तेथे मार्ग

१) पाणीटंचाईवर मार्ग शोधला आहे, लेहमधील चेवाँग नॉरफेल या स्थापत्य अभियंत्याने. त्यांनी पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कृत्रिम हिमनद्या तयार केल्या आहेत. त्या करायची पद्धती सुद्धा तशी सोपीच. हिमनद्या वितळून वाहणारे पाणी किंवा लहान लहान ओढ्यास एखाद्या ठिकाणी अडवून ठेवले जाते. पुढे हिवाळ्यात त्याचा बर्फ होतो. पुढे वसंत ऋतूमध्ये हा बर्फ वितळून शेतीला पाणी उपलब्ध होते. चेवाँग याची ही कृत्रिम हिमनदी किंवा पाणी साठवणीची प्रक्रिया आता शेकडो शेतकरी अमलात आणत आहेत. चेवाँग म्हणतात, ‘‘या पद्धतीमुळे शेतीला तर पाणी मिळतेच. सोबतच भूगर्भातही पाणी मुरते. भूजलपातळी वाढते. लडाखमधील पर्यटनाला याच भूजलाची मोठी साथ आहे.

२) लडाखमध्ये पाण्याची बचतीची सुरेख कल्पना म्हणजे घरोघरी असणारी कोरडी शौचालये. यात मानवी विष्ठा ही कोरड्या मातीने झाकली जाते. मातीतील उपयुक्त जिवाणू त्याचे खतामध्ये रूपांतर करतात. हे वास विरहित सेंद्रिय खत शेतीला वापरले जाते.

३) वातावरण बदलामुळे लडाखचा बर्फ वर्षाव थांबला, पाऊस दूर गेला आणि बर्फ वितळणे वाढले. हे खरे असले तरी त्याचा शेतीला एका वेगळ्याच पद्धतीने फायदा होत आहे. पूर्वी बटाटा, टरपिन, वाटाणा आणि बिन्स अशा मोजक्याच फळ आणि पालेभाज्या घेता यायच्या, त्यात आता भर पडली आहे. ढोबळी मिरची, काकडी, फुलकोबी, पानकोबी, टोमॅटो, भेंडी, कलिंगड अशा पिकांची शेती येथे दिसू लागली.

लेह मधील चेवाँग म्हणतात, ‘‘आज पिकांची संख्या ५० ते ६० वर गेली आहे. पूर्वी सफरचंद, जर्दाळू (ॲप्रिकॉट) या फळाच्या बागा लेहपर्यंत होत्या, आता त्या लेहपुढे ७० कि.मी. उंचीवर गेल्या आहेत. येथील वाढलेल्या तापमानासाठी योग्य अशी सुधारित बियाणे आता शास्त्रज्ञ पुरवत आहेत. त्यात उष्णतेला प्रतिकारक अशा गव्हाचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com