विदर्भात जमीन संसाधनांचा आराखडा तयार

भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर)अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय मृदा सर्व्हे व जमीन वापर नियोजन (एनबीएसएस-एलयुपी) या संस्थेने विदर्भातील गावांचा आराखडा (Land resources plan) तयार केला आहे.
Soil Testing
Soil TestingAgrowon

नागपूर : विदर्भातील सर्व गावनिहाय पीक पद्धती कोणती असावी, याकरिताचा जमीन संसाधनांचा अभ्यासपूर्ण आराखडा (Land resources plan) तयार करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार गावनिहाय मातीचे गुणधर्म लक्षात घेऊन पिके घेण्यासंदर्भातील निर्णय शेतकऱ्यांना घेता येणार असून, यामुळे पीक उत्पादकता (Crop Productivity) खर्चात बचत, पीक व्यवस्थापनातील जोखीमस्तर कमी होण्यास मदत होणार आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर)अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय मृदा सर्व्हे व जमीन वापर नियोजन (एनबीएसएस-एलयुपी) या संस्थेने विदर्भातील गावांचा आराखडा (Land resources plan) तयार केला आहे. गावकेंद्रित या आराखड्या अंतर्गत संबंधित विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यातील शिवारांमध्ये कोणती पीक पद्धती फायदेशीर ठरेल, याविषयीच्या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला असून ऑगस्टमध्ये या अहवालाचे प्रकाशन होणार आहे.

या संस्थेअंतर्गत देशभरातील विविध राज्यांमध्ये मातीच्या गुणधर्माच्या अभ्यासाचे काम होते. संबंधित राज्य सरकारच्या विनंतीवरून देखील संस्था आधुनिक सयंत्राचा वापर करून मातीच्या गुणधर्मांच्या माहितीचे अहवाल तयार करून ते राज्य सरकारला देते. नागपूर मुख्यालय असलेल्या या संस्थेकडून विदर्भातील ११ जिल्ह्यातील मातीच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्याचे काम गेल्या वर्षभरापूर्वी सुरु करण्यात आले.

या अभ्यासात अत्याधुनिक रिमोट सेन्सींग (दुरस्थ संवेदना) यंत्रणेचा अवलंब या कामात करण्यात आला. त्याआधारे विदर्भाच्या ११ जिल्ह्यातील डिजिटल नकाशे सॅटेलाईट मार्फत प्राप्त झाले. संस्थेकडे या डिजिटल नकाशांचे पृथ्थकरण करून विश्‍लेषण करणारी स्वतंत्र लॅब आहे. एकाच प्रकारचे माती नमुने घेतल्यास त्यावर नाहकचा वेळ खर्ची होतो.

रिमोट सेन्सींगच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची माती हे कळते. या प्रयोगशाळेतील माहितीच्या आधारे संबंधित जिल्ह्यातील वेगवेगळे गुणधर्म असलेल्या मातीविषयी कळाल्यानंतर ११ जिल्ह्यांकरीता ११ पथकांची नियुक्‍ती करण्यात आली.

या पथकांनी त्या भागात जात माती नमुने संकलित केले. त्याचे विश्‍लेषण करून सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात संस्थेचा वर्धापनदिन असून या दिवशीच या अहवालाचे प्रकाशन करण्याचे प्रस्तावीत करण्यात आले आहे. त्याआधारे जिल्हानिहाय मातीचे गुणधर्म, संबंधित जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता व इतर बाबी कळणार आहेत.

एनबीएसएस-एलयुपी संस्थेकडून विदर्भातील मातीचे गुणधर्म अभ्यासण्यात आले आहेत. त्याचा अहवाल तयार असून लवकरच तो प्रकाशित होईल. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, कृषी आयुक्‍तांना हा अहवाल दिला जाणार आहे. त्याआधारे संबंधित जिल्ह्यातील मातीच्या गुणधर्मावरुन पीक पध्दतीची शिफारस करता येईल. माती गुणधर्मानुसार पीक लागवड झाल्यास त्या मातीतून त्या पिकाची अपेक्षीत उत्पादकता मिळेल. अन्यथा माती गुणधर्मानुसार पीक निवड न केल्यास अधिक उत्पादनासाठी अनावश्‍यक खत व इतर निविष्ठांचा पुरवठा करावा लागतो त्यामुळे उत्पादकता खर्चात वाढ होते.

डॉ.बी.एस. व्दिवेदी, संचालक, एनबीएसस-एलयुपी, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com