
जगदीश इनामदार
‘ब.लं.’चं खरं नाव बब्रुवान लक्ष्मण तामसकर (B.L.Tamaskar). परंतु ते देशभर ब. ल. नावानेच परिचित होते. शरद जोशी (Sharad Joshi) यांच्या विचारविश्वाचे गारुड इतके मोहिनी घालणारे होते, की त्यांच्या विचारांसाठी लढणारे हजारो तरुण ‘चांदा ते बांदा’ उभे राहिले.
त्यापैकीच एक मराठवाड्यातील औंढा नागनाथचे शेतकरी संघटनेचे कट्टर नेते ब. ल. तामसकर. सामाजिक प्रश्नांची चळवळ हेच आयुष्य आहे असे समजून ब. ल. तामसकर जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत लढले. त्यांच्या नावावर साधा एक गुंठा जमीन नाही. घर नाही, दार नाही.
चळवळ हेच त्यांचे जीवन होते. सामाजिक कार्याची नशा त्याला कारणीभूत होती. साने गुरुजींच्या राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेला हा माणूस आंतरभारती, मराठवाडा विकास आंदोलन, विद्यापीठ नामांतर अशा अनेक प्रश्नांच्या चळवळीत मोर्चे, आंदोलने, उपोषण यात सहभागी होत गेला.
१९८० च्या दशकात शरद जोशी नावाचे शेतकऱ्यांच्या जीवनात वादळ आल्यानंतर हा माणूस ओतप्रोत शरद जोशी यांच्या विचारांनी भारावून गेला.
शेतकरी संघटनेत हा माणूस १९८० मध्ये दाखल झाला. पुढे १९८४ मध्ये मराठवाड्यात शेतकरी संघटनेचे पहिले अधिवेशन परभणीत झाले होते.
‘स्वराज्य मिळवायचं औंदा,’ हे घोषवाक्य सत्यात उतरविण्यासाठी ब. ल. यांनी खूप मेहनत घेऊन ते अधिवेशन यशस्वी करून दाखवले आणि ब. ल. तामसकर नावाचा फकीर हा शरद जोशी यांच्या गोतावळ्यात रममाण झाला.
त्यानंतर हा माणूस कधीच स्वतःच्या घरी गेला नाही. औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. या गावात अंबुताई कुलकर्णी यांचा सुमारे एक एकराच्या क्षेत्रफळात मोठा जुना वाडा आहे.
कुलकर्णी कुटुंबातील बहुतांश मंडळी ही नोकरी व्यापार उदीम यांच्यामुळे देशपरदेशांत स्थलांतरित झाली होती. तथापि, अंबुताई यांनी हा वाडा सोडल्यानंतर ब. ल. तामसकर हे एकटेच या वाड्यात राहत होते. ब. ल. तामसकर हे अविवाहित होते.
त्यांना दोन सावत्र भाऊ आणि एक सख्खी बहीण होती. मात्र आयुष्यभर ते आपल्या परिवारात कधीही गुरफटले नाहीत. शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या चळवळीसाठी ते महाराष्ट्रभर फिरले. अनेक आंदोलनात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
आणीबाणीच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला. विचारांसाठी लढणारा हा माणूस होता.
त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केले होते. पूर्णा पाटबंधारे विभागात वसमत येथे नोकर भरती झाली होती. त्या वेळी झालेल्या आंदोलनात पोलिस गोळीबारात दोन युवकांचा मृत्यू झाला होता. त्यांना न्याय देण्यासाठी ब. ल. हे अखेरपर्यंत लढले होते.
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या हस्ते ब. ल. यांना अंबाजोगाईच्या अधिवेशनात जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता.
मराठवाड्याचा मुख्यमंत्री व्हावा, मराठवाड्यात कृषी विद्यापीठ व्हावे आणि मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. आंदोलन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता.
कसा योगायोग असतो बघा. ब. ल.चं निधन होऊन फक्त दोन तास झाले होते. मी दुपारी ब. ल. ला फोन केला, पण पहिल्यांदाच असे झाले, की फोन उचलला गेला नाही आणि परत कॉलही आला नाही.
त्या दिवशी दुपारी मला बागलाण परिसर चळवळ ग्रुपवर ब. ल.चा नाशिकचे आमचे जुने सहकारी अर्जुन तात्या बोराडे, संतु बोराडे, रामनाथ ढिकले, दत्तात्रय संधान यांच्या सोबतचा शेगाव येथील कार्यकारिणीच्या वेळचा फोटो व मेसेज आला.
मी तो बघितला आणि लगेच ब. ल.ला पाठविला. सोबत कॉल पण लावला, की काल तू फोन का उचलला नाही हे विचारण्यासाठी. पण दुर्दैवाने आजही माझा पहिला कॉल उचलला गेला नाही. मी परत कॉल केला तो उचलला. मी नेहमीच्या हसतखेळत मूडमध्ये ‘द्राक्नक्ष’ असं म्हणालो.
पण मला माझ्या मित्राचा ‘कायं जगदीश’ हा आवाज काही आला नाही. समोरील राजेश का राजेंद्र तामसकर नावाच्या व्यक्तीने मला अचंबित करणारी दुःखद बातमी दिली. ब. लं.चं आता दोन तासांपूर्वी निधन झालं, अशी ती बातमी होती. क्षणभर डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकले. मी निशब्ध झालो.
१९९१ मध्ये नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून आमदारकीसाठी स्व. नरेंद्र बापू अहिरे हे शेतकरी संघटना, राष्ट्र सेवा दल, टी.डी.एफ., डावी आघाडी, जनता दल, आंतरभारती, छात्र भारती, संघर्ष वाहिनी, आदी पुरोगामी संघटनांचे तगडे उमेदवार होते.
आमच्या समोर पहिल्यांदाच निवडणूक लढविणारे तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी विधान परिषदेचे उपसभापती, नंतर सभापती राहिलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व स्व. प्रा. ना. स. फरांदे हे उमेदवार होते. निवडणूक अटीतटीची होती.
निवडणुकीसाठी राज्यभरातून प्रमुख संघटनेसह सर्वच कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात अग्रक्रमाने ब. ल. तामसकर, तात्या मगरे, स्व. पुरुषोत्तम लाहोटी हे तिघेही माझ्या सोबत गिरणा सहकारी साखर कारखान्यावर होते.
त्या वेळी नरेंद्र बापू हे दुसऱ्यांदा चेअरमन झालेले होते. पडेल ते काम करण्याची तयारी असलेला कार्यकर्ता ही ब. ल.ची खरी ओळख होती.
वयाच्या ७४ व्या वर्षी या जगाच्या पडद्यावरून एक्झिट घेताना ब. ल. हे आप्तेष्टांना म्हणाले होते, की मला आपल्या घराकडे घेऊन चला. याचा अर्थ त्यांना मरणाने खुणावले होते.
सारे आयुष्य कुटुंबापासून फटकून कुलकर्णी वाड्यात राहणारे ब. ल. आयुष्याच्या शेवटच्या घटकेला आपल्या कुटुंबाच्या घरात काही क्षण राहण्यासाठी आपुलकीने आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी एक किस्सा विनोदाने सांगतात, की काही कार्यकर्ते ब. लं.च्या घरी त्यांना भेटायला गेले. त्या वेळी ब. ल. नेहमीप्रमाणे घरी नव्हतेच. त्यांचे वडील घरी होते.
कार्यकर्त्यांनी ब. ल.बाबत विचारले की ते कुठं गेलेत. हजरजबाबी वडील मिस्कीलपणे उद्गारले, ‘ल’ येथे आहेत ‘ब’ कुठे गेले माहीत नाही.
हा किस्सा मी ब. ल.ला बोललो, की ते खळखळून हसायचे. असा हा निर्मळ मनाचा आमचा ज्येष्ठ सहकारी, मार्गदर्शक, मित्र इहलोकाच्या प्रवासापर्यंत विचारांशी प्रामाणिक राहतं, फकिरीचं वैभव खऱ्या अर्थाने जगला.
भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात शेवटपर्यंत लढला. ब. ल. तामसकर यांच्या संघर्षमय जीवनकार्याला हृदयपूर्वक सलाम. अलविदा ब. ल.!
(लेखक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.