मुलांना जगू द्या

माझे वडील त्यांच्या तारुण्यात उत्तम कबड्डीपटू म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. ते ज्या टीममध्ये असतील तिचा विजय निश्‍चित असे.
मशागत लेख
मशागत लेखAgrowon

आपेश मरणाहून वोखटे,’ असं म्हणतात. आजूबाजूला घडणाऱ्या आत्मघातकी घटना याचंच तर प्रमाण आहे. माझे वडील त्यांच्या तारुण्यात उत्तम कबड्डीपटू म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. ते ज्या टीममध्ये असतील तिचा विजय निश्‍चित असे. त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या आणि सातत्याने हरणाऱ्या संघाच्या एका मुलाने त्यांना एकदा तरी हरवण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्याने निवडक खेळाडू घेतले. काही महिने जीव ओतून सराव केला. प्रत्यक्ष स्पर्धेच्या आधीच तो विजयी वीरासारखा वावरू लागला. कारण त्याला आता जिंकण्याची शाश्‍वती होती. एवढं करूनही त्याचा संघ पराभूत झालाच. त्याने त्याच रात्री फाशी घेतली. हे अपयश त्याला पचवता आलं नाही. खिलाडू वृत्ती दाखवता आली नाही. हरणाऱ्याने कुठलीही द्वेष भावना न ठेवता विजेत्यांचे अभिनंदन करायला हवं. हरणं-जिंकणं हा प्रतिष्ठेचाच नाही तर जीवन मरणाचा प्रश्‍न करून ठेवला. प्रावीण्य आणि कौशल्य या जर आत्मसात करण्याच्या गोष्टी आहेत तर अपयश, अपमान संयमानं पचवणं, ते सकारात्मकतेनं घेणं याचं ही शिक्षण मुलांना देणं गरजेचं आहे. ते मात्र कुठल्याच शाळेत दिलं जात नाही.

मशागत लेख
स्वतःच्या सोबत राहा

नुकत्याच एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या मुलीने स्वतःला फास देऊन संपवलं. अभियांत्रिकी हा तिचा कल नव्हता. पण घरच्यांची इच्छा होती. नृत्यगायन हे तिचे छंद होते. ती कलाशाखेत रमली असती. स्वतःची स्वप्नं आणि घरच्यांच्या अपेक्षा यातली दरी सांधता सांधली जात नाही. समाजाच्या दृष्टिकोनातून एकदम निरुपयोगी ठरण्याच्या भीतीहून मरण सोपे वाटते.

आयुष्य म्हणजे जगणं नाही तर केवळ शिक्षण, परसेंटाइल, करिअर, पॅकेज, प्लेसमेंट, टार्गेट, इंस्टॉलमेंट एवढंच उरलंय, त्यातून फुरसत मिळाली तर विकेंड यांत्रिक पद्धतीने साजरे होणार! वारंवार तुलना करून मुलांचं जगणं दुस्तर केलं जातं. मुलं म्हणजे एका साच्यातून निघालेले कारखान्यातले उत्पादन आहे का? त्यांची बुद्धिमत्ता, आवडीनिवडी, कल, स्वभाव सारखेच कसे असतील? भविष्यात भरघोस परतावा देणारा इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणून मुलांकडे पाहिलं जातंय. आपल्या अर्धवट स्वप्नांची गाठोडी त्यांच्या खांद्यावर असतात. बालपणाचा काळ सुखाचा असं पुढे जाऊन वाटेल असं निखळ आनंदी बालपण त्यांना आपण देतोय? की अतिरिक्त शिस्त त्यांची घुसमट नि मार्कांची चढण दमवणूक करतेय?

प्रत्येक मूल वेगळं आहे. बहरू द्या त्यांना मुक्तपणे. पालक म्हणून त्याचं हितच बघणार आहात तुम्ही पण छातीशी घट्ट कवळताना त्याचा श्‍वास गुदमरणार नाही हे बघा. उर फुटेस्तोवर धावून यशाच्या रेषेला स्पर्श करण्याआधीच तो कोसळणार नाही, हेही बघा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com