Mango Season : जपूया गावरान आंब्याचा ठेवा

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या फळ संशोधन प्रक्षेत्रावर रायवळ, तसेच विविध विद्यापीठांनी संशोधित केलेल्या आंबा जातींचा संग्रह करण्यात आला आहे. यामध्ये राज्य, परराज्यातील रायवळ तसेच व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या जाती आहेत. काही संशोधन प्रक्षेत्रावर कीट, केंट, माया, लिली यासारख्या परदेशी आंबा जातीदेखील पाहावयास मिळतात. जैवविविधतेचे संवर्धन आणि भविष्यातील संशोधनाच्या दृष्टीने हा अमूल्य ठेवा महत्त्वाचा ठरला आहे.
Mango Production
Mango ProductionAgrowon

Mango Season Update : काला पहाड, सफेद मालुदा, करेल, दगड्या, श्रावण्या, चपट्या, अखजा... ही नावे आहेत आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावरील रायवळ अर्थात गावरान आंब्याची... चव, रंग, आकार, गुणवैशिष्ट्य आणि बोलीभाषेनुसार या रायवळ जाती ओळखल्या जातात.

काळाच्या ओघात या जातींकडे दुर्लक्ष झाल्याने ही जैवविविधता संपत चालली आहे. परंतु हवामान बदलाच्या काळात आणि नव्या जातींच्या संशोधनाच्या दृष्टीने रायवळ जाती महत्त्वाच्या आहेत.

राज्यातील राहुरी, परभणी, दापोली, अकोला येथील कृषी विद्यापीठांच्या फळ संशोधन प्रक्षेत्रावर आंबा जातींचा विशेष संग्रह करण्यात आला आहे. यामध्ये राज्य, परराज्य तसेच परदेशातील महत्त्वाच्या व्यावसायिक जाती तसेच स्थानिक रायवळ जातींची लागवड करण्यात आली आहे.

वेंगुर्ल्यात आहेत २७१ आंबा जाती...

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र कार्यरत आहे. या प्रक्षेत्रावर कोकणातील महत्त्वाच्या फळ पिकांबाबत संशोधन केले जाते. या प्रक्षेत्रावर आंब्याच्या २७१ जाती पाहावयास मिळतात.

याबाबत संशोधन केंद्राचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. एम.एस.गवाणकर म्हणाले, की आमच्या केंद्रामध्ये असलेल्या आंबा जाती संशोधनासाठी महत्त्वाचा ठेवा आहेत. या ठिकाणी कोकणातील रायवळ तसेच राज्य, परराज्यातील महत्त्वाच्या जाती बघायला मिळतील.

कोकणातील आंबा बागायतदारांच्या बागेतही काही वैशिष्ट्यपूर्ण जाती दिसून आल्या आहेत. या जातींच्या काड्या घेऊन आम्ही प्रक्षेत्रावर कलमे तयार केली आहेत. त्यांची प्रक्षेत्रावर लागवड करून गुणवैशिष्ट्यांबाबत संशोधन करत आहोत.

Mango Production
Mango Season : आंबा हंगामावर हवामान बदलाचे सावट

आत्तापर्यंत दहा जातींची नोंद घेतली आहे. प्रक्षेत्रावर हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा, पायरी, आम्रपाली, वनराजा, दशहरी, मल्लिका, बैंगनपल्ली यांसारख्या विविध व्यावसायिक जाती पाहावयास मिळतात.

याचबरोबरीने कलमीकरणासाठी खुंट म्हणून उपयोगी पडणारी वेलई कोलंबन, गोव्यातील प्रसिद्ध मानकुराद, फर्नांडिन पाहावयास मिळते. त्याचबरोबर संशोधनाच्या दृष्टीने परदेशातील पामर, हेडन, केंट, कीट, टॉमी ॲटकिन्स, माया या जातींची लागवड केली आहे. हा ठेवा संशोधनासाठी उपयुक्त ठरला आहे.

गुलाब खरा, काला पहाड, सफेद मालुदा मराठवाड्याचे वैभव

मराठवाड्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेती बांधावर रायवळ आंब्याचे संवर्धन केले आहे. मात्र दुर्लक्षामुळे या जाती नामशेष होत आहेत. हे लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील हिमायत बाग परिसरातील फळ संशोधन केंद्रामध्ये आंबा जातींचा संग्रह करण्यात आला आहे.

संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम.बी. पाटील म्हणाले, की मराठवाडा म्हटले की आपल्यासमोर केसर आंबा येतो. परंतु, या प्रदेशाला आंबा लागवडीची पुरातन परंपरा आहे. गुलाब खरा, सफेद मालुदा यांसारख्या रायवळ जाती शेतकऱ्यांच्या बांधावर दिसतात.

हवामान बदलाच्या काळात या जाती संशोधनासाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. या जातींना विशिष्ट चव, सुगंध आहे, गुणवैशिष्ट्ये आहेत. या नामशेष होणाऱ्या जातींचे संवर्धन हिमायतबाग प्रक्षेत्रावर करण्यात आले आहे.

या ठिकाणी गुलाब खरा, काला पहाड, सफेद मालुदा, दुधपेढा या स्थानिक जाती आहेत. याचबरोबरीने केसर, हापूस, दशहरी, तोतापुरी, बानेशान, लंगडा, पायरी, निरंजन या जातींची लागवड केलेली आहे. याशिवाय परदेशातील टॉमी ॲटकिन्स, कीट, केंट, माया, लिली, केंग्सिंटन या प्रसिद्ध जातीदेखील पाहावयास

मिळतात. आमच्या कृषी विद्यापीठाने निरंजन ही जात विकसित केली आहे. या जातीचे आंबे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात तयार होतात.

आम्ही मराठवाड्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या बांधावर असलेल्या रायवळ जातींची माहिती गोळा करत आहोत. या जातींची कलमे तयार करून प्रक्षेत्रावर लागवड करत आहोत. या उपक्रमास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विदर्भात ढोबऱ्या, अखजा, पहाड्याचा दरवळ...

विदर्भातही आंब्याची विविधता दिसते. या विविधतेचे संकलन आणि संवर्धन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर करण्यात येत आहे.

याबाबत माहिती देताना विद्यापीठातील फळशास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉ. सुरेंद्र पाटील म्हणाले, की आमच्या प्रक्षेत्रावर केसर, लंगडा, हापूस, आम्रपाली आणि नागीण (रायवळ) या जाती पाहावयास मिळतात. याचबरोबरीने आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरील रायवळ जातींची नोंद आणि संकलन सुरू केले आहे.

सध्या आमच्याकडे ढोबऱ्या, शेपू, पहाड्या, गळू, श्रावण्या, शेंद्र्या, दगड्या, चपट्या, पिंजारी, खोबऱ्या, अखजा, हिरा, खाऱ्या, गोट्या, कामत्या, आमत्या, कासी या रायवळ जातींची नोंद झालेली आहे. या फळांचा आकार, सुगंध आणि चव प्रदेश निहाय वेगवेगळी आहे.

यातील काही जाती खारपाणपट्यातील आहेत. गेल्या वर्षीपासून रायवळ जातींची कलमे आम्ही तयार करत आहोत. नवीन जातींच्या विकासामध्ये रायवळ जाती महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आहेत.

Mango Production
Mango Production : आंबा हेक्टरी ६०० ते ७०० किलोच

राहुरी प्रक्षेत्रावर ५४ आंबा जातींचा संग्रह...

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध फळपिकांबाबत संशोधन केले जाते. येथील प्रक्षेत्रावर आंब्याच्या विविध जातींची लागवड आहे.

याबाबत माहिती देताना उद्यानविद्या विभागातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन मगर म्हणाले, की विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर १९७५पासून आंब्याच्या विविध जातींची लागवड करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी आंब्याच्या ५४ जाती आहेत. यामध्ये राज्य, परराज्यातील स्थानिक जाती, तसेच विविध राज्यांतील कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या जातींची लागवड आहे.

याठिकाणी पायरी, केसर, रत्ना, हापूस, सिंधू, निलम, बदामी, दशहरी, तोतापुरी, लंगडा याचबरोबरीने हूर, कलाकंद, मलगोवा, सफेदा, जहांगीर, दिलपसंद, गोल्डन सिलेक्शन, सालेम, बॉम्बे येलो, बॉम्बे दशहरा, हिमसागर, अमिनी, मालदा, पायपोशा, मिस्त्री, वाशी बदाम, सरदार, गोल्डन सिलेक्शन, स्वामिनी, पीटर पसंदा, सुंदरजा, बोरश्या, करविंदा, नारिलिओ, सिंधुरिया यांसारख्या लुप्त होणाऱ्या राज्य, परराज्यातील स्थानिक जाती पाहावयास मिळतात.

यातील काही जातींचा रंग आकर्षक आहे. गराचे प्रमाण चांगले आहे. काही जाती प्रक्रियेसाठी तर काही जाती रस, लोणच्यासाठी ओळखल्या जातात.

या प्रक्षेत्रावर विद्यापीठाने विकसित केलेली साई सुगंध आणि फुले अभिरुची या जातींची लागवड आहे. साईसुगंध ही संकरित जात असून वर्षाआड फळधारणा होते. फळे सोनेरी पिवळसर दिसतात. फुले अभिरुची ही जात लोणच्यासाठी प्रसिद्ध आहे.

कैरी जूनमध्ये तयार होते. फळे हिरवी, जाड सालीची असतात. फळात गर जास्त प्रमाणात आहे. अशा या वैविध्यपूर्ण जाती संशोधनाबरोबरच जैवविविधता संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

आंब्याची जैवविविधता : भविष्यासाठी मौलिक ठेवा

कोकण म्हटले की डोळ्यासमोर हापूस येतो. परंतु कोकणपट्टीत हापूस आंब्याव्यतिरिक्त इतर जातींची विविधता पाहायला मिळते. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हापूस, रत्ना, सुवर्णा, कोकण राजा, कोकण रुची, कोकण सम्राट, सिंधू या वैशिष्ट्यपूर्ण चव आणि गुणधर्म असलेल्या जाती विकसित केल्या आहे. या जातींच्या विकासामध्ये आंबा संग्रहाचा फायदा झाला आहे.

याबाबत माहिती देताना दापोली येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर म्हणाले, की देशपातळीवर आंब्याच्या हजारांहून अधिक जातींची जैवविविधता पाहावयास मिळते. यातील चाळीस जाती व्यावसायिकदृष्ट्या लागवडीखाली आहेत.

दापोली कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रक्षेत्रावर विविध आंबा जातींची लागवड केलेली आहे. वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रामध्ये दोनशेहून अधिक, तसेच दापोली प्रक्षेत्रावर पन्नासहून अधिक आंबा जाती पाहावयास मिळतात.

संशोधन प्रक्षेत्रावर हापूस, पायरी, केसर; राज्य, परराज्यातील व्यावसायिक जाती, रायवळ जाती तसेच परदेशातील जातींची लागवड आहे. दरवर्षी विविध राज्यांतील कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या नवीन जाती आमच्या संग्रहात येत असतात.

रायवळ गटामध्ये प्रदेशनिहाय विविधता आढळते. फळांचा लाग, चव, रंग, आकार अशी वैशिष्ट्ये दिसतात. खोबऱ्या, गोटी, बिटक्या, करेल अशा स्थानिक नावाने या जाती परिचित आहेत. खोबऱ्या सॅलडसाठी, बिटक्या रायत्यासाठी आणि करेल, राजापुरी, कासवजी पटेल या स्थानिक जाती लोणच्यासाठी प्रसिद्ध आहेत.

वनराज या जातीचे फळ मोठे आहे. दुधपेढा जातीचा आंबा चवीला अत्यंत गोड आहे. विद्यापीठाने खास लोणच्यासाठी कोकण रुची तर सॅलडसाठी कोकण राजा जात विकसित केली आहे.

Mango Production
Mango Season : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा उत्पादक संकटात

आपल्या देशात प्रदेशनिहाय ग्राहकांची विविध आंबा जातींना पसंती आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर महाराष्ट्रात हापूस, पायरी, केसरला चांगली मागणी असते. गोवा राज्यात मानकुराद, गुजरातमध्ये केसर, उत्तर भारतामध्ये दशहरी, लंगडा, आंध्रप्रदेशात बैंगनपल्ली, कर्नाटकात बदामी आंब्याला पहिली पसंती दिली जाते.

संशोधन प्रक्षेत्रावर फळ उत्पादन, चव, रंग यांचा अभ्यास करून फ्लोरिडा, इस्राईलमधील प्रसिद्ध ऑस्टिन आणि लिली या जातींची आपल्या राज्यात लागवडीसाठी शिफारस केली आहे. या जातींचे उत्पादन आणि चवही चांगली आहे. परदेशातही या फळांस चांगली मागणी आहे.

संशोधनाचा पाया

रायवळ तसेच व्यावसायिक आंबा जातींची जैवविविधता जपणे हे हवामान बदलाच्या काळात महत्त्वाचे आहे. प्रदेशनिहाय रायवळ जातींमध्ये विविध गुणवैशिष्ट्ये असल्याने नवीन जातींच्या संशोधनासाठी त्यांचे संवर्धन महत्त्वाचे ठरले आहे.

आंबा लागवड करताना व्यावसायिक जातींच्या बरोबरीने वीस टक्के इतर जातींच्या लागवडीची विद्यापीठाने शिफारस केली आहे. यामुळे परागीकरणास फायदा होतो. फळांचे उत्पादनही चांगले मिळते. महत्त्वाचे म्हणजे बागेमध्ये जैवविविधता जपली जाते.

यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती बांधावर असलेल्या रायवळ जातींचे संवर्धन करावे. त्यांची माहिती आपल्या विभागातील कृषी विद्यापीठांना दिल्यास संशोधनासाठी मदत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com