
रमेश वाघ
Maharashtra Politics News: माझेच मत (Voting) कसे बरोबर आहे, या बाबतीत प्रत्येक जण आग्रही असतो. विचार सारखा असला तरी झेंडा (Party Flag) वेगळा. प्रत्येकाला जनतेचा विकासच करायचा असला तरी शेकड्याने पक्ष. ठरावीक भूमिकेचा आग्रह धरणारे धर्म, संप्रदाय.
जो सहमत नाही, त्याचीही काही भूमिका असू शकेल, हा विचारच नाही. आपलेच म्हणणे खरे करण्याचा हेका संघर्षाला आमंत्रण देतो. हे जसं राष्ट्रजीवनाचं वास्तव आहे. तसं कौटुंबिक पातळीवरही हेच वास्तव आहे. एकक छोटं असलं, तरी वस्तुस्थिती तीच आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी.
मी म्हणते त्या पद्धतीनेच सुनेने वागावं, असा सासूबाईंचा आग्रह असतो. आपला भूतकाळ जसाच्या तसा सुनेच्या रूपाने आपल्याला पुन्हा अनुभवायला मिळावा अशी सासूची अपेक्षा असते.
इतकं ताणलं जातं, की दोघींना एका छताखाली राहणं अशक्य होऊन बसतं. वास्तविक मातापित्यांचं घरटं सोडून कोणी एखाद्या घराचं घरपण उद्ध्वस्त करायला येत नसतं. तशीच मुलगा जन्माला आल्यापासून सुनेच्या आगमनाची स्वप्न बघणारी सासूही काही दुष्ट नसते.
आग्रह आडवा येतो. नेमके कोणाच्या मताप्रमाणे चालावे, याचा निर्णय करण्यात गफलत होते. आग्रहाला अहंकाराची जोड मिळाली, की त्याचं रूपांतर दुराग्रहात होतं. दुराग्रह संघर्षाला जन्म देतो. संघर्ष सुख हिरावून घेतो.
मुलाने कोणता खेळ खेळावा, कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, प्रत्येक बाबतीत आपण आपलेच घोडे दामटत असतो. आपल्या आग्रहापोटी आपण मुलांचं निर्णयस्वातंत्र्य हिरावून घेतो.
एका अर्थाने आपण त्यांच्या नैसर्गिक विकासाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करतो. चुकीचे निर्णय घेण्यातूनच बरोबर निर्णय घेण्याचं शहाणपण जन्माला येत असतं. एक चुकीचा निर्णय जे शिकवतो, ते एखादं पुस्तकही शिकवू शकणार नाही.
‘बी प्रॅक्टिकल’ शिकण्यातही यायला हवं. सार्वजनिक जीवनात प्रार्थनेसारख्या विषयातही आग्रह धरला जातो. आम्ही सांगतो तशीच प्रार्थना सर्वांनी करावी.
आम्ही मानतो तोच देव श्रेष्ठ. असा आग्रह आला, की विभिन्न विचारधारांना मानणाऱ्यांचं स्वातंत्र्य नाकारलं जातं. सर्व जण सुखी असावेत. सर्व निरोगी असावेत.
सर्वांचे कल्याण व्हावे. कोणीही दुःखी असू नये. अशी प्रार्थना जेव्हा वैदिक ऋषी करतात, तेव्हा ती सर्वच देश, धर्म आणि काळासाठी असते.
सर्व या शब्दात मानवमात्रच नव्हे, तर यच्चयावत सर्व जिवांच्या कल्याणाचं मागणं येतं. इतकी उदात्त भूमिका अनाग्रही झाल्याशिवाय नाही घेता येत. आग्रह सोडला की संघर्ष संपतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.