जीवनवाहिन्याच येऊ लागल्या मुळावर!

मॉन्सूनच्या पहिल्याच तडाख्यात ही शोकांतिका, तर पुढील तीन महिन्यांत अजून काय वाढून ठेवले आहे, ते बाप हिमालयालाच ठाऊक!
Bramhaputra Map
Bramhaputra MapAgrowon

डॉ. नागेश टेकाळे

सध्याची आसाममधील (Aasam Flood) पूर परिस्थितीच वातावरण बदलांची दिशा दाखवते आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक या दोन नद्यांनी आसाममधील ४५ लाख लोकांना एक आठवड्यापासून विस्थापित केले आहे. त्यात मनुष्यहानीच शंभरपेक्षा अधिक आहे. मॉन्सूनच्या (Monsoon) पहिल्याच तडाख्यात ही शोकांतिका, तर पुढील तीन महिन्यांत अजून काय वाढून ठेवले आहे, ते बाप हिमालयालाच ठाऊक!

गेल्या आठवड्यापासून बराक, ब्रह्मपुत्रा (Brahmaputra) आणि त्यांच्या उपनद्यांनी आसामला दोन इंच पाण्याखाली ठेवले आहे. तब्बल १७३ रस्ते आणि पुलांचे नुकसान झाल्यामुळे संपर्क तुटला आहे. तब्बल एक लाख ८६९ हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली आहेत, तर लाखो हेक्टर शेतीची पुरामुळे धूप झाली आहे. आसाममधील कृषियारा नदीही दरवर्षी कृषी क्षेत्रासाठी जीवदान देते. तिच्या जिवावरच, सिंचनावर वर्षाचा चार चर पिके घेतात. या मर्यादशील नदीने या वर्षी प्रथमच आपली मर्यादा ओलांडली. ही जीवनवाहिनी मृत्युदात्री झाली.

ब्रह्मपुत्रा (Brahmaputra)आणि बराक या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचा राग आपण समजू शकतो, पण त्यांच्या उपनद्या पूर्वी पहिल्याच पावसात एवढ्या कधी कोपल्या नव्हत्या. निसर्गाचे सुंदर चित्र कुठेतरी फिसकटत आहे, हे नक्की. भारताच्या उत्तरपूर्व राज्यांपैकी मुख्य आसाम राज्यावर गेल्या दीड दोन दशकांपासून वातावरण बदलाचा प्रभाव जास्त जाणवत आहे. मुख्य कारण राज्याच्या पूर्वेला असलेल्या बर्फाच्छादित हिमालयाच्या रांगा आणि ब्रह्मपुत्रा, बराक या दोन नद्या. कैलासात उगम पावलेली ब्रह्मपुत्रा (Brahmaputra)नदी तिबेट व अरुणाचल मार्गे आसाममध्ये येते.

येथे ती सागराप्रमाणे अथांग होते. तिची सरासरी रुंदी ५.४६ कि.मी असून, काही ठिकाणी तिचे पात्र ८० कि.मी. एवढे रुंद आहे. ही बारमाही नदी पुढे बांगलादेशात प्रवेश करते. दुसरी मोठी नदी म्हणजे बराक. हिचा उगम मणिपूरमध्ये होऊन, नागालँड, मिझोराममार्गे आसाममध्ये शिरते. पुढे बांगलादेशमध्ये प्रवेश करते. तेथे तिला सुरमा म्हणतात, पुढे ती मेघना म्हणून ओळखली जाते. तिला पुढे गंगा आणि ब्रह्मपुत्रा (Brahmaputra)मिळतात आणि त्यांचे बंगालच्या उपसागरात विसर्जन होते. आसाम हे राज्य भूतान, आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, आणि बांगलादेश यांच्या सीमांशी जोडलेले आहे.

हिमालयाच्या प्रभावाखाली भारतातील एकूण बारा राज्ये येतात. त्यातही वातावरण बदलासाठी जास्त संवेदनशील आसाम, मिझोराम, आणि जम्मू-काश्मीर ही राज्ये, त्यानंतर तुलनेने कमी सिक्किम. हिमालयीन प्रदेशामुळे या राज्यांना जंगलाची घनदाट सावली मिळते. सोबतच कितीतरी नद्या जन्मून वाहत्या होतात. याच नद्यांवर लोकांचे कृषी जीवन आणि पिण्याचे पाणी अवलंबून आहे. हेच जंगल, वाहत्या नद्या आणि शेती आता हवामान बदलामुळे संकटात सापडली आहे. केंद्र सरकारने या सर्व बारा राज्यांचा आणि त्यावरील हिमालयीन बदलत्या हवामानाच्या परिणामांचा सविस्तर अभ्यास केला.

डीएसटी या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, १२ राज्यांपैकी आसाम हे राज्य जास्त संवेदनशील आहे. हिमालयीन प्रदेशाच्या हवामान बदलाचा सविस्तर अभ्यास आयआयटी, गोहत्ती आणि आयआयटी, मंडी यांनीही भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर यांच्या सहकार्याने पूर्ण केला. त्यानुसार समितीने सर्वांत जास्त संवेदनशील निर्देशांक आसामचा दाखविला आहे. या निर्देशांकात दरडोई उत्पन्न, पाण्याखालची शेती, त्या भागामधील एक हजार लोकसंख्येमागील जंगल क्षेत्र आणि खुले वनक्षेत्र हे मापदंड स्वीकारले होते.

आसाममध्ये सिंचित क्षेत्र खूपच कमी आहे. त्यात डोंगर उताराचे क्षेत्र ३० टक्के. आदिवासी लोकसंख्या अधिक. दरडोई उत्पन्नही कमी. याच चार मापदंडावर आधारित आसामला अधिक मदत करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत. या मदतीतून पावसाचे पाणी अडवून शेतकऱ्यांना सिंचन उपलब्ध करून देणे, पर्वत उतारावर स्थानिक वृक्षांची लागवड, धूप थांबवणे, खुल्या जंगलामध्ये वृक्षांची भर आणि नवीन पीक पद्धतीमधून स्थानिकांना रोजगार तसेच अन्न प्रक्रियेस प्रोत्साहन दिले जात आहे.

जागतिक तापमान वाढीच्या प्रभावाने हिमालयातील बर्फ वेगाने वितळत आहे. एकेकाळची जीवनवाहिनी असलेली ब्रह्मपुत्रा (Brahmaputra) ही वरदानापेक्षा शापच अधिक अशी स्थिती निर्माण होत आहे. चीन, भारत, बांगलादेश मधून वाहणारी या नदी आसामसाठी जून ते ऑक्टोबर या काळात धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात मॉन्सूनपूर्व काळात दरवर्षी महापूर येऊन वन्य जीवांबरोबरच माणसांनाही गिळंकृत करतो.

शेती, घरे, मालमत्ता वाहून जाते. पूर ओसरल्यानंतर वाढणारी रोगराई वेगळीच. ब्रह्मपुत्रेच्या पुरावर नियंत्रण मिळवणे अवघडच नव्हे अशक्य ठरत आहे. पूर नियंत्रणासाठी दोन्ही तीरावर वृक्ष लागवडीचे अभियान राबवण्यात आले. पाण्याच्या वेगापुढे तेही टिकत नाही. नदी काठावर दुतर्फा मोठे खुले जंगल आहे. त्यातही वृक्ष लागवड केली जात आहे. नदी उतारावरून सपाट प्रदेशात आलेली नदीकाठी वृक्ष लागवड यशस्वी झाली आहे. मात्र दरवर्षी अंदाजे ८००० हेक्टर जमीन वाहून जाते.

त्यामुळे काही ठिकाणी साडे पाच कि.मी रुंद असलेली नदी १५ कि.मी. रुंदीपर्यंत पोहोचली आहे. या हिमालयीन भागातील वारंवार होणाऱ्या भूकंपाने दरडी कोसळत राहिल्यामुळेही नदी गाळाने भरून जात आहे. पूर अधिक दूरपर्यंत पसरत आहे. प्रतिवर्षी हजारो शेतकरी भूमिहीन होतात. दरवर्षी शेकडो कोटी खर्च करून ही जमिनीची धूप थांबविण्याचा तोकडा प्रयत्न केला जात आहे. ब्रह्मपुत्रा ही मोठी नदी अनेक कारणांमुळे वरदानही ठरते. तिच्या पात्रातून होणारी वाहतूक, मासेमारी, कृषी, सिंचन, पर्यटन यामुळेच या राज्याचे २२ जिल्हे समृद्ध होतात.

बराक ही नदीही ९०० कि.मी.चा प्रवास करत मणिपूर, नागालँड, मिझोराम, आसाम मार्गे पुढे बांगलादेशात जाते. गेल्या काही वर्षापासून मणिपूर मधून येताना या नदीचा प्रवाह अधिक वेगवान होत असल्याचे आसामचे लोक सांगतात. कारण आहे मणिपूर, नागालँड, मिझोराममधील वृक्षतोड. या नदीमार्गेच लाकडांची तस्करी बांगलादेशात होते. त्यातच या नदीमध्ये जिलेटीनच्या कांड्या फेकून मासेमारी करण्याची काही स्थानिकांची पद्धत जलचरांच्या जिवावर उठत आहे. नदीतील डॉल्फिन मासे आणि सर्व जैवविविधता धोक्यात येत आहे. जल जैवविविधतेअभावी नदीमध्ये गाळ भरण्याचे प्रमाण वाढत आहे.

वातावरण बदलांचे ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांवरील परिणामः

१) नद्यांची पात्रे विस्तारत असून, ती गाळाने भरत चालली आहेत.

२) दरडी कोसळल्यामुळे नद्या वर उचलल्या जात आहे.

३) यामुळे पूर पसरण्याचे प्रमाण वाढत असून दोन्ही काठांवरील हजारो हेक्टर सुपीक जमीन काबीज करत आहेत.

४) सपाट भागात काही प्रमाणात या नद्यांच्या काठावरील वृक्ष लागवडीमुळे पूर नियंत्रणास काही प्रमाणात मदत होत आहे.

आपण काय शिकायचे?

आसामसारखीच परिस्थिती आज आपल्या कोकणात (Konkan) आहे. नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात, आणि शेताचे नुकसान करतात. या दोन्हीमध्ये फरक एकच आहे. आसाम येथे येणाऱ्या नद्यांचा उगम त्या राज्यात नाही. त्यामुळे नद्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य नाही. मात्र कोकणामधील नद्या येथेच उगम पावतात. या नद्या तुलनेने लहानही आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे तुलनेने सोपेही ठरणार आहे. जे नदीकाठावरील वृक्ष लागवडीमधून आसामने काही प्रमाणात का होईना साध्य केले. कोकण अजूनही या क्षेत्रात फार मागे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com